© रोझ डेचा तह

Submitted by onlynit26 on 7 February, 2019 - 23:41

© रोझ डेचा तह
आज खूप दिवसांनी त्याला त्याचा डीपी बदलायचा होता. फौटोगॅलरीमध्ये खूप शोधून सुद्धा फोटो मिळाला नाही. त्याने नेहमीप्रमाणे स्नेहाचे प्रोफाइल चेक केले. ती खूपवेळा दोघांचा फोटो डीपी म्हणून ठेवायची. तो डाउनलोड करून बदलायचा विचार होता. पण तिचा व्हाट्सएप डीपी गायब होता. त्याने स्टेटसही तपासले. तिथेही सामासूम. दिवसाला डीपी आणि तासाला स्टेटस चेंज करणाऱ्या स्नेहाला आज झालं तरी काय?
त्याने तिला कॉल लावला. तो पण तिने उचलला नाही. कसला राग आलाय इतका? राग आलाय हे नक्की. त्यासाठी व्हाट्सएपचा ती चांगला उपयोग करते. सगळ्यात पहिले ती स्टेटसला एक डॉट ठेवून समोरच्याला तिने ब्लॉक केलेयं असं काहीसे भासवण्यासाठी डीपी काढून टाकायची. आजही तसचं केले होते. त्याने दोन तीन मेसेजेस पाठवून पाहिले. डबलटिक आल्यावर त्याला थोडं हायसे वाटले. पण ती डबलटिक ब्लू काही होईना. त्याने ऑफिसच्या फोन करून सुद्धा स्नेहा फोनवर येत नाही म्हटल्यावर त्याला पुढे काय करायचे ते समजले.

त्याने तडक घरी फोन करून आपल्या छोट्या मुलीला बऱ्याच दिवसांनी एक हेरगिरी सोपवली. ओवी ते काम छान करायची. स्नेहाची सवयच तशी होती. ती राग आला तर धुसफुसत राहायची. रागाचे कारण घरात कोणालाच सांगत नसायची. बेडरूममध्ये जाऊन आपल्या आईला किंवा मैत्रिणीकडे बोलून दाखवायची. मग रागाचे कारण शोधून काढावे लागायचे. एकट्या प्रसादला ते कठीण जायचे. वेळ लागायचा. ओवी जशी मोठी झाली तशी ती ममाच्या रागाचे कारण शोधून काढायला मदत होऊ लागली. बरं ही गोष्ट फक्त बापलेक आणि नानीला माहीत असल्याने ओवीला स्नेहाच्या गोटात सहज प्रवेश असायचा. आजही प्रसादने ओवीशी फोनवर बोलून कामगिरी सोपवली. ओवीला ते काम पार पण पाडण्यात कमालीचा आनंद मिळायचा.

तो घरी आला तेव्हा स्नेहा गुश्शातच होती. नानीने डोळ्यानीच वातावरण गरम आहे असे खुणावले. नानी प्रसादची आई. आतापर्यंत ओवीच्या हाती फारसे काही लागले नव्हते. ती जेव्हा बाबासाठी पाणी घेऊन आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरूनच कळत होते.
सगळ्यांची जेवणे स्नेहलच्या गुश्शातच आटोपली. सगळे आवरून ती बेडरूममध्ये गेली. तिथे अगोदरच ओवी ठाण मांडून होती. आता ममाची फोनाफोनी सुरू होणार, त्यात काहीतरी ममा बोलणार आणि आपल्याला रागाचे कारण कळणार. अशी आशा धरून तिने फेवरेट कार्यक्रम दुसऱ्यादिवशी मोबाईल वर पाहायला मिळावा या अटीवर पाहायचा सोडला होता.

थोड्या वेळाने ओवी बेडरूममधून धावतच बाहेर आली आणि बाबाच्या कानाजवळ जात म्हणाली.
" आई काहीतरी फॉरवर्ड मेसेज बद्दल काहीतरी बोलतेय." नानीने कमी ऐकू येत असले तरी कान टवकारले.
" फॉरवर्ड मेसेज?" प्रसाद बुचकाळ्यात पडला.
खरंतर तो फारसे व्हाट्सएप वापरत नव्हता. अचानक त्याला आठवले. सकाळीच डबा भरताना स्नेहलने उच्चारलेल्या एका वाक्याने सारं काही लक्षात आले.
ओवीने ' आई आज रोझ डे आहे' असे म्हणाल्यावर स्नेहल पटकन म्हणाली होती.
' आम्हाला कोण देतयं गुलाब?' हे वाक्य प्रसादने ऐकले होते आणि लगेचच त्याने मोबाईल मध्ये दोन रिमांइडर लावले होते.
त्यातला एक रिमांइडर तो ऑफिसमध्ये पोचल्यावर वाजला. दुसरा गाडीतून उतरल्यावर वाजणार होता. मित्राच्या कॉलच्या नादात दुसरा रिमांइडर वाजून गेला. तसाही तो तिला घरी पण शुभेच्छा देऊ शकला असता पण सरप्राइज देण्यासाठी त्याने नेहमीप्रमाणे स्नेहलला अगोदर पाठवलेल्या मेसेजेस मधून 'आय लव्ह यू 'हा मेसेज फॉरवर्ड केला आणि स्मायलिज मधून गुलाब शोधून ते पाठवले.
आता अडचण त्या फॉरवर्ड ' आय लव्ह यु' झाली होती हे प्रसादच्या लक्षात आले होते.
अंगात टि शर्ट सरकवून तो रात्री दहा वाजता घराबाहेर पडला.
ओवी आणि नानीने प्लेटस काढायला घेतल्या. आज बाबा आईचा फेवरेट आईस्क्रीम आणणार हे नक्की होते. प्रसाद आईस्क्रीम आणेपर्यंत आई जेव्हा बेडरूममधून चेहऱ्यावर जिंकल्याचे हास्य घेऊन बाहेर आली तेव्हा ओवी आणि नानी काय समजायचे ते समजल्या. तहात काय काय मागण्या झाल्या, गैरसमज दूर करण्यात बाबा कसा यशस्वी झाला यात त्या दोंघीना काहीच स्वारस्य नव्हते. पण आळशी बाबाला साधे कॉपी पेस्ट न करणे मात्र चांगलेच शेकले होते आणि एक रोझ डेचा तह इतिहासात कोरला गेला होता.

समाप्त..

© या लघुकथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
-------------------------------------------------------
लेखक - नितीन दशरथ राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - बदलापुर (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८
दिनांक - ०७.०२.२०१९

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फॉरवर्डेड मेसेज
आय लव्ह यु.

असा फोटो व्हाटसॲपवर खुप वेळा आलाय आजवर.

तसेच

आज विवाहबंधनात अडकलो.
यावर, आपले पर्सनल प्रॉब्लेम येथे शेअर करु नये. हा फेबुचा फोटोही धमाल करुन गेला होता.

मस्त.सुटका बऱ्याच सोप्यात झाली म्हणायची.आमच्या घरी असं घडल्यास त्याची जीवाष्म इंधन पृथ्वीतलावरून नाहीसं होईपर्यंत आठवण आणि भांडणात वापर झाला असता. ☺️☺️☺️☺️

Lol मस्त
सुटका बऱ्याच सोप्यात झाली म्हणायची.आमच्या घरी असं घडल्यास त्याची जीवाष्म इंधन पृथ्वीतलावरून नाहीसं होईपर्यंत आठवण आणि भांडणात वापर झाला असता. >>> मी_अनु +११११११

मस्त लेख
तुमचा मिनग्या पण मी तोंडपुस्तिकेत फॉलो करतो

© या लघुकथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
>>>
हे आवडले. कुणीतरी चोरून ही कथा शेअर करेल, हा तुमचा आत्मविश्वास जबरदस्त आहे. नक्की काय कारवाई करणार याबद्दल काही सांगू शकाल का?

मस्त लेख
तुमचा मिनग्या पण मी तोंडपुस्तिकेत फॉलो करतो>>>> धन्यवाद...