Odd Man Out (भाग १४)

Submitted by nimita on 13 March, 2019 - 02:09

नम्रताच्या प्रश्नार्थक चेहेऱ्याकडे बघून संग्राम पुढे म्हणाला,"अशी काय बघतीयेस माझ्याकडे? मी काही उगीच तुझी तारीफ करायला म्हणून नाही म्हणालो ..खरंच आहे ते. नॉर्मली जरी तू अगदी एखाद्या गरीब गाईसारखी असलीस ना तरी crisis situation मधे या गायीची शेरनी झालेली पाहिली आहे मी...तुझी आजी जेव्हा ICU मधे होती तेव्हा स्वतःचं दुःख बाजूला ठेवून तू तुझ्या बाबांचं घर आणि हॉस्पिटल या दोन्ही आघाड्या किती समर्थपणे सांभाळल्या होत्यास ते माहितीये मला." त्याचं हे वाक्य ऐकून नम्रता अजूनच बुचकळ्यात पडली. "पण तेव्हा तर तुला सुट्टी मिळाली नव्हती म्हणून तू येऊ शकला नव्हतास.. मग तुला..."

"हम फौजी हैं मॅडम।" नम्रताचं वाक्य मधेच तोडत संग्राम म्हणाला,"हमारे जासूस चारों तरफ फैले होते हैं।"

हे म्हणतानाचा त्याचा एकंदर हावभाव बघून नम्रताला खुदकन हसू आलं.आणि तिला तसं हसताना बघून संग्रामला हायसं झालं. पण आपलं बोलणं तसंच पुढे चालू ठेवत तो म्हणाला,"आजी गेल्यानंतर जेव्हा मी दोन दिवसांची सुट्टी घेऊन आलो होतो, तेव्हा मी स्वतः बघितलंय.. इतरांसमोर धीरानी उभे राहिलेले तुझे बाबा - तू समोर दिसताच तुझ्या कुशीत शिरून अक्षरशः एखाद्या लहान बाळासारखे रडत होते, आणि तू आपलं दुःख बाजूला ठेवून त्यांना धीर देत होतीस, त्यांचे डोळे पुसत होतीस. खरं सांगू का नम्रता ..त्या क्षणी मला तुझा इतका अभिमान वाटला होता ना....त्या वेळचं तुझं वागणं अगदी एका सैनिकाच्या पत्नीला साजेसं होतं. आणि माझ्या या अशा बायकोला तू इमोशनल फूल म्हणतीयेस ?? How dare you ?" संग्रामच्या तोंडून स्वतःची इतकी तारीफ ऐकताना नम्रताला खूपच अवघडल्यासारखं होत होतं. आजपर्यंत कधीच त्यानी आपल्या भावना इतक्या स्पष्ट शब्दांत व्यक्त नव्हत्या केल्या. त्याला मधेच थांबवत ती म्हणाली," पुढच्या दोन वर्षांची कसर आत्ताच भरून काढतोयस की काय ? एका दमात इतकी वाक्यं ? आता मला काय वाटतंय माहितीये...मी असं अधून मधून रुसून बसायला पाहिजे, म्हणजे मला मनवण्याच्या निमित्तानी का होईना तू असं खूप काही बोलशील तरी माझ्याशी !"

तिनी त्याला असं कोंडीत पकडलेलं बघून संग्राम गमतीनी म्हणाला," हो, आपल्यासाठीच लिहिलंय ते गाणं...तुम रुठी रहो , मैं मनाता रहूँ.... "

"विषय कसा बदलायचा हे तुझ्याकडून शिकावं," नम्रता म्हणाली. "पण तू मगाशी जे म्हणालास ना की जर गरज पडली तर मी माझं दुःख बाजूला ठेवून समोरच्या प्रसंगाला हँडल करते..!"

"क्यूँ ? कोई शक़ ?" संग्रामनी त्याचा ठेवणीतला आवाज काढत फौजी स्टाईल मधे तिला विचारलं. त्यावर नकारार्थी मान हलवत ती म्हणाली, "शक़ मला नाहीये, पण इतर बऱ्याच जणांना आहे.. मी मागच्या वेळी जेव्हा पुण्यात SFA मधे राहात होते ना, तेव्हा अथर्वची मुंज झाली होती ..आठवतंय ना तुला ? पण तू तेव्हा कारगिल मधे होतास आणि Operation Vijay चालू होतं, त्यामुळे तुला अजिबात सुट्टी नव्हती मिळाली. सुरुवातीला दादा आणि वहिनी थोडे खट्टू झाले होते,पण मग त्यांना बॉर्डर वरच्या परिस्थितीचं गांभीर्य कळल्यावर ते शांत झाले . त्या पूर्ण समारंभात मी आणि नंदिनीनी तुला इतकं मिस केलं होतं माहितीये ! पदोपदी मला तुझी आठवण येत होती, त्या दिवशी मी मुद्दाम तू मला गिफ्ट केलेली पैठणी नेसले होते. तुला आवडतं तशी तयार झाले होते.. तू जवळ नसतानाही तू असल्याचा भास होत होता.फॅमिली ग्रुप फोटोमधे बाकी सगळे होते, फक्त तूच नव्हतास. पण तरी माझी फीलिंग्ज् चेहेऱ्यावर दिसू नयेत याची मी पूर्ण खबरदारी घेतली होती. इतक्या आनंदाच्या प्रसंगी आपलं दुःख जगजाहीर कशाला करायचं म्हणून !! मी तोंडदेखलं सगळ्यांशी हसून बोलत होते पण मनात सतत एक प्रकारची धास्ती होती..'आत्ता तिकडे बॉर्डरवर काय चालू असेल ?' पंक्तीत बसून जेवताना, आमरस पुरी खाताना प्रत्येक घासाला तुझी आठवण येत होती- 'तिकडे त्याला जेवायला वेळ मिळाला असेल का?'

त्या दिवशी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचा एकच प्रश्न- 'हे काय! घरचं कार्य आणि संग्राम नाही आला ?' काही जण तेवढ्यावरच नाही थांबले..जेव्हा मी सुट्टी न मिळाल्याचं कारण सांगितलं तर म्हणाले," हे तर नवीनच ऐकतोय...घरातल्या इतक्या महत्वाच्या कार्यक्रमासाठी पण सुट्टी नाही ? अजबच आहे सगळं..." मला त्या लोकांना ओरडून सांगावंसं वाटत होतं की- 'जर आत्ता तो सुट्टी घेऊन इकडे आला तर आपल्याला सगळ्यांना या जगातून कायमची सुट्टी मिळेल.'

माझं तरी ठीक आहे पण नंदिनीला सुद्धा " काय गं, बाबा नाही आले का तुझे?" असं विचारत होते सगळे. आणि प्रत्येक वेळी तिचा तो कावराबावरा चेहेरा बघून मला अजूनच वाईट वाटत होतं. तिनी जेव्हा अथर्वला दादाच्या मांडीवर बसलेलं बघितलं ना तेव्हा मात्र तिला तुझी खूप आठवण आली आणि ती माझ्या कुशीत शिरून रडायला लागली. इथे मी एकीकडे तिला शांत करायचा प्रयत्न करतीये तेवढ्यात माझ्या शेजारी बसलेल्या वहिनीच्या एक काकू का मामी- ज्यांची आणि माझी धड ओळ्खसुद्धा नव्हती- मला म्हणाल्या,'फक्त मुलीलाच येतीये वाटतं बाबांची आठवण !!! आई तर खूप खुशीत दिसतीये सकाळपासून ...'

त्यांना काय अधिकार होता रे असं कुचकटपणे बोलायचा ? खरं सांगू संग्राम, त्या दिवशी तुझी आठवण येऊनही मला इतका त्रास नव्हता झाला जितका त्यांचं ते एक वाक्य ऐकून झाला. मनात आलं, चांगलं सुनवावं यांना.. तू म्हणतोस ना तसं अगदी 'left right and centre ' !! पण मी काहीच न बोलता गप्प बसले. उगीच समारंभात वाद विवाद नकोत ! आणि तसंही मी कितीही समजावून सांगितलं असतं तरी त्यांना ते कळलंच नसतं.. त्यासाठी जी तारतम्यबुद्धी लागते ती त्यांच्याकडे नाही हे दिसतच होतं."

हे सगळं सांगत असताना नम्रताच्या डोळ्यांत दिसणारी वेदना, तिच्या मनाची व्यथा संग्रामला सुन्न करून गेली. हे सगळं आज पहिल्यांदाच कळत होतं त्याला.. आपल्यामागे आपल्या बायकोला आणि मुलीला या अशा प्रसंगांनाही सामोरं जावं लागत असेल अशी कल्पनाही कधी त्याच्या मनात आली नव्हती. आता नम्रताच्या 'Odd Man Out ' या भावनेचा अर्थ त्याला लक्षात यायला लागला होता.त्याच्याही नकळत त्यानी शेजारी बसलेल्या नम्रताच्या खांद्याभोवती आपला हात टाकून तिला जवळ घेतलं. त्या हाताच्या विळख्यात नम्रता विसावली. इतका वेळ भिरभिरणारं तिचं व्यथित मन आता हळूहळू शांत होत होतं. पण हा सगळा प्रसंग ऐकून संग्राम मात्र खूप डिस्टर्ब झाला. त्याच्या मनात आलं,'हा तर एकच प्रसंग कळलाय आपल्याला..आणि तोही नम्रतानी सांगितला म्हणून. पण आत्तापर्यंत अजून बरंच काही झालं असेल जे मला माहीतच नाहीये.' नम्रताच्या खांद्यावरची त्याच्या हाताची पकड अजून थोडी घट्ट झाली. 'बिचारी, माझ्यामागे अजून कायकाय सहन केलं असेल हिनी !'

दोघंही आपापल्या विचारांत गुंग होऊन कितीतरी वेळ तसेच बसून होते...समोरचं कडुनिंबाचं झाड आपल्या फांद्यांनी त्यांच्यावर सावली धरून उभं होतं !!!

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॉर्डरवर वॉरसदृश्य मिशनवर असलेल्या सोल्जरबद्दल एका घरगुती इवेन्ट्ला न आल्याने असे प्रश्न विचारतात नातेवाईक??
आणि बायकोच्या भावाच्या मुलाची मुंज म्हणजे महत्वाचा कार्यक्रम? आणि त्यासाठी त्या सोल्जरने सैन्यातुन सुट्टी घेउन यावं अशी अपेक्षा?

मला कथेतला हा भाग पट्ला नाहीये. कारण माहित असताना असे प्रश्न कुणी विचारेल/असम बोलेल ह्याबद्दल मी जरा साशंक आहे.

(आमच्यातही बरेच भोचक नातेवाईक आहेत आणि ते काय काय विचारु शकतात/बोलु शकतात त्याचीही कल्पना आहेच Happy )

सस्मित, आपण स्वतः चांगल्या मनाच्या आणि matured असल्यामुळे कदाचित तुम्ही अशी कल्पना करू शकत नसाल. पण मी स्वतः एका आर्मी ऑफिसरची पत्नी आहे आणि त्यामुळे ज्यांना सैनिकी आयुष्याची गंधवार्ता ही नाही असे लोक काय काय प्रश्न विचारू शकतात हे मला चांगलंच माहित आहे. अर्थात Odd Man Out ही कथा माझी वैयक्तिक कथा नसून समस्त सैनिकी परिवारांचं प्रतिनिधित्व करणारी, त्यांचे अनुभव सांगणारी कथा आहे.. भलेही वाचकांचा विश्वास बसो अथवा ना बसो.. पण जे सत्य आहे ते या कथेत लिहिलं आहे.

सस्मित, आपण स्वतः चांगल्या मनाच्या आणि matured असल्यामुळे कदाचित तुम्ही अशी कल्पना करू शकत नसाल. पण मी स्वतः एका आर्मी ऑफिसरची पत्नी आहे आणि त्यामुळे ज्यांना सैनिकी आयुष्याची गंधवार्ता ही नाही असे लोक काय काय प्रश्न विचारू शकतात हे मला चांगलंच माहित आहे. अर्थात Odd Man Out ही कथा माझी वैयक्तिक कथा नसून समस्त सैनिकी परिवारांचं प्रतिनिधित्व करणारी, त्यांचे अनुभव सांगणारी कथा आहे.. भलेही वाचकांचा विश्वास बसो अथवा ना बसो.. पण जे सत्य आहे ते या कथेत लिहिलं आहे.>>>> ओह! खुपच वाईट. निमिताचा पुन्हा तिथे न जाण्याचा निर्णय अगदीच पटतोय मग. अशा नातेवाईकांपासुन लांब रहाणंच योग्य.

बापरे असा कुणी विचार कसा करू शकतो ? त्या लहान मुलीला कसं वाटलं असेल ......,आणि बायकोची अवस्था तर विचारच करू शकत नाही आपण ....सैनिक शहीद झाल्यावर जेवढी फुले उधळता त्यापेक्षा तो हयात असताना त्याला आणि त्याच्या कुटुंबाला योग्य तो मानसन्मान द्या म्हणजे झालं

छान लिहिताय,
भरपूर लिहा,आम्ही कौतुकानी अभिमानानी आणि काळजीनी वाचतोय...:)

धन्यवाद निमिता , आयुश्याची एक वेगळीच बाजू कळतेयं .
तुमच्या पहिल्या मालिकेतून एक वेगळं आयुश्य कळून येतं , आणि विषयही फार वेगळा आहे.

१३-१४ दोन्ही भाग आता वाचले ...खूपच छान झालेत...एका आर्मी ऑफिसर च्या बायकोची मनस्थिती किती सुंदर रीतीने मांडलीय तुम्ही...आता पर्यंत आर्मी क्वार्टरस् मधले लाईफ कित्ती छान disciplined असेच वाटायचे..पण तुम्ही दुसरी बाजू पण दाखवली की सिविलायन्स बरोबर राहताना त्यांना किती प्रसंगाना सामोरे जावे लागते..धन्यवाद...आणि पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत Happy