Odd Man Out (भाग ११)

Submitted by nimita on 4 March, 2019 - 00:03

एकीकडे संग्रामला काय आणि कसं सांगावं याचा विचार करत करत नम्रतानी स्वैपाकघरातली कामं हातावेगळी करायला सुरुवात केली. तिच्या अपेक्षेप्रमाणे काही मिनिटांतच संग्राम किचनमधे आला. तो नम्रताला काही विचारणार इतक्यात फोनची रिंग वाजली. एरवी सकाळी कामाच्या वेळेत कोणाचा फोन आला तर नम्रता खूप इरिटेट व्हायची. सकाळच्या कामाच्या घाईगर्दीत प्रत्येक मिनिट किमती असायचं, त्यामुळे अशावेळी बऱ्याचदा ती वाजणाऱ्या रिंग कडे दुर्लक्ष करायची. पण आज मात्र तिनी त्या फोन करणाऱ्या व्यक्तीचे मनोमन आभार मानले. "कोणाचा फोन आहे ते बघते मी, तोपर्यंत तू मुलींना उठव." असं संग्रामला सांगत तिनी फोनच्या caller id वरचं नाव बघितलं. मनप्रीतचा फोन होता.

"चला, अर्ध्या तासाची निश्चिंती झाली बगूनाना!" मनप्रीत चं नाव बघून संग्राम पु.ल.देशपांडेंच्या टोनमधे म्हणाला. हसत हसत त्याला मुलींच्या खोलीच्या दिशेनी ढकलत नम्रतानी फोन उचलला, "हाय मनप्रीत.. गुड मॉर्निंग. कैसी चल रही है पार्टी की तैय्यारी?" नम्रता नी विचारलं. तसं पाहता मनप्रीत चा नवरा हा संग्रामपेक्षा ज्युनिअर होता-त्याहिशोबानी खरं तर नम्रता मनप्रीत पेक्षा सिनियर होती. पण गेल्या काही महिन्यांत त्या दोघींमधे सिनियर-ज्युनिअर चं नातं न राहता दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. मनप्रीत ला जेव्हा जेव्हा काही सल्ला हवा असायचा तेव्हा ती सरळ नम्रताकडे धाव घ्यायची आणि नम्रता पण अगदी मोठ्या बहिणीच्या नात्यानी तिला जमेल तेवढी सगळी मदत करायची. आणि यात भर म्हणून अंगद आणि अनुजा यांचीही चांगलीच गट्टी जमली होती. त्यामुळे काही ना काही कारणानी त्या दोघींचं दिवसातून किमान एकदा तरी बोलणं व्हायचंच .... आणि संग्राम म्हणाला तसं त्यांचं संभाषण बराच वेळ चालायचं.पण आज मनप्रीत पार्टीच्या तयारीत बिझी असल्यामुळे लवकरच दोघीनी आपलं बोलणं आवरतं घेतलं.

मुलींच्या खोलीतून त्यांच्या आणि संग्रामच्या हसण्या खिदळण्याचे आवाज ऐकू यायला सुरुवात झाली. 'आज दोघींसाठी पर्वणीच आहे' नम्रताच्या मनात आलं,'सकाळी सकाळी त्यांना उठवायला त्यांचे बाबा घरात आहेत.'

दोन तीन वेळा हाका मारूनही जेव्हा तिघांपैकी कोणीच ब्रेकफास्ट साठी आले नाही तेव्हा नम्रताच मुलींच्या खोलीत गेली.खोलीतला एकंदर प्रकार पाहून तिनी डोक्यावर हात मारून घेतला.तिघं मिळून 'दुकान दुकान' खेळत होते. नंदिनी दुकानाची मालक होती, संग्राम गिऱ्हाईक आणि अनुजा त्याला त्यांच्या कपाटातून एक एक कपडे काढून दाखवत होती..." ये देखिये सर...कितनी सुंदर फ्रॉक है। " स्वतःचा एक फ्रॉक संग्रामसमोर ठेवत अनुजा म्हणाली. संग्रामनी पण अगदी खरंच गिर्हाईक असल्यासारखं विचारलं,"इसमें बडा साईझ दिखाईए ना।" मग अनुजा नी तिच्या कपड्यांच्या ढिगात नंदिनीचे पण कपडे आणून टाकले..नंदिनी पण अगदी मालकाच्या तोऱ्यात अनुजाला सूचना देत होती. शेवटी संग्रामनी एक फ्रॉक सिलेक्ट केला आणि विचारलं," ये कितने का है?" अनुजानी सांगितलेल्या किमतीला ओके म्हणत त्यानी खोटे खोटे पैसे पुढे केले..ते बघून नंदिनी एकदम म्हणाली," अहो बाबा, असे लगेच नसतात द्यायचे पैसे. आधी म्हणायचं," नहीं भैय्या..ठीक ठीक लगाओ।" नंदिनीचं बोलणं ऐकून संग्राम आणि नम्रता दोघांनाही एकदमच हसू फुटलं. त्यांना दोघांना असं जोरजोरात हसताना बघून नंदिनी गोंधळून गेली आणि म्हणाली," खरंच ...आई नेहेमी असंच म्हणते..हो ना गं आई ?"

आपलं हसू कसंबसं आवरत नम्रता म्हणाली,"सकाळी सकाळी हा सगळा पसारा काढायची काय गरज होती तुम्हांला?" संग्रामकडे बघत,त्याला दटावत ती पुढे म्हणाली," आणि तू सुद्धा त्यांना सामील झालास !"

"अगं, मी फक्त विचारलं की - आज अंगदच्या घरी जाताना कोणते कपडे घालणार- तर त्यांनी दुकानच मांडलं.." आपली बाजू मांडत संग्राम म्हणाला. आता आई रागवेल की काय - या भीतीनी पांढरं निशाण फडकवत नंदिनी अनुजा ला म्हणाली," अनुजा, चल, आपण दोघी मिळून सगळा पसारा आवरू पटापट." अनुजाला पण संभावित धोक्याची कल्पना आल्यामुळे ती पण काही न बोलता नंदिनीला मदत करायला लागली. 'आईला खुश करायला' म्हणून चाललेली त्यांची ती लगबग बघून नम्रताची मात्र करमणूक होत होती. एकीकडे त्यांना मदत करत ती म्हणाली," आता तुमचं हे दुकान बंद करा आणि लवकर तयार व्हा. आत्ताच मनप्रीत आंटीचा फोन आला होता. आंटी, अंकल आणि अंगद सकाळी गुरुद्वारा मधे जाणार आहेत - आज अंगदचा वाढदिवस आहे ना म्हणून. तुम्हांला दोघींना पण बोलावलं आहे त्यांनी. जाणार आहात का दोघी? जर जाणार असाल तर अंघोळ करून लवकर तयार व्हा."

"गुरुद्वारा ? Wow !!" दोघी मुली एकदम म्हणाल्या. त्यांना दोघींना गुरुद्वारा मधे जायला खूप आवडायचं, आणि त्याच्यामागचं खरं कारण होतं- तिथे मिळणारा 'कडा प्रशाद'- साजूक तुपात बनलेला प्रसादाचा शिरा. एकदा सहज बोलता बोलता नम्रतानी हे मनप्रीत ला सांगितलं होतं आणि तेव्हापासून दर वेळी गुरुद्वाराला जाताना मनप्रीत अगदी आठवणीनी दोघी मुलींना घेऊन जायची.

गुरुद्वाराला जायचं म्हणून मुली सुपरफास्ट स्पीडनी तयार झाल्या. तोपर्यंत संग्राम सुद्धा ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन ब्रेकफास्ट करायला आला. डायनिंग टेबल वर कॅसेरोल मधे उपमा बघून मुलींनी नाकं मुरडली. पण आईसमोर खाण्याच्या बाबतीतले कोणतेही नखरे चालत नाहीत हे माहीत असल्यामुळे त्यांचा नाईलाज होता. तेवढ्यात नंदिनीच्या सुपीक डोक्यात एक भन्नाट आयडिया आली.. आणि -"आत्ता खाल्लं तर मग प्रशाद खायला भूक नाही राहणार"- हे कारण सांगून दोघी फक्त दूध पिऊन बाहेर बागेत पळाल्या.

"कसं सुचतं ना ह्यांना!" त्या गेल्यावर नम्रता म्हणाली. एकीकडे गाडीची किल्ली उचलत संग्राम म्हणाला,"हो ना,...अवघड situation मधून काढता पाय कसा घ्यायचा हे अगदी बरोब्बर जमतं त्यांना.. या बाबतीत अगदी त्यांच्या आईवर गेल्याएत दोघी." त्याच्या या टोमण्याचा रोख कुठे आहे हे नम्रताला कळत होतं. ती काही बोलणार तेवढ्यात तोच पुढे म्हणाला," आत्ता मी घाईत आहे म्हणून ..पण दुपारी मात्र मला तुझ्याकडून पुण्यात न राहायचं खरं कारण हवं आहे."

त्याला दारातच थांबवत नम्रता म्हणाली," मी अजिबात 'काढता पाय' वगैरे घेत नाहीये. फक्त माझी कारणं तुला कितपत पटतील याबद्दल मला जरा शंका आहे.. बाकी काही नाही." संग्रामनी मारलेला टोमणा तिला जरा जास्तच बोचला होता. तिची हळवी नजर बघून संग्रामला ते जाणवलं. 'आपण जरा जास्तच बोललो की काय' असं वाटून तो भांबावला. नम्रताच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला," मला तसं नव्हतं गं म्हणायचं. पण कालपासून तुझ्या मनात खूप काहीतरी चाललं आहे हे मला जाणवतंय. पण ते नक्की काय आहे हे तू सांगत नाहीयेस,म्हणून मी वैतागून तसं बोलून गेलो.आणि राहता राहिला मला 'पटण्याचा' प्रश्न... तू सांगून तर बघ. कदाचित मला पटेल तुझं म्हणणं." त्याचं बोलणं ऐकून नम्रताला धीर आला. कालपासून विचारांच्या वावटळीत भरकटणारं मन थोडं शांत झालं. ती संग्रामला म्हणाली "ठीक आहे, आज दुपारी आपण नक्की बोलू या विषयावर."

"Good, आता जरा हसून बाय करा या पामराला" तिचा मूड ठीक व्हावा म्हणून तिच्यासमोर हात जोडून उभा राहात संग्राम म्हणाला. त्याची ती नौटंकी बघून नम्रताही खुदकन हसली आणि त्याला 'बाय' करून आत वळली. संग्रामनी पण एक सुटकेचा निःश्वास सोडला आणि बागेत खेळणाऱ्या मुलींना 'बाय बाय' म्हणत ऑफिसला जायला निघाला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users