ह्या जगाशी चालणारे वाद तू मिटवून घे

Submitted by द्वैत on 18 February, 2019 - 05:01

ह्या जगाशी चालणारे वाद तू मिटवून घे
जे पटत नाही मनाला ते जरा पटवून घे

प्रेम म्हणजे एक शिक्षा प्रेम म्हणजे वेदना
सोड चिंता वेदनेची हौस तू फिटवून घे

शिक जरा लांडीलबाडी राबणे सोडून दे
श्रेय दुसर्याचे तुझ्या खात्यावरी वटवून घे

जर हवी संधी तुला रांगेमध्ये थांबू नको
जो पुढे आहे तुझ्या त्याला सरळ हटवून घे

किंमती पाहून ठरते योग्यता आता जिथे
"द्वैत" तू दुनियेत त्या किंमत तुझी घटवून घे

Group content visibility: 
Public - accessible to all site users