Odd Man Out (भाग १२)

Submitted by nimita on 6 March, 2019 - 22:41

ठरल्याप्रमाणे नम्रता मुलींना मनप्रीत च्या घरी सोडून आली. अंगद वाटच बघत होता मुलींची. मुलींना रिकाम्या हाती आलेलं बघून त्यानी पहिला प्रश्न केला," मेरा बर्थडे गिफ्ट कहाँ है ? " त्याचं गिफ्ट संध्याकाळी पार्टीमधे देऊ, असं आश्वासन दिल्यानंतर मगच तो शांत झाला आणि ते सगळे गुरुद्वारा ला जायला निघाले.संध्याकाळच्या पार्टीत मुलांना द्यायची रिटर्न गिफ्ट्स पॅक करायची राहिली होती. 'तेवढीच आपली मदत होईल' असा विचार करून नम्रता ती सगळी गिफ्ट्स घरी घेऊन आली. मुली आणि संग्राम घरी नसल्यामुळे घर कसं शांत शांत होतं. एकीकडे स्वैपाक करता करता नम्रतानी घरातली बाकी रुटीन कामं उरकून घेतली. आज त्यांचा दोघांचाच स्वैपाक होता त्यामुळे नेहेमीपेक्षा लवकरच ती किचनमधून बाहेर पडली. संग्राम यायला अजून अवकाश होता. नम्रतानी स्वतःसाठी मस्त आलं घातलेला चहा बनवून घेतला आणि एकीकडे चहा पिता पिता रिटर्न गिफ्ट्स पॅक करायला बसली. हात सफाईनी काम करत होते पण मनात विचार चालूच होते. गेल्या चोवीस तासांत तिचं मन कुठे कुठे जाऊन फिरून आलं होतं. अगदी गणपतीपुळ्याच्या त्यांच्या घरापासून ते डेहराडून च्या लिचीच्या झाडापर्यंत!

पण इतक्या भराऱ्या घेऊन सुद्धा आता पुन्हा पुन्हा संग्रामनी सकाळी विचारलेल्या त्या एकाच प्रश्नाभोवती ते रुंजी घालत होतं...अगदी बहिणाबाईंच्या कवितेत म्हटल्यासारखं....

मन वढाय वढाय उभ्या पिकांतलं ढोर

किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर

आणि संग्रामचा तो प्रश्न होता..'तुला पुण्यात का नाही राहायचं?'

प्रश्न जितका सोपा होता तितकंच त्याचं उत्तर अवघड होतं.....अवघड होतं म्हणण्यापेक्षा थोडक्या, मोजक्या शब्दांत सांगता येणं कठीण होतं. पण नम्रताच्या दृष्टीनी खरा प्रॉब्लेम हा नव्हताच मुळी. तिच्या पुण्यात न राहण्याच्या निर्णयाचं समाधानकारक स्पष्टीकरण होतं तिच्याकडे...पण तिला एकाच गोष्टीची काळजी होती..आणि ती म्हणजे...तिच्यासाठी इतकी महत्वाची असलेली ही सगळी कारणं संग्रामला पटतील का नाही?

कारण ती जितकी इमोशनल होती, संग्राम तितकाच प्रॅक्टिकल होता. संग्रामला अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या घटना नम्रताच्या मनाला मात्र चटका लावून जायच्या. आणि मग नंतर कितीतरी दिवस ती त्याच घटनेचा, त्यातल्या पात्रांचा विचार करत बसायची..त्यांच्यासाठी हळवी व्हायची. आणि तिचा हा स्वभावाच संग्रामला नेहेमी कोड्यात टाकायचा.

आणि म्हणूनच आजही नम्रताचा पुण्याला न राहण्याचा निर्णय ऐकून संग्राम विचारात पडला होता. ऑफिसमधे पोचेपर्यंत त्याच्या मनात हेच सगळे विचार घोळत होते.

पाच वर्षांपूर्वी जेव्हा तो फील्डवर गेला होता तेव्हा पूर्ण विचाराअंती त्यांनी दोघांनी मिळून पुण्यात SFA घ्यायचा निर्णय घेतला होता. त्यावेळी, नुसत्या त्या कल्पनेनीच नम्रता किती खुश झाली होती. किती किती प्लॅन्स बनवले होते तिनी- पुण्यातल्या त्या दोन अडीच वर्षांत काय काय करायचं त्याचे. तेव्हाचा तिच्या चेहेऱ्यावरचा तो आनंद, ती excitement आज राहून राहून संग्रामला आठवत होती. असं असताना आज अचानक तिनी पुण्यात न राहण्याचा निर्णय का घेतला असावा - हा प्रश्न संग्रामला सतावत होता. तिचा हळवा स्वभाव तो ओळखून होता. अगदी नॉर्मल वाटणाऱ्या घटना, प्रसंगही तिला इमोशनली डिस्टर्ब करुन जायचे.आणि त्यामुळे तिची होणारी भावनिक ओढाताण, मनःस्ताप हे सगळं काही संग्रामनी अगदी जवळून बघितलं होतं.इतर वेळी बोलघेवडी असलेली नम्रता अशावेळी मात्र अगदी अंतर्मुख होऊन जायची. तिच्या या अशा स्वभावामुळेच त्याला काळजी वाटत होती.. असं काय झालं असावं की ज्यामुळे नम्रता आता पुण्यात राहायला तयार नाहीये? कधी एकदा ऑफिसमधून घरी जातोय आणि नम्रताशी बोलतोय असं झालं होतं त्याला.

शेवटी एकदाची ती वेळ आली. दुपारी दोघांची जेवणं आटोपल्यानंतर नम्रतानी स्वतःच तो विषय काढला."तुला माझ्या निर्णयामागचं कारण हवं आहे ना.. तसं एक स्पेसिफिक कारण नाहीये सांगता येण्यासारखं.. In general, त्या दोन वर्षांत मला जे काही अनुभव आले, किंवा मी जे काही observe केलं त्यावरून आता मला असं वाटतंय की पुण्यात नको राहायला."

नम्रताचं हे असं vague बोलणं ऐकून संग्राम अजूनच गोंधळला. "अगं, पण मागच्या वेळी तूच तर म्हणाली होतीस ना की - जर तू पुण्यात राहिलीस तर नातेवाईकांच्या, मित्र मैत्रिणीच्या सहवासात माझा दुरावा तुला जास्त जाणवणार नाही म्हणून.... आणि तसंही आपण कायम घरापासून लांब राहिल्यामुळे आपल्या घरचे, तुझ्या माहेरचे कितीतरी इव्हेंट्स तुला अटेंड नाही करता येत..पुण्यात राहिल्यामुळे तुझी ती खंत पण दूर झाली होती ना तेव्हा! मग असं काय झालं त्या दोन वर्षांत की तू आता तिथे राहायचं नाही असं ठरवलंस ?" संग्राम भरभरून बोलत होता.."आणि नेहेमी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तू माझ्याबरोबर शेअर करतेस ना, मग गेली पाच वर्षं तू या सगळ्या बद्दल मला काहीच नाही बोललीस ? नक्की काय चाललंय तुझ्या मनात.....I am clueless ! प्लीज यार, आता तरी सगळं सविस्तर सांग. This suspense is killing me now."

एरवी अगदी मोजून मापून बोलणाऱ्या संग्रामला असं घडाघडा बोलताना ऐकून नम्रता क्षणभर अवाक् झाली. त्याच्या मनातली चलबिचल त्याच्या चेहेऱ्यावर दिसत होती- त्याच्या शब्दांतून तिच्यापर्यंत पोचत होती. त्याला मधेच थांबवत ती म्हणाली," तू समजतोयस तसं सिरीयस काही नाहीये रे...आणि कदाचित तुला माझी कारणं अगदीच क्षुल्लक वाटतील, म्हणून मी इतके दिवस तुला काही नाही सांगितलं. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे...पुण्यात राहायच्या नुसत्या कल्पनेनीच मी खूप खुश झाले होते. केवढे प्लॅन्स बनवले होते. आणि खरंच सुरुवातीचे काही दिवस मी खूप एन्जॉय ही केले. नातेवाईक, मित्र मैत्रिणी सगळ्यांबरोबर राहायची संधी मिळाली. पण मग हळूहळू मला असं जाणवायला लागलं की कुठेतरी काहीतरी बदललंय. सगळी माणसं तीच, नातीही तीच, नात्यांमधलं प्रेम ही तेवढंच... एकमेकांबरोबरची धमाल, मजा सगळं सगळं अगदी तसंच.... आधीसारखं...पण आधी त्यांच्या त्या साच्यात अगदी फिट बसणारी मी...आता बदलले होते."

तिचं असं काहीसं विस्कळीत बोलणं ऐकून संग्राम अजूनच कन्फ्यूज झाला."तुला नक्की काय म्हणायचं आहे..प्लीज, मला समजेल अशा भाषेत सांगतेस का?" संग्रामचा पेशन्स हळूहळू कमी होत होता.

पण त्याचा तो प्रश्न नम्रतापर्यंत पोचलाच नव्हता बहुतेक...ती तिच्याच तंद्रीत बोलत होती..."आम्ही- म्हणजे मी आणि नंदिनी- खूप उत्साहानी त्यांना भेटायला जायचो, सगळ्या इव्हेंट्स मधे हजर राहायचो....खूप मजा यायची.. पण ते सगळं करत असताना मनात कुठेतरी सतत जाणवत राहायचं की "Everything is not the same now. कधी कधी वाटायचं, I don't belong here anymore. पण त्या अनुभवाला नक्की नाव नव्हते देऊ शकत मी !

एकदा नंदिनी होमवर्क करत होती, तेव्हा मधेच तिनी विचारलं,"आई, Odd Man Out कसा शोधायचा? आमच्या टीचरनी आज आम्हांला शिकवलं होतं..पण मी poem competition करता गेले होते ना म्हणून मला नाही कळलं. प्लीज, तू शिकव ना." तेव्हा मी तिला समजावून सांगत होते, "odd man म्हणजे जो ग्रुप मधल्या बाकीच्या वर्ड्स किंवा पिक्चर्स पेक्षा वेगळा असतो ना तो!" "पण मला तर या ग्रुप मधले सगळेच वर्ड्स सेम वाटतायत.." आपली होमवर्क ची वही मला दाखवत ती म्हणाली होती. त्यावर तिला अजून समजावत मी पुढे म्हणाले,"हो गं बाळा... तसं बघितलं तर सगळे वर्ड्स एकसारखेच असतात पण फक्त एक वर्ड इतरांपेक्षा थोडासा वेगळा असतो आणि म्हणून तो त्या ग्रुप मधे फिट बसत नाही..त्याला म्हणतात 'Odd Man Out' ...

शेवटी एकदाचं तिला समजलं..पण त्याचवेळी मलाही काहीतरी लक्षात आलं....मी आणि नंदिनी दोघीजणी 'Odd Man Out' होतो....आमच्या आजूबाजूच्या लोकांसारख्या पण तरीही काही बाबतीत त्यांच्या पेक्षा वेगळ्या......

आणि आमचं हे वेगळेपण इतरांना सुद्धा जाणवलं असावं. कारण त्या दोन वर्षांत- "नम्रता आता बद्दललीये बरं का!"- हे आणि अशा अर्थाची वाक्यं मी सगळ्यांच्या तोंडून बऱ्याचदा ऐकली आहेत." नम्रता तिच्या मनातली खळबळ शब्दांत मांडायचा प्रयत्न करत होती.

"अगं, पण लग्नानंतर थोड्याफार प्रमाणात सगळेच बदलतात..मला पण तर म्हणतात सगळे..'नम्रता आली आणि आमचा संग्राम अगदी बदलून गेला' म्हणून !! हे सर्वमान्य सत्य आहे. त्याला इतकं सिरियसली नसतं घ्यायचं." संग्रामनी त्याच्या स्टाईल मधे तडकाफडकी निर्णय सूनावला.

"बघ, म्हणूनच मी नव्हते सांगत तुला काही.." नम्रता एवढासा चेहेरा करून म्हणाली."मला माहीत होतं की तुला हे सगळं पटणार नाही. जाऊ दे, तुला कधीच नाही कळणार मला काय वाटतं ते!" आपल्या डोळ्यांतलं पाणी संग्रामला दिसू नये म्हणून लगबगीनी त्याच्या समोरून उठून जात ती म्हणाली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चालू आहे...odd man out ... वाटू शकते असे पूर्ण वेगळ्या वातावरणात राहत असताना

आमचे वडील, आर्मी मध्ये डॉक्टर होते, शॉर्ट टर्म सर्विस साठी. त्यांचे देखील हेच म्हणणे असते.. आर्मी वाला पटकन सिव्हिलीअन लोकांनशी relate नाही करू शकत.. विचारांची दिशा आणि देशाबद्दल ची बांधिलकी यात खूप फरक पडतो..