फ्रेंच फ्राईज - शास्त्रिबुवांचे बासरीवादन २

Submitted by मकरंद गोडबोले on 23 February, 2019 - 20:06

शास्त्रिबुवांच्या हातातली बासरी, फ्रेंच फ्राईजमधे चांगलीच वाजली. जोशीकाकूंच्या आॅडिटनंतर फ्रेंच फ्राईजमधे उत्साहवर्धक काहीच घडले नव्हते. त्यामुळे ही बासरी घराघरात वाजायला लागली. तशी तिनी पहिली किंचाळी फोडल्यानंतर त्याच्यात बरीच सुधारणा होउ लागली होती. आता सहा भोकांमधली दोन तरी आवाजी होती. बाकिच्यांची अजूनही विपश्चना सुरू होती. ती बहुतेक शास्त्रिबुवांचे गुरु विपश्चनेला गेल्यामुळे असावी अशी आपली आमची अटकळ. पण त्या दोन बोलत्या भोकांनी शास्त्रिबुवांना भलतीच तरारी आलेली. नुसती बुवांनाच नाही, तर अख्ख्या फ्रेंच फ्राईजला तरतरी आलेली. गणपती उत्सवात, टीनानी बसवलेला, मिरची खाऊन कोंबडी पळाली, अशा कुठल्यातरी गाण्यावरचा नाच हा एकमेव सांस्कृतिक कार्यक्रम असायचा. बाकी आपल्या सोसायटीत काहीच टॅलंट नाही, गेला बाजार अगदी शिट्ट्या मारणाराही कुणी नाही, याचे एकंदरितच फ्रेंच फ्राईजला फार वाईट वाटायचे. तसे टिनाचे टॅलंट देखणे होते. पण ते उछ्रंखल या प्रकारात मोडते, असे कलपकाकांचे मत. त्यात सात्विक भाव नसायचा. शास्त्रिबुवांचा हा नवा उद्योग आपल्या सोसायटीत सात्विकपणा आणेल अशी त्यांना खात्री होती. बासरी म्हणजे काय, एकदम तूपसाखरेइतकी सात्विक. पण सध्यातरी शास्त्रिबुवांना बासरी सात्विक असते हे कळत नव्हते. त्यामुळे ते बासरी वाजवायला लागले, की सकाळी सकाळी, रंभेनी सोवळे नेसून, नुकतीच नदीतून ओलेती बाहेर येत असताना, तिच्या अंगावरून मोठ्यांदा शिट्टी मारत आगगाडी गेल्यासारखे त्यांना वाटायचे. म्हणजे अजून बासरिची दोन भोके तशीच वाजत होती. आगगाडीची शिट्टी दोन तारसुरात वाजते, नीट ऐका. अगदी बरोबर, हुबेहूब तशीच शास्त्रिबुवा दोन भोके वाजवायचे.
"हा सा वरचा लागलाय, त्याला जरा भूतलावर आणा" नानाकाका अनाहूत सल्ले आणि शिकवण्या देण्यात पटाईत. त्यामुळे त्यांना ही पर्वणीच होती. शास्त्रिबुवांनी चमकून बघितले. तर नानाकाका स्वर्गाकडे बोट दाखवत त्यांना सांगत होते, की हा सा, तिथला लागलाय म्हणून. आपले हे पिल्लू जन्मतःच इतक्या वर गेले हे बघू शास्त्रिबुवांना उमाळा आला. त्या हुंदक्यात तिसऱ्या भोकात जरा जोरात हवा गेली, आणि अचानक ते वाजले. अचानक तिसरे भोक वाजल्यामुळे शास्त्रिबुवांना आनंद झाला, आणि मगाशी सा ला वर पाठवल्यामुळे नानाकाकांवर चिडावे, का तिसरे भोक वाजवल्यामुळे त्यांना धन्यवाद द्यावे हे काही शास्त्रिबुवांना कळेना. वर आता यांना पोहेही द्यावे लागणार याचेही त्यांना वाईटच वाटत होते. त्यांच्या हिला मात्र सल्ले देणारे प्रत्येकजण बुवांवर किती उपकार करतायत असे वाटायचे, आणि मग चहांची फेरी परत व्हायची. त्यात तिची एकच मनापासून इच्छा होती, कुणितरी शास्त्रिबुवांना आता बासरी थांबवा असे सांगावे. पण हे कसे करणार हे तिला कळत नव्हते. वर्षापूर्वी तिचे भजनीमंडळ हे असेच कुणितरी म्युनिसिपाल्टित तक्रार करून, मान्य डिबी पेक्षा जास्त मोठा आवाज आहे, या सबबीवर बंद पाडले होते. हे पण शास्त्रिबुवांचेच काम असावे असा तिला दाट संशय होता. त्यामुळे बुवांची पण अशी तक्रार करता येईल असे तिनी जोशिकाकांना खेकडा भज्यांच्या आडून सांगून बघितले. पण त्यासाठी बाजरीतून आधी आवाज यायला लागतो, हे जोशीकाकांचे म्हणणे तिला खोडून काढता येईना. वर भजी पण वाया गेली. म्हणून मग हा विचार बारगळला.
तसे एकदा सवाई ऐकलंय, इतके मोठे क्वालिफिकेशन असलेले फ्रेंच फ्राईजमधे बरेच होते. त्या जोरावर शास्त्रिबुवांची बासरी ही वैश्विक पातळीवर नेऊन ठेवायची हा वसा, न सांगताच अनेकांनी उचलला. त्यात बासरिची तीन भोके वाजली, हे विष्णूच्या तिसऱ्या अवताराइतक्याच उत्साहात चघळले गेले. त्यात तो तारसप्तकातला सा आहे, का मंद्रसप्तकातला ध आहे, याबद्दल एकमत होईना. हा वाद मिटवण्यातही विष्णूचा तिसरा अवतार कामी आला. एकमेकांना तिसरा अवतार मानून, मोक्षापर्यंत पोचवायच्या नावबदलू आणाभाका झाल्यावर, तो सूर तसाच हवेत अर्धा सोडून, हा वाद बंद पडला. अर्थात पिंकिच्या आईला एक नविन छंद मिळाला होता. असेच एका सकाळी शास्त्रिबुवा, वरच्या तीन भोकांतून कुकर, आगगाडी आणि जहाज अशा चढत्या क्रमातल्या शिट्ट्या, आणि खालच्या तीन भोकातून फुरफुरत जाणारी हवा, असा रियाज करत असताना, तिनी मान डोलावून, "भैरवीचे सूर आहेत हो" असे त्यांच्याकडे कौतुकाने बघत म्हटल्यामुळे शास्त्रिबुवांची छाती फुगली, बोटे तरारली, आणि बासरी बुचकळ्यात पडली. पण परिणाम म्हणजे, आता आपल्याला बासरी येते अशी त्यांची ठाम समजूत झाली. आणि आता रोज रियाज होणार हे पक्के झाले. कारण पिंकिची आई म्हणालीच होती. रोज रियाज करणार असाल तर मी येते हो ऐकायला, म्हणून. लोकांना बैठकिला श्रोते मिळत नाहीत. इथे आपल्याला रियाजालायुद्धा श्रोता आहे या कल्पनेनीच शास्त्रिबुवांचे सूर गहिवरून आले होते. या गहिवरामुळे ते शिट्टी या पदावरून थोडे खाली आले, तर लगेच, आहाहा, मारवा हो मारवा! अशी दाद मिळाली. त्यामुळे आता आयुष्यभर हे तीन सूर आपण असेच वाजवणार असे बुवांनी ठरवले. परिणामी, शिट्ट्यांचा गोंधळ कमी होउन सोसायटीमधे भात परत नीट शिजायला लागले. आणि वाजते सूर हे थोडे खऱ्या सुरांच्या जवळ आले.
तावरेकाकांच्या व्हिस्कीमित्रांमधला एक जरा संगीताच्या जवळचा होता. त्याने हे सोसायटीमधले कर्कश एकून, जरा लोकांवर दया करावी म्हणून बुवांना एक प्रामाणिक सल्ला दिला. मोबाईलवर सा लावून, त्याच्या जवळ आपला सा न्या, आणि तेवढाच वाजवा, बाकी सुरांची काळजी आत्ता नको. असा मोलाचा सल्ला दिला. शास्त्रिबुवांकडे आता सल्ल्यांचा खच पडला होता. त्यामुळे ते जेव्हा पाहिजे तेव्हा जो आठवेल तो सल्ला घेउन वाजवायचे. आता मोबाईलवर, त्यांनी एच स्केलचा सा लावून, तो ते जी स्केलवर आवाज काढत होते. म्हणजे त्यांनी त्याच्या वाजणाऱ्या सा च्या सगळ्यात जवळ जाणारा सा शोधून काढला आणि मग तोच लावून ते रियाज करायचे. त्यामुळे बासरीत नाविन्य आणता येईल असा त्यांचा ठाम समज होता. पण तरी ज्या क्षणी, साही भोकीतून सूर आला, त्यावेळी पिंकिच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर आले. आणि हे बघून बुवांना आपल्याला दर्दी श्रोता मिळाल्याचा आनंद झाला.
त्यानंतर हिंदी गाण्यावर शास्त्रिबुवांची संक्रांत आली. आणि आपल्या आवडिची सगळी गाणी ते यथेच्च वाजवू लागले. ती ऐकताना एकदम कलपकाकांनी, डोळे मिटून, मान मागे टाकून, साश्रू नयनांनी "कम सप्टेंबर" असे नामी उद्गार काढले. आणि शास्त्रिबुवांच्या वादनाला अभिवादन दिले. तिथे मात्र त्यांना जरा काही चुकतंय असे एकदा वाटून गेले.
पण तरी त्यांनी धीर सोडला नाही. कुणाला त्यांच्या बासरीत, ते ये रात भिगी भिगी वाजवताना, शुद्ध निषाद दिसायचा. कुणाला विषाद, याची त्यांना फार काही तमा नव्हती. बडे अच्छे लगते हो वाजवताना, दोन रेड लेबल झालेल्या तावरेकाकांना त्याच्यात बागेश्रीच्या अंगानी वाजवलेला यमन दिसला, ही त्यांची समस्या आहे, माझी नाही हे शास्त्रिबुवांचे मत. त्यांना हे नीट माहीत होते, की वाजवणारा आपल्या परिने वाजवतो आणि ऐकणारा आपल्या परिने. बाहेर काही वाजले तरी त्यांच्या मनात मात्र बडे अच्छेच वाजायचे. पिंकिच्या आईने, तिची शास्त्रीत संगीत शिकणारी एक बहिण सोसायटित आणली, आणि तिला बुवांच्या समोर उभे केले. काय झाले ते कळले नाही, पण साधारण पाच मिनिटात ती चिडून निघून गेली, हे सगळ्यांना कळले. त्या दिवसापासून शास्त्रिबुवांचे अंगठे, अतीरियाजानी दुखत आहेत असे कळले.
आपल्या सोसायटीतला हा एकमेव सांस्कृतिक कार्यक्रम नसत्या असोसायटी कारणांनी बंद पडू नये इतकीच कलपकाकांची अपेक्षा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol धम्माल