Odd Man Out (भाग १०)

Submitted by nimita on 28 February, 2019 - 04:21

संग्रामच्या प्रश्नांचा मारा चुकवून नम्रता घरात आली खरी, पण तिला खात्री होती की - आज ना उद्या तिला त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच लागणार होतं. त्याचा स्वभाव ती ओळखून होती. जोपर्यंत एखाद्या गोष्टीचं समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा पिच्छा पुरवल्याशिवाय राहायचा नाही तो . खरं म्हणजे त्याच्यापासून लपवण्यासारखं काहीच नव्हतं...पण पुण्याला न राहण्याबद्दलची तिची कारणं त्याला पटतील की नाही याबद्दल नम्रताला शंका होती.

तसं पाहता, आजपर्यंत जेव्हाही काही महत्वाचे निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी दोघांनी आधी त्याबाबतीत एकमेकांशी बोलून, नीट डिस्कस करून मगच एकमतानी सगळे निर्णय घेतले होते..... पाच वर्षांपूर्वी जेव्हा संग्राम ची फील्ड पोस्टींग आली होती तेव्हा नम्रता दुसऱ्या वेळी प्रेग्नंट होती. फील्ड असल्यामुळे साहजिकच संग्रामबरोबर तिकडे जाणं तिला शक्य नव्हतं.तेव्हा तिनी आणि नंदिनी नी कुठे राहावं याबद्दल दोघांनी खूप विचार केला होता. खरं म्हणजे संग्रामच्या आई वडिलांकडे राहण्याचा ऑप्शन होता, पण त्याच्या आईच्या मते, नम्रताच्या तेव्हाच्या शारीरिक कंडिशन मधे तिनी त्यांच्या घरी राहणे योग्य नव्हतं. कारण त्या दिवसांमधे ते दोघं नुकतेच नाशिकहून त्यांच्या गणपतीपुळ्याच्या घरात शिफ्ट झाले होते. आणि गणपतीपुळ्याला नम्रताची डिलिव्हरी करण्यापेक्षा पुण्यात करावी असं त्यांचं स्पष्ट मत होतं.त्यासाठी त्या स्वतः पुण्याला नम्रता बरोबर राहायला तयार होत्या.

रिटायरमेंट नंतर आपल्या वडिलोपार्जित घरात जाऊन राहायची संग्रामच्या आईची बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती . त्यांच्या लहानपणापासूनच त्यांना समुद्राचं खूप आकर्षण होतं.

कधी कधी चेष्टेच्या मूड मधे आल्या की त्या नम्रताला म्हणायच्या," अगं, तुला म्हणून सांगते... ह्यांना होकार देण्यामागे मुख्य कारण होतं- ह्यांचं गणपतीपुळ्याचं घर....जेव्हा आम्ही पहिल्यांदा ह्यांच्या घरी गेलो होतो ना..चहा पोह्याच्या कार्यक्रमासाठी...तेव्हा यांचं घर बघून मी आधीच ठरवलं होतं- 'मुलगा कसा का असेना, मला पसंत आहे.' तसं मी हळूच माझ्या आईच्या कानात फुसफुसले देखील होते. त्यावर तिनी विचारलं होतं," मुलाला बघायच्या आधीच?" तेव्हा डोळे मिचकावत मी तिला म्हणाले होते," दिल आया घर पे..तो लडका क्या चीज़ है?" माझं ते बोलणं ऐकून आई मला दटावत म्हणाली होती," गप्प बस. वाह्यात कुठली!"

पण खरंच खूप आवडलं होतं मला यांचं ते घर ... समुद्रकिनाऱ्यापासून अगदी जवळ... घराच्या दिंडी दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला डावीकडे एका कोनाड्यात छोटीशी गणपतीची मूर्ती होती. तिच्या समोर एक छोटीशीच पणती तेवत होती. मूर्तीला जास्वंदीच्या लाल भडक फुलांचा हार घातला होता.माझ्या आईनी आत जाता जाता त्या मूर्तीसमोर हात जोडले होते.." देवा माझ्या मुलीचं लग्न ठरू दे" हेच मागितलं असणार मनातल्या मनात.. दिंडी दरवाज्यातून थोडं वाकून आत गेल्यावर जेव्हा मी समोर पाहिलं ना....अहाहा! किती खुश झाले माहितीये घर बघून..समोर मोठं अंगण..त्यात बरोब्बर मध्यभागी एक मोठ्ठं तुळशीवृंदावन.. थोडं पुढे गेल्यावर डावीकडे विहीर होती आणि तिच्यावर एक रहाट सुद्धा होता.... घराच्या मागच्या परसात नारळाची झाडं होती, केळीची बाग पण होती छोटीशी.. आणि पडवीत एक मोठ्ठा लाकडी झोपाळा- पितळ्याच्या कड्या असलेला....छान चौसोपी, दुमजली घर होतं... टुमदार, कौलारू !! अगदी माझ्या स्वप्नातल्या घरासारखं....त्या क्षणी मी पण त्या कोनाड्यातल्या गणपतीची मनोमन प्रार्थना केली ..' गणपतीबाप्पा, या घरासारखाच हा मुलगा पण मला आवडू दे, आणि मुख्य म्हणजे त्याचाही होकार असू दे.' आणि ऐकलं बाई देवानी माझं...."

नम्रतानी त्यांचं हे स्वगत इतक्या वेळा ऐकलं होतं की आता तिचं पण सगळं पाठ झालं होतं. एकीकडे त्यांचं बोलणं ऐकता ऐकता तीही नकळत मनातल्या मनात हे सगळं बोलायला लागायची.पण त्यांच्या चेहेऱ्यावरचा तो आनंद बघून ती त्यांना मधेच न टोकता सगळं काही ऐकून घ्यायची. घरातले बाकी सगळे मात्र ' झाली सुरू सत्यनारायणाची कथा ..." असं म्हणत त्यांची चेष्टा करायचे. पण घरच्यांच्या चेष्टेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत त्या आपलं स्वगत चालूच ठेवायच्या," अगं नम्रता, आमचं लग्न झालं ना तेव्हा संग्रामचे बाबा तिकडेच पुळ्यामधेच नोकरी करायचे.जेमतेम वर्षभर राहिले असेन मी आमच्या त्या घरात- पण मग यांना नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमधे नोकरी मिळाली आणि आम्ही गणपतीपुळ्याहून नाशिकला शिफ्ट झालो. ते घर सोडून येताना मी इतकी रडले होते...आमच्या लग्नात माहेर सोडून सासरी जाताना पण एवढं वाईट नव्हतं वाटलं गं मला." इतक्या वर्षांनंतरही दर वेळी हे सगळं सांगताना त्या तितक्याच भावुक व्हायच्या.आणि म्हणूनच प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या दोन्ही मुलांना घेऊन चांगल्या दीड एक महिना गावातल्या घरात जाऊन राहायच्या. मग जेव्हा संग्रामचे बाबा रिटायर झाले तेव्हा मात्र त्यांनी दोघांनी कायमचंच गणपतीपुळ्याला जाऊन राहायचं ठरवलं.

पण तिथल्या पेक्षा पुण्यात अद्ययावत वैद्यकीय सुविधा असल्यामुळे नम्रतानी पुण्यात राहावं असा त्यांचा विचार होता.संग्रामच्या आईच्या बोलण्यात तथ्य होतं आणि म्हणूनच त्यावेळी गणपतीपुळ्याला राहायचा ऑप्शन नम्रतानी कॅन्सल केला. त्यामुळे मग राहता राहिला एकच पर्याय...आणि तो होता पुण्यात SFA घेऊन राहाणं. संग्रामला सोडून एकटं राहण्याची ती नम्रताची आणि नंदिनीची पहिलीच वेळ होती. त्यात भर म्हणून- नम्रता तेव्हा प्रेग्नंट होती.त्यामुळे संग्रामला थोडी काळजी वाटत होती, पण पुण्यात राहायचं ठरल्यामुळे त्याची ती काळजी दूर झाली.

त्यांच्या त्या निर्णयामुळे तिच्या माहेरची मंडळी आणि तिचे मित्र मैत्रिणी खूपच खुश झाले होते. आता किमान दोन वर्षं तरी त्यांना नम्रताचा सहवास मिळणार होता. खरं सांगायचं तर नम्रता पण खूप एक्साईटेड होती पुण्यात राहण्यासाठी. कारण लग्न झाल्यापासून ती कायम पुण्यापासून लांब राहिली होती. त्यामुळे नातेवाईकांकडचे सण समारंभ, मित्र मैत्रिणींची वरचेवर होणारी गेट टुगेदर्स, भावंडांच्या सरप्राईज पार्टीज् हे आणि असे अनेक आनंदाचे प्रसंग ती मिस करायची. प्रत्येक वेळी इतक्या लांबून येणं शक्य नसायचं, त्यामुळे तिला त्या कार्यक्रमांच्या फोटोज वरच समाधान मानावं लागायचं.

पुण्यात शिफ्ट होण्याच्या आधीपासूनच तिनी मनातल्या मनात प्लॅंनिंग करायला सुरुवात केली होती- मित्र मैत्रिणींबरोबर पिकनिकस, तिच्या खासम् खास मैत्रिणींबरोबर sleepovers , फॅमिली मेंबर्स चे वाढदिवस आणि anniversaries.... एक ना अनेक...खरंच खूप एन्जॉय करणार होती ती तिचं पुण्यातलं वास्तव्य ! तिच्या लग्नानंतर सगळ्यांची तिच्याकडे एकच तक्रार असायची..' तू जेव्हा जेव्हा पुण्यात येतेस तेव्हा नेहेमी घाईतच असतेस. आमच्यासाठी कधीच पुरेसा वेळ नसतो तुझ्याकडे .' त्या सगळ्यांची नाराजी दूर करायचं ठरवलं होतं तिनी.

आज इतक्या वर्षांनंतरही नम्रताला तेव्हाची तिची ती एक्साईटमेंट आठवली आणि स्वतःचीच गंमत वाटली .'खरंच, किती मजा केली होती त्या दोन वर्षांत पुण्याला' तिच्या मनात आलं,' संग्रामला सोडून सलग दोन वर्षं राहायची अशी ती पहिलीच वेळ होती. वाटलं होतं की कसं काय निभावणार सगळं ! पण बघता बघता ती दोन वर्षं संपली होती.'

संग्राम जेव्हा फील्डमधून परत आला होता तेव्हा पुण्याचं ते घर सोडून जाताना नम्रताला जितका आनंद झाला होता तितकंच वाईट पण वाटत होतं. बरंच काही दिलं होतं तिला त्या दोन वर्षांनी....खूप चांगल्या आठवणी, चांगले अनुभव...पण तरीही आता संग्रामच्या यावेळच्याच नव्हे तर भविष्यातल्या देखील कोणत्याही फील्ड tenure मधे नम्रताला पुण्यात SFA घेऊन राहायचं नव्हतं....तिचा निर्णय झाला होता....आणि त्यामागे कारणंही तशीच होती, फक्त ती सगळी कारणं संग्रामला सांगावी की नाही याच द्विधा मनस्थितीत नम्रता गेले दोन दिवस अडकली होती.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे

लिहीत रहा

आम्ही वाचत रहातो
Happy