रुटीनात आहेस तू रोज माझ्या

Submitted by रसप on 7 March, 2019 - 23:46

इथे रोजचा ओढणे तोच गाडा
जरी कुरकुरे वंगणाच्या विना
दिवस आजचा कालची फक्त कॉपी
उजाडून येतो नव्याने जुना

परीघातली धाव कंटाळवाणी
तरी त्यातही एक आहे मजा
रुटीनात आहेस तू रोज माझ्या
तुला पाहणे, स्पर्श मलमल तुझा

तुला ओढ लावायचा छंद आहे
मला धावणे रोज आहे अटळ
तुझ्या क्यूट हातात मी बोट देता
स्वत:चे दिसे रुक्षपणही निखळ

तुझा कोवळा स्पर्श भासांत असतो
तुझा गंध श्वासांत रेंगाळतो
दिवसभर जरी दूर असलो तरीही
तुझ्या पास बाबा तुझा राहतो

व्यथांचा निखारा क्षणार्धात शमतो
लपेटून घेताक्षणी मी तुला
तुझ्या बोळक्या हासण्याने फुलवतो
सुखाच्या कळ्या मुग्ध, माझ्या मुला

....रसप....
७ मार्च २०१९
http://www.ranjeetparadkar.com/2019/03/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे कविता.

शीर्षकात तू - तु दोनदा झालंय की तसंच लिहायचंय

शीर्षकात तू - तु दोनदा झालंय की तसंच लिहायचंय

Submitted by सस्मित on 8 March, 2019 - 10:52

>>
पुढच्या ओळीचं पाहिलं अक्षर चुकून कॉपी झालं होतं. संपादित केले. धन्यवाद !

सुंदर...

गोडच... Happy