सलाम सैनिका…..

Submitted by Asu on 26 February, 2019 - 07:23

आज २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश-ए-महंमदच्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राईक करुन १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाक अतिरेक्यांनी पुलवामा येथे CRPF च्या जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेतला त्या निमित्ताने -

सलाम सैनिका…..

सलाम सैनिका पुढे पुढेच जायचे
हद्द झाली आता, मागे न पहायचे ||ध्रु||

शाब्बास वायूवीर, घडविले तुम्ही स्फोट
केलेत उध्वस्त जैशचे, अड्डे बालाकोट
दिवस ते विसरा, खड्ड्यात पडायचे
शत्रू दफविण्या आता, खड्डे खोदायचे ||१||

असा अचानक केला, शूर हवाई हल्ला
झोपेत आठवला, असेल त्यांना अल्ला
पराक्रम तुमचा महान, तुम्हा वंदायचे
विसरू ना कधी, गीत तुमचेच गायचे ||२||

दिली वीरांनी ज्या, देशास्तव कुर्बानी
असतील ते स्वर्गात, आज समाधानी
वाया न रक्त त्यांचे, भूवरी सांडायचे
देऊन बलिदान, देशास्तव भांडायचे ||३||

प्रणाम तुम्हां शूर मातेच्या सुपुत्रांनो
अभिमान आम्हांस, तुमचा नरवीरांनो
रक्त जे सांडले ते, आता भडकायचे
ध्येय एक आमुचे, देशास्तव मरायचे ||४||

खुसपट काढण्या, माय कुणाची व्याली
मातेच्या रक्षणार्थ, कोटी कोटी वाली
बलिदान तुमचे असे, वाया न जायचे
थेंबाथेंबातून रक्ताच्या, स्फोट घडवायचे ||५||

बदल्याने आग वाढे, आम्हां न सांगायचे
नका सांगू आम्हां, आम्ही कसे जगायचे
भ्याड हल्ल्यांची सवय, किती सहायचे?
शेपटावर पाय दिला, तरी चूप बसायचे! ||६||

सुखाने जगायचे, आणिक जगू द्यायचे
सूत्र हेच आमचे, सर्व जगात पसरायचे
वारस आम्ही गांधींचे, अन् शिवरायांचे
शांत जरी आम्ही, दुबळे न समजायचे ||७||

प्रा. अरुण सु. पाटील (असु)
(दि.26.02.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults