जीवन बिगारीचे

Submitted by वैशाली अ वर्तक on 15 March, 2019 - 06:30

होता रोज सकाळ , करावया येतो काम
दोघे मिळूनी राबतो , मानीतो हे तीर्थ धाम

"परिश्रम " मानून देव , अतोनात करितो कष्ट
सौख्य येईलच दारी , ठेव देवा सदा पुष्ट

करावया सुखी संसार , साथ तुझी मिळो सदा
सखे धरिला हात तुझा , सोडू नकोस तो कदा

एका हाताने तान्हुला दुजा सावरी मातीला
साथ राहूनी धनीच्या बळ वाढवी कामाला

तुझ्या माझ्या राबण्यास , देव नक्की देई न्याय
दृढ श्रध्दा तयावर , करी न कोणा अन्याय

दिन नक्की पालटेल , पु-या होतील उणीव
खोली मालकीची बांधू , मनीं ठेवली जाणीव

देवाजीने दिला जन्म , वाया न जावो निरर्थक
काम करूया कसूनी , करू जीवनाचे सार्थक

मोठा होईल तान्हुला , तोचि आपुला आधार
तया करुया साक्षर , ईच्छा होईल साकार.

वैशाली वर्तक (अहमदाबाद)

Group content visibility: 
Use group defaults