मोगर कळीस....

Submitted by Asu on 14 February, 2019 - 09:09

मोगर कळीस....

असाच एकदा फिरत होतो
रिकाम्या हृदयी वाटेल तसा
ध्येय नव्हते नव्हती मति
पायांना मात्र फक्त गति

एका बागेतल्या कळीने
चक्क मला डोळा घातला
हात जोडून मी म्हटलं
मी असा भोळा भाबडा
हृदय घेऊन मातीचं
फिरतो आहे वेडा बापडा

तुझा तेव्हढा खेळ होईल
माझा मात्र जीव जाईल
हृदय माझं मातीचं
लाथ मारली तर फुटून जाईल
मोगर कळी गालात हसली
मान वळवून लटके रूसली

ओष्ठ पाकळी उघडून म्हणाली
गुलाबाची ऐट नाही
रंग नाही रूप नाही
आकाराचेही भान नाही

साधी मी शुभ्र मोगरी
प्रेमसुगंधी सात सागरी
मातीतुनिच जन्म माझा
हृदयी तुमच्या रुजेन, फुलेन

अंतरीच्या जखमा तुमच्या
प्रेमसुगंधे धुवून काढेन
ओलाव्याची मी भुकेली
नाही अपेक्षा दुसरी कसली

भारावुनि मी कानी वदलो
तुजवाचुन मम हृदय रिकामे
घेऊन फिरत होतो दिवाणा
तुझ्याचसाठी होता राखिला
घे हा प्रेमाचा नजराणा

पाहुनि मग इकडे तिकडे
मोगर कळी ओठी धरली
ओलाव्याचा स्पर्श होता
मोगर कळी पटकन फुलली

प्रा. अरुण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults