© अनगड मनोहरगडाची चढाई..

Submitted by onlynit26 on 4 February, 2019 - 01:09

© अनगड मनोहरगडाची चढाई..

'मनोहरगड' म्हणजे मनाला आनंद देणारा गड.. पण हा आनंद देणारा गड काहीसा दुर्लक्षीत, पोरका आहे.
एक वर्षापूर्वी मी या गडाचा शेतीच्या वाफ्यातून काढलेला फोटो पाहीला होता. तो फोटो पावसाळ्यातील होता. गावातून दिसणाऱ्या गडाचा फोटो पाहूनच ठरवले कि आपण ही ट्रेक करायची. त्याबद्दल माहीती पण गोळा करायला सुरूवात केली. असे कळले कि या गडावर पावसाळ्यात ट्रेक करता येत नाही. या गडाबद्दल नकारात्मक गोष्टीच ऐकल्या होत्या. अशा या अनगड मनोहर -मनसंतोष गडावर कधी एकदा जातोय असं झालं होते.

आणि एक दिवस प्रसादचा कॉल आला. आपण ३० जानेवारीला संध्याकाळी मनोहरगड ट्रेक करतोय. मी त्याला झटकन हो म्हणालो खरा पण खरी समस्या सुट्टीची होती. ऐन विकडेज मध्ये ट्रेक आयोजित केल्यामुळे दांडी मारल्याशिवाय पर्याय नव्हता. आवड असेल तर सवड मिळतेच.

अखेरीस सावंतवाडी मध्ये झालो. मला स्टेशनला न्यायला आमचा परममित्र निखिल सावंत आला होता. तिथून त्याच्या घरी जाऊन फ्रेश झालो. निखिल आणि प्रसाद ट्रेकसाठी लागणाऱ्या सामानाची जमवाजमव करत होते. हे सगळे झाल्यावर बरोबर दुपारी तीन वाजता सावंतवाडी शिरशिंगे गावाकडे निघालो. वाटेत एक नवीन मित्र आम्हाला येवून मिळाला. तो म्हणजे तुषार विचारे. एक नम्र व्यक्तीमत्व, सर्पमित्र आणि सदैव मदतीला तयार असलेला माणूस.
खास गोव्याहून आलेला सतिश परब ही आमच्यात सामील झाला. त्यानंतर आम्ही रानमानूस प्रसादच्या घरी गेलो. तिथे विराज, अनिकेत आणि सिद्धेश येणार होते. यातल्या सिद्धेशला मी प्रथमच भेटत होतो. एक अन्नपूर्णा प्रसन्न असलेला, अत्यंत तन्मयतेने आणि आवडीने उत्कृष्ट जेवन बनवणाऱ्या सिद्धेशची प्रचिती गडावर दिली.

प्रसादच्या घरून टेन्ट आणि इतर आवश्यक सामान घेऊन आम्ही शिरशिंगे गोठवेवाडीकडे निघालो. वाटेत कलंबिस्त निसर्गरम्य मळ्यात फोटो काढून साडेचार वाजता गोठवेवाडीत पोचलो. तिथे गावतील शिर्केकाका आणि इतर दोघेजण आमच्यात सामील झाले.
गावतून दिसणारा रांगडा मनोहर आणि त्याच्याच बाजूला अगदी लहान भावाप्रमाणे उभा असलेल्या मनसंतोष गडाला पाहत आम्ही ट्रेकला सुरुवात केली. तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. आमच्याकडे गाड्या असल्यामुळे गोठवे वाडीच्या मंदीरापासून पुढे शिवापूरला जाणाऱ्या रस्त्याने बरेच अंतर गाडीने पार केल्यामुळे आमचा एक तास वाचला. पुढची वाट मात्र तीव्र चढण आणि निसरड्या मातीची होती. प्रत्येक पाऊल जपू टाकावे लागत होते.
अर्ध्या तासाच्या तीव्र चढणीनंतर आम्ही मनोहर गडाच्या पूर्वेकडील भागाच्या खाली पोचलो. तिथून पुढे निमुळत्या वाटेने गड्याच्या पायऱ्यांच्या दिशेने जायचे होते. तसेच थोडे पुढे चालत गेल्यावर एका ठिकाणी शिवापूर हून येणारी वाट येऊन मिळाली. तिथे थोडी विश्रांती घेऊन पुढच्या वाटेला लागलो. खरा कस आता होता. तीव्र चढण अणि निसरड्या वाटेमुळे सारखे घसरायला होत होते. शिवाय गडाच्या कातळकपारीत मधमाश्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना न दुखावता वरचा मार्ग पकडायचा होता. त्या ठिकाणाला 'गरूडाचे भाब' असे नाव आहे. पण सावध तो सुखी. थोडी चढण पार केल्यावर एक अवघड पॅच लागला. तिथे आपले शरीर पूर्णपणे हातांवर झोकून देऊन वर चढावे लागत होते. इथे शिडी लावण्याची गरज आहे. कारण दगडाखाली माती असल्यामुळे आज ना उद्या आता अस्तित्वात असलेली ही वाटही नष्ट होणारी आहे. त्या पॅचकडे थोडे
स्ट्रगल करत वर चढलो. पुढची वाटही सोपी नव्हती. काही पायऱ्या चांगल्या अवस्थेत आहे. पण पुढच्या पायऱ्या अस्तित्वात नाहीत. निमुळत्या वाटेवरून मार्गक्रमण करावे लागत होते. शिवाय बाजूला आ वासलेले दरी मनात धडकी भरवत होती. आता आम्ही गडाच्या शेवटच्या टप्प्यात होतो. तिथली वाट निमुळती असल्यामुळे तिथेही जपून चढावी लागणार होती. गडाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे उध्वस्त स्थितीत आहे. काही पायऱ्या चांगल्या स्थितीत आहेत परंतू त्याखालच्या मातीची झीज झाल्यामुळे तिथली वाट थोडी धोकादायक झाली आहे. येत्या एक दोन वर्षात ही वाट दुरूस्त नाही झाली तर गडावर जाण्याचा मार्गच बंद होईल. आपण सर्व शिवप्रेमी, दुर्गप्रेमी यावर विचार करून लवकरात लवकर तोडगा काढायची गरज आहे.

आम्ही पडझड झालेल्या प्रवेशद्वारातून वर आलो तसे पहीले लक्ष पश्चिमेकडे गेले.. मी प्रथमच गडावरचा सुर्यास्त पाहणार होतो. आही सर्वजण मनोहरगडाच्या पश्चिमेकडच्या टोकाकडे धावत निघालो जिथे मनसंतोष गड आणि मनोहर गडाच्या मध्ये खिंड आहे. सूर्यदेव आपल्या स्वगृही चालले होते. ते लूप्त व्हायच्या आत त्यांना डोळेभरून पाहायचे होते.. पुरूषभर वाढलेल्या गवतातून मार्ग काढत सर्वजण पश्चिमेकडे पोचलो. ज्या क्षणाची ओढ होती तो क्षण टिपता आला, अनुभवता आला.
काळोख पडायला लागला तसे आम्ही औदुंबर वृक्षाकडे आलो. बरीच कामे बाकी होती. तंबू लावायचे होते. गेले चार पाच दिवस गड परिसरात जोरदार वारे सुटले होते. त्यामुळे थंडीचा जोर कमी होता. फक्त आमचे टेंट वाऱ्यात तग धरायला हवे होते. आम्ही आलो तेव्हा वारा अजिबात नव्हता. टेंट लावून आम्ही लाकडे गोळा करायच्या कामाला लागलो. बारा जणांच्या चोवीस हातानी हा हा म्हणताना अर्ध्या तासात ढीगभर लाकडे गोळा केली. आता पाण्याची व्यवस्था करून जेवन बनवायला सुरुवात करणार होतो. गडावर सुबक अशी गोड पाण्याची शिवकालीन विहीर आहे. या विहीरीचे पाणी उन्हाळ्यातही आटत नाही.
आमचा मित्र सिद्धेशने रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केली. आम्हीही त्यात मदत करत होतो. चार पाच जण पाणी आणण्यासाठी गेले. बाकीचे चूल आणि आग पेटवण्यात व्यस्त झाले. काहीनी चिकन साफ करायला घेतले. साधारण नऊ वाजताच्या सुमारास गडावर वारा वाहायला सुरुवात झाली होती. जेवन तयार होण्यास अकरा वाजले. सिद्धेशने बनवलेल्या गरमागरम चविष्ट चिकन आणि भातावर आडवा हात मारत ताव मारला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत डोळ्यांनी शरणागती पत्करल्यावर आम्ही टेंटमध्ये झोपी गेलो. प्रसाद, अनिकेत , विराज आणि निखिल यांनी मात्र पहाटे साडेतीन वाजेपर्यंत गडावर एंजॉय केला.
मला सुर्योदयाचा क्षण अनुभवायचा असल्याने मी सकाळी लवकर उठलो. सोबत तुषार आणि सतिश होताच. काही वेळाने सूर्यदेव वर येताना दिसले त्यावेळचा क्षण शब्दात वर्णन करता येणार नाही असा होता. आंबोलीच्या पर्वत रांगातून डोकावणाऱ्या लालबुंद गोळा फारच सुरेख दिसत होता. थोडा वेळ फोटोसेशन आणि व्हीडीओ शुटिंग करून आम्ही संपूर्ण गड पाहायला निघालो.
गडाच्या आतील उजव्या वाटेने तटावरून चालत गेल्यावर आम्ही उत्तर टोकापाशी पोहोचलो. इथे तटामध्ये एक गुप्त दरवाजा आहे. या दरवाजापर्यंत उतरण्याची वाट मात्र मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे दरवाजा दूरवरूनच पाहून माघारी मूळ जागी आलो. नंतर डावीकडची वाट धरून उद्ध्वस्त दरवाजापासून तटबंदीच्या रांगेने थेट दक्षिण टोकापर्यंत चालत गेलो. या तटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात जागोजागी शौचकूप बांधलेले आहेत. दक्षिणेकडे शेवटच्या टोकाला आता भवगा झेंडा दिमाखात फडकताना दिसतो. तिथून मनसंतोष आणि मनोहरगडाचा दक्षिणेकडील महाकाय कडा आपल्या अभेद्यतेची साक्ष देतो. तो नजारा फारच सुंदर दिसतो. दक्षिणटोकाकडून मागे फिरल्यावर आम्ही समोरील उंचवट्यावर एक भक्कम चिरेबंदी दगडांची वास्तू आपले लक्ष वेधून घेते. खाली भला मोठा चौथरा आणि त्यावर बांधलेली ही इमारत दोन खोल्यांमध्ये विभागलेली आहे. या इमारतीच्या जवळच औदुंबराचे झाड आहे. या झाडाच्या सावलीत भैरोबांच्या दोन मूर्ती आहेत. याला स्थानिक लोक ‘गडाचा चाळा’ असे म्हणतात. या औदुंबराच्या झाडापासून आम्ही पश्चिमेकडची वाट धरली. या पश्चिम टोकावरून मनसंतोषगडाचा संपूर्ण नजारा दिसतो. हे पाहून आम्ही पुन्हा औदुंबराच्या झाडापाशी पोहोचलो आणि उत्तर टोकाकडच्या तटाकडे वळलो. वाटेत एक विहीर लागते. या विहिरीमधील पाणी पिण्यायोग्य असल्याने गडावरील राहणे सुसह्य होते.

सकाळी आमचा गड पाहून झाल्यावर आम्ही सिद्धेशने बनविलेल्या फोडणीच्या भात खाल्ला. या फोठणीच्या भातामध्ये गडावरीलच कडपत्त्याची फोडणी असल्याने फारच लज्जत आली होती. थोड्यावेळाने जेवनाचे टोप घासून गडावरील कचरा साफ करून गडउतार व्हायला सुरुवात केली. तत्पूर्वी प्रसादच्या नेतृत्वखाली पार पडलेल्या या ट्रेकचा शेवटचा ग्रुप फोटो आणि एक व्हिडिओ बनवून सावध पावलांनी पायऱ्या उतरायला सुरूवात केली. तिथूनच खाली उतरल्यावर एक वाट मनसंतोष गडाकडे गेलेली दिसते पण त्या गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. सकाळी नऊ वाजता गडउतार होऊन बरोबर दहा वाजता आम्ही जिथे गाड्या लावल्या होत्या तिथे पोहोचलो. या अविस्मरणीय ट्रेकमध्ये शिरशिंगे गावतील शिर्के काका, त्यांचे दोन सहकारी, प्रसाद ,अनिकेत, सिद्धेश ,विराज, तुषार ,सतीश, निखिल आणि मी एवढे बारा जण सहभागी झालो. एक यशस्वी ट्रेक केल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.

आज मनोहरगड काहीसा दुर्लक्षीत आणि एकाकी पडलाय. इथे मोठ्या संख्येने दूर्गप्रेमीनी भेट देण्याची गरज आहे. प्रामुख्याने पावसाळ्यातील या गडाचे रांगडेपण चारी बाजूने कोसळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र जलप्रपातामुळे उठून दिसते. पावसाळ्यातील चार महीने मनोहरगड ढगांची पांढरी दुलई पांघरून असतो. मनोहरगडावरून पूर्वेकडील आंबोली पर्वतरांगेतील हिरवा निसर्ग पाहता येतो. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या गडाने महाराजांचा एक महीन्याचा सहवास उपभोगलाय. पुढे इंग्रजानी किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या व गडावरील इमारतींची नासधूस केली आणि आता गडावर जाणाऱ्या वाटा दिवसेंदिवस अवघड होत चालल्या आहेत. या गडाची समुद्र सपाटीपासून उंची २२३० फूट आहे. शिरशिंगे गावातील गोठवेवाडीतील ग्रामस्थांनी गडावर जायच्या वाटेवर लावलेल्या दिशादर्शक फलकांमुळे सहसा वाट चुकण्याची भीती नाहीये.
आमची ही ट्रेक यशस्वी पार पडली त्याचबरोबर एक आश्चर्यचकीत करणारा क्षण अनुभवता आला. आम्ही शिरशिंगे गावातून जेव्हा परतीच्या वाटेला लागलो तेव्हा रस्त्यावर एक भला मोठा साप निघाला. निखिलने ताबडतोब गाडी थांबवली. आम्ही मस्करीमध्ये तुषार तो साप पकडून दाखव असे म्हणालो. हे ऐकताक्षणी तुषार गाडीतून उतरला आणि अत्यंत चपळाईने आड्यात शिरणाऱ्या सापाच्या शेपटीला पकडून अगदी लिलया आमच्यासमोर त्याला नाचवू लागला..हा सगळा थरार आणि पूर्ण ट्रेकची धमाल आम्ही कॅमेराबद्ध केलयं त्याचा ऑफीशियल व्हीडीओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत.. https://www.youtube.com/KonkaniRanmanus यापुढेही प्रसादच्या नेतृत्वाखाली बऱ्याच ट्रेक आणि कोकणसंदर्भातील बरेच व्हिडीओ आपल्यासाठी आणणार आहोत..

समाप्त...
03.02.2019

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छानच! फोटो हवेतच.
यापूर्वी या गडाचं नाव फक्त श्रीमान योगी पुस्तकात वाचलं आहे. त्यात जे मनोहारी हे काल्पनिक पात्र आहे, ती मनोहारी या मनोहर मनसंतोष गडावरची असते.

छान झालाय.
ट्रेक ला मित्र आणि ते पण शाळा कॉलेज मधले असले की फुल धमाल येते.