आई

Submitted by विजयकुमार on 13 March, 2019 - 05:24

"आई " हाक मारली कि
सारं आकाश
डोळ्यात का गोळा होतं ?
कधी कळलच नाही,
इवल्याश्या तोंडातून
काहीतरी भव्य बाहेर पडावं
जसं ज्ञानेश्वरांच्या रेड्यामुखी
गीता !

त्या लहानपणीच्या दुरवरच्या
गावात ती देवघरात
पूजेला बसायची
अन् मी तिच्या
मांडीवर डोके ठेवून
निजायचो शांतपणे,
रात्रभर पसरलेलं
चांदण डोळ्यात साठवून !

क्षिताजापार सीमा शोधायचा
एक जीवघेणा खेळ
आयुष्यभर केला,
नशाळलेल्या रात्री तिचा
हात हातात घेतला की
त्या सा-या सीमारेषा
धुसर होतात
त्याचवेळी
क्षितीज धरतीला टेकून
धरतीचॆ क्षमा मागू
लागते तितकीच क्षमाशील ती
मायेचा ओलावा डोळ्यात
साठवून अवेळी बरसणारी !

नंदी गेली तेव्हा
तिच्या डोळ्यातलं भलंमोठ्ठ
धरण फुटलं होतं,
सारं जग जे तिनं तिजभोवती
सामावून घेतलं होतं
सारं सारं वाहून गेलं,
जेव्हा सगळा विसर्ग झाला तेव्हा
माया राखून ती
स्वयंपाकघरात वळली
तेव्हा तिच्या पाठीवर
काही वळ पाहिले
ओसरत जाणारे !

माझ्या नशेची आवर्तने
सा-या जगण्यास वेढून
आहेत
अश्यात जेव्हा काळपक्षी
घोंघावू लागतात तेव्हा
ती पारव्यांना
धान्य घालू लागते,
काळपक्ष्यांना ध्येयापासून
दूर करण्यासाठी
तिच्या मरणाच्या,,
तशी ती मरणलाही भीत नाही,
भिते ती तिच्या मरणानंतरच्या
आमच्या मरणाला !

गावांतली शेणसड्यावरची रांगोळी
ती आजही घालते
ह्या शहरातल्या सिमेंटच्या
पृष्ठभागावर
पण त्यावेळी तिच्या
डोळ्यातून ओघळणारे आश्रू
आजही त्या गावातील
प्राचीन नदीलाच
मिळत असतील
ह्याची मला तिळमात्रही शंका नाही !

विजयकुमार कणसे………

23 जुलै, 2013, मुंबई,

Group content visibility: 
Use group defaults

वा!