गं कुणीतरी येणार येणार गं...

Submitted by मनस्विता on 20 February, 2019 - 12:30

रविवारी संध्याकाळी आम्ही बाहेर पडलो तर घरासमोर जी शाळा आहे तिच्या पटांगणावर मांडव घालायचं काम सुरु होतं. अर्थातच कन्यारत्नाकडून प्रश्न विचारला गेला की कश्यासाठी मांडव बांधला जात आहे. अर्थातच माझ्याकडे उत्तर नव्हतं. (जेव्हा पासून तिला गणित आणि शास्त्र शिकवत आहे तेव्हा पासून तिला असे वाटते की तिने कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर माझ्याकडे असते.) विचार केला की असेल शाळेचा काहीतरी कार्यक्रम. कालचा दिवस पण तसाच गेला. खिडकीतून पाहीले तर मांडव अजून दिसत होता आणि कार्यक्रम झाल्याचा काही आवाजही आला नव्हता. म्हणजे कालपर्यंत काही कार्यक्रम झाला नव्हता.

आणि आज त्याचा खुलासा झाला. कारण आज सुट्टीनिमित्त सकाळी क्लास ठेवला होता. तर माझ्या विद्यार्थ्यांनी येऊन सांगितले की आज समोरच्या शाळेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. म्हणलं, अच्छा... याचिसाठी आहे सारा अट्टहास!

साधारण १०च्या सुमारास बाहेर पाहिलं तर लोकांची गर्दी तर जमा होतंच होती, पण त्याचबरोबर बरेच पोलीस येऊन थांबले होते. १०च्या पुढे फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांची तीन तासांची परीक्षा असल्याने अधूनमधून कार्यक्रमाच्या ठिकाणी काय सुरु आहे ह्याचा अंदाज घ्यायला माझ्याकडे वेळ होता. तर ११:३०च्या सुमारास कार्यक्रमाच्या ठिकाणी गाण्यांचा कार्यक्रम सुरु झाला. आज शिवजयंती असल्याने शिवाजीमहाराजांशी संबंधित गाणी सुरु झाली. अगदीच घरासमोर स्पीकरवर सर्व सुरु असल्याने आम्हाला ऐकण्याशिवाय पर्यायच नव्हता. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चेष्टेत म्हणलं की तुम्हाला परीक्षेचं दडपण येऊ नये म्हणून खास मनोरंजनाचा कार्यक्रम सुरु आहे. Happy

गाणारी मंडळी साचेबद्धपणे मूळ गायकांची नक्कल करत गाणी म्हणत होती. अधूनमधून गाणी थांबवून काही घोषणा होत होत्या. प्रत्येक वेळी गाणी थांबली की वाटायचं आले बहुतेक मुख्यमंत्री. पण पुन्हा गाणी सुरु व्हायची. दुपारचा १ वाजला तरी मुख्यमंत्र्यांचा पत्ता नव्हता आणि गाणी काही संपत नव्हती. आता शिवाजीमहाराजांसंबंधीत गाणी संपली होती आणि वेगवेगळी देशभक्तीपर गाणी सुरु झाली. हिंदी-मराठी भाषेचं बंधन नव्हतं पण देशभक्ती ओथंबून वाहत होती. शेवटी माझ्या विद्यार्थ्यांना म्हटलं की पूर्वी पाहुणे येणार असतील आणि त्यांना उशीर होत असेल तर उंबऱ्यावर फुलपात्र पालथे घालत; तसं आपण घालुयात का?

साधारण १:२५ वाजता गाणी थांबली आणि पोलिसांच्या शिट्ट्या सुरु झाल्या. पुन्हा माझी स्वारी खिडकीपाशी. तर दिसले की बरेच पोलीस रस्त्यावर आले होते. शाळेच्या गेटसमोरच्या सर्व गाड्या हटवला होत्या. रस्त्यावरदेखील इतर ज्या गाड्या होत्या त्यांना बाजूला व्हायचे संकेत दिले जात होते. आणि पोलिसांच्या एकापाठोपाठ यायला सुरु झाल्या. पोलिसांच्या ५-६ गाड्या आल्यावर मागे एक पांढरी गाडी आली आणि ती थेट शाळेच्या प्रांगणात शिरली. त्यापाठोपाठ अजून एक गाडी आली. त्यात ४-५ अंगरक्षक दरवाजे उघडून उड्या मारायच्या तयारीत होते आणि गाडी थांबते ना थांबते तो, ते सर्व लगोलग मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या पाठीमागे धावले. (हे असलं भारी वाटलं ना! इतके दिवस फक्त पिक्चरमध्ये असं घडताना पाहायचो ते प्रत्यक्ष पाहायला मिळालं.) मुख्यमंत्री दिसले नाही तरी त्यांच्या आगमनाची वर्दी मिळाली. सकाळपासून अशी वातावरणनिर्मिती होती की मीपण गाणं गात होते की "गं कुणीतरी येणार, येणार गं" आणि आता म्हणावेसे वाटले की "पाहुणा घरी आला गं आSला गं"!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users