भाषा प्रेमाची

Submitted by वैशाली अ वर्तक on 15 March, 2019 - 07:25

स्पर्धेसाठीः -अष्टाक्षरी

भाषा प्रेमाची

भाषा नसते प्रेमाला
भावनांचा असे खेळ
सारे कळे न वदता
जमे जीवांचा जो मेळ

शब्दाविणा समजते
गुज मनीचे क्षणात
प्रेम म्हणती तयाला
भाव उमजे मनात

भाव असता उत्कट
नसे गरज बोलणे
माझे प्रेम तुझ्यावरी
शब्दा शिवाय कळणे

आहे माध्यमे प्रेमाची
स्पर्श , संकेत , कटाक्ष
भाव दावी अंतरीचे
प्रेम भाषेत चाणाक्ष

होता असाच प्रेमाचा
स्पर्श कधी ओझरता
क्षणभर नकळत
शब्द न, ते पाझरता

अशी भावना प्रेमाची
निसर्गात भरलेली
पाखरांना कुठे बोली
तरी प्रीत झरलेली.

......वैशाली वर्तक

Group content visibility: 
Use group defaults