Odd Man Out (भाग ८)

Submitted by nimita on 18 February, 2019 - 00:48

रविवारी पहाटे नेहेमीपेक्षा जरा लवकरच जाग आली नम्रताला. तिनी हळूच मुलींच्या खोलीचं दार उघडून पाहिलं- तिघंही शांत झोपले होते. त्यांना तसंच त्यांच्या स्वप्नांच्या दुनियेत सोडून ती स्वैपाकघरात गेली. स्वतःसाठी मस्त आलं घालून चहा बनवला. वाफाळलेल्या चहाचा कप घेऊन ती बाहेर बागेतल्या झोपाळ्यावर जाऊन बसली. एकीकडे आपल्या पायानी हलकेच जमिनीला रेटा देत ती झोका घेत होती. हळूहळू आकाशात केशरी रंगाची उधळण व्हायला सुरुवात झाली होती. सूर्यकिरणांच्या प्रकाशात बागेतल्या हिरवळीवरचे दवबिंदू मधूनच चमकत होते. समोरच्या कडुनिंबाच्या त्या मोठ्या फांदीच्या ढोलीत राहणारं चिमणपक्षांचं जोडपं खाली उतरून गवतात चोची मारत फिरत होतं.

खरं म्हणजे नम्रताला बागकाम वगैरे मधे फारसा इंटरेस्ट नव्हता पण या घराच्या पुढे मागे इतकी मोकळी जागा होती..जर नीट काळजी घेतली नसती तर गवताचं रान माजलं असतं घराभोवती.. म्हणून मग तिच्या एका मैत्रिणीच्या मार्गदर्शनाखाली नम्रतानी पुढच्या बागेत वेगवेगळी फुलझाडं लावली, मुलींना खेळण्यासाठी म्हणून एका कोपऱ्यात वाळू घालून छोटंसं 'sand pit' बनवलं. तिचा हा उत्साह बघून संग्रामनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला बागेत एक छानसा झोपाळा बसवून घेतला....वर छान फ्रिलची शेड होती त्याला ! तेव्हापासून दर रविवारी सकाळचा चहा ते दोघं या झोपाळ्यावर बसूनच घ्यायचे. दोघी मुली आणि त्यांचे मित्र मैत्रिणी सुट्टीच्या दिवशी नुसता धुडगूस घालायचे तिच्या बागेत. संग्रामनी त्या सगळ्यांसाठी कडुनिंबाच्या एका फांदीवरून rope ladder पण लावून दिला होता.

विचारांच्या नादात नम्रता उठून घराच्या मागच्या बाजूला असलेल्या किचन गार्डन मधे गेली.

एका कोपऱ्यात तिनी टोमॅटो, वांगी, मिरच्या, भेंडी वगैरे भाज्या लावल्या होत्या. त्याचबरोबर मेथी, कोथिंबीर, पुदिना सारखा हिरवा पाला पण होता. बरोब्बर मध्यभागी एक मोठ्ठं आळं करून मुलींनी त्यात आंब्याच्या चार पाच कोयी पुरल्या होत्या . रोज दोघी तिथे पाणी घालायच्या. मागच्याच आठवड्यात एक छोटंसं रोपटं पण उगवलं होतं तिथे! किती खुश झाल्या होत्या दोघी ते बघून...

लगेच त्यांचे प्लॅन्स पण सुरू झाले- त्या झाडाला जे आंबे येतील त्यांचा मँगो शेक करायचा का आम्रखंड ? बराच वेळ चर्चा झाल्यावरही जेव्हा त्या बाबतीत एकमत होईना तेव्हा मग त्या दोघी निवाड्यासाठी नम्रता कडे आल्या होत्या.

"हे म्हणजे अगदी 'बाजारात तुरी' सारखंच झालं की गं !" नम्रता हसून म्हणाली होती," आधी आंबे लागू दे झाडाला, मग आपण मिल्कशेक आणि आम्रखंड दोन्ही करूया की !"

त्यावर नंदिनी नी विचारलं," आई, अजून किती दिवस लागतील आंबे यायला ?"

" मला नक्की नाही माहित, पण बहुतेक अजून तीन चार वर्षं तरी लागतील. पण तोपर्यंत आपण इथून दुसऱ्या गावाला गेलेलो असू." नम्रता नी गौप्यस्फोट केला.

"म्हणजे ? आपल्याला या झाडाचे आंबे नाही खाता येणार?" नंदिनीनी नाराजीच्या सूरात विचारलं.

"अगं, त्यात एवढं वाईट वाटण्यासारखं काय आहे? आपण जरी नसलो तरी त्या वेळी इथे जे कोणी राहात असतील त्यांना मिळतील ना तुम्ही लावलेल्या झाडाचे आंबे !" नम्रताचं हे लॉजिक अनुजाला काही पटलं नव्हतं.

"ए, this is not fair." ती तोंड फुगवून म्हणाली.

तिला समजावत नम्रता म्हणाली," तुम्ही लॉन मधल्या मोठ्या कडुनिंबाच्या झाडाखाली खेळता ना रोज ? आणि त्या रोप लॅडर वर जेव्हा सगळे मिळून 'आर्मी आर्मी' खेळता तेव्हा किती मजा येते की नाही ? ते झाड आपण नाही लावलं .. आपल्या आधी जे कोणी या घरात राहात होते त्यांनी लावलं होतं ... हो ना ? तसेच तुम्ही लावलेल्या झाडाचे आंबे दुसऱ्या कोणाला तरी खायला मिळतील."

दोघी मुलींना तिचं म्हणणं कळत होतं पण वळत नव्हतं. त्यांचे उदास चेहरे बघून नम्रता पुढे म्हणाली," काय माहित... कदाचित अजून काही वर्षांनंतर पुन्हा आपली पोस्टिंग याच गावात होईल आणि आपण पुन्हा याच घरात राहायला येऊ ! आणि मग तेव्हा तुम्हांला आंबे खाता येतील..!"

नुसत्या कल्पनेनीच मुली खुश झाल्या होत्या.

त्यांना हे सगळं सांगत असताना नम्रताला त्यांच्या देहराडून च्या घरातली गंमत आठवली. संग्रामची जेव्हा देहराडून ला पोस्टिंग झाली होती तेव्हा त्यांच्या घराच्या बागेत एक मोठ्ठं लीची चं झाड होतं. सीझन मधे खूप बहरून जायचं ते झाड लीचीं नी ! नंदिनी तेव्हा जेमतेम तीन वर्षांची होती - नुकतीच प्ले स्कूल मधे जायला लागली होती ती. तिला खूप आवडायची त्या झाडाची लीची... रोज सकाळी शाळेत जायच्या आधी ती अक्षरशः लीची चा ब्रेकफास्ट करून जायची.

एक दिवस दुपारच्या वेळी एक वयस्कर जोडपं घरी आलं. नम्रतानी दार उघडल्यावर त्यांनी दोघांनी आपली ओळख करून दिली..." गुड आफ्टरनून...आपण एकमेकांना प्रत्यक्ष ओळखत नाही. पण साधारण तेरा चौदा वर्षांपूर्वी आमची देहराडून मधे पोस्टिंग झाली होती आणि तेव्हा आम्ही याच घरात राहात होतो. आमच्या मुलानी शाळेच्या एका प्रोजेक्ट साठी म्हणून बागेत एक लीचीचं झाड लावलं होतं. पण नंतर थोड्याच दिवसांत आम्ही दुसऱ्या गावाला गेलो.

आत्ता इतक्या वर्षांनंतर एका लग्नासाठी आलोय इथे. आपलं घर पुन्हा एकदा बघायची खूप इच्छा आणि उत्सुकता होती, म्हणून आलोय. आणि अजून एक काम होतं... आमच्या मुलानी सांगितलंय - त्यानी लावलेलं ते झाड किती मोठं झालंय ते बघायला!"

त्यांचं ते बोलणं ऐकून नम्रता ला एकदम गहिवरून आलं. त्यांच्याबरोबर एक इन्स्टंट कनेक्शन निर्माण झालं होतं. तिनी त्यांना सगळं घर दाखवलं. बागेतलं ते लीची चं झाड ही दाखवलं. 'आपल्या मुलानी लावलेल्या छोट्याशा रोपाचा आता इतका मोठा वृक्ष झालाय' हे बघून दोघांना खूप आनंद झाला होता ...'चेहेऱ्यावरून आनंद ओसंडून वाहणे' या वाकप्रचाराचा खरा अर्थ त्या दिवशी समजला होता नम्रता ला.

आणि जेव्हा त्यांना कळलं की नंदिनी अगदी आवडीनी त्या झाडाच्या लीची खाते; तेव्हा त्या आनंदाची जागा समाधानानी घेतली होती.

खूप गप्पा रंगल्या होत्या त्या दिवशी त्या सगळ्यांच्या. परत जाताना जुन्या आठवणींसोबत अजूनही काहीतरी घेऊन गेले होते दोघं... खास त्यांच्या मुलासाठी म्हणून नम्रतानी पिशवी भरून लीची दिल्या होत्या बरोबर.

आणि त्या बदल्यात तिला एक खूप महत्त्वाची शिकवण मिळाली होती. - आपण केलेलं कुठलंही सत्कर्म कधी वाया जात नाही. कधी न कधी त्याचं फळ मिळतंच... कधी आपल्याला तर कधी दुसऱ्याला!

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि त्या बदल्यात तिला एक खूप महत्त्वाची शिकवण मिळाली होती. - आपण केलेलं कुठलंही सत्कर्म कधी वाया जात नाही. कधी न कधी त्याचं फळ मिळतंच... कधी आपल्याला तर कधी दुसऱ्याला!

____________/\______________

खूपच सुंदर लिहिले आहे नमिता... डोळ्यासमोर चित्रं उभे राहिले...आजच सगळे भाग वाचले....आपले सैनिक तर आपल्या साठी त्यांचे प्राण पणाला लावतात पण त्यांचे कुटुंब ही तेवढ्याच कठीण परिस्थिती ला सामोरे जाते...खूपच छान मांडले आहे...लवकर येवू दे पुढचा भाग...पू ले शु