शहीदाचा अंतिम निरोप

Submitted by Asu on 15 February, 2019 - 08:52

14 फेब्रुवारी 2019 ला जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुराच्या गोरीपुरा भागात (लट्टूमोड) जैश-ए-महंमदच्या अदिल अहमद दार या अतिरेक्याने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला त्यात ४० जवान शहीद झाले. घरच्यांचा निरोप घेऊन आनंदाने ते कर्तव्यावर हजर होण्यासाठी जात असतांनाच त्यांच्यावर हा हल्ला झाला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली!
अंतिम क्षणी जाताजाता त्यांचा भारतवासीयांना काय निरोप असेल ते सांगण्याचा हा प्रयत्न -

शहीदाचा अंतिम निरोप

कुपुत्र कसा हा निपजला, भारतमातेच्या उदरात
जैश-ए-महंमद पोशिला, खुपसण्या सुरा हृदयात

सुरांच्या नंदनवनात, असती जन बहु दिलदार
हे कसे निपजती येथे, असुर क्रूर अदिल-दार

शत काय सहस्त्र अर्पण, भूमातेच्या चरणी प्राण
देशास्तव जान कुर्बान, परी व्यर्थ न हो बलिदान

खंत, न लढता गेला, देशास्तव शहीद हा झाला
देहाचा एकेक छकला, स्फुल्लिंग होऊ दे सकला

थांबवा त्या नित्य वल्गना, करी विनंती जाता जाता
घ्या बदला भ्याड हल्ल्याचा, तोवरी ना शांती आता

सांगा पाकिस्तान्याला, पकडा त्या अजहर मुल्ला
पुलवामा दहशती हल्ला, साहण्याचा अंत झाला

कुटुंबाची नच मज चिंता, हा देशची त्यांचा त्राता
एक अंतिम इच्छा आता, जन्म देई पुन्हा भारता

येईन पुन्हा लढण्याला, भारतभूचा र‌‌क्षणकर्ता
हा निरोप माझ्या दाता, जय जय भारत माता !

- प्रा. अरुण सु. पाटील (असु)
(दि.15.02.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults