सोडियम : मीठ तारी, मीठ मारी !

Submitted by कुमार१ on 3 February, 2019 - 21:03

खनिजांचा खजिना : भाग २

भाग १ : https://www.maayboli.com/node/68939
******************************************************
सर्वांना परिचित असणारे सोडियम(Na) हे मूलद्रव्य शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. निसर्गात ते विविध खानिजांत आढळते. त्यापैकी NaCl म्हणजेच मीठ हे आपल्यासाठी सर्वात महत्वाचे खनिज. आपल्या शरीरातही ते काही क्षारांच्या रुपात अस्तित्वात असते आणि जगण्यासाठी मूलभूत स्वरूपाची कामे करते.
सोडियमचे आहारातील स्त्रोत व प्रमाण, शरीरातील चयापचय व कार्य, त्याची रक्तपातळी आणि संबंधित आजार या सर्वांचा आढावा या लेखात घेतला आहे.

आहारातील स्त्रोत व प्रमाण:

स्वयंपाकाच्या बहुतेक पदार्थांत आपण चवीसाठी मीठ घालतो. त्यामुळे प्रथमदर्शनी असे वाटेल की ‘वरून घातलेले मीठ’ हाच सोडियमचा स्त्रोत आहे. पण तसे नाही. दूध, मांस आणि मासे या नैसर्गिक पदार्थांतही ते आढळते. याव्यतिरिक्त आपण अनेक प्रक्रिया केलेले, साठवलेले आणि खारावलेले पदार्थ मिटक्या मारीत खातो. त्यांत तर सोडियम दणकून असते. ब्रेड, वेफर्स, लोणची, sauces.... यादी तशी संपणारच नाही ! त्यामुळे आधुनिक खाद्यशैलीत आपण सगळेच गरजेपेक्षा जास्तच सोडियम खातो.

रोज नक्की किती सोडियम शरीराला आवश्यक आहे, हा तसा लाखमोलाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर तसे सरळ नाही आणि त्याबाबत थोडे मतभेदही आहेत. एका अभ्यासानुसार त्याची रोजची खरी गरज ही जेमेतेम अर्धा ग्रॅम आहे. जगभरातील अनेक वंश आणि खाद्यशैलींचा अभ्यास केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने एक शिफारस केली आहे. त्यानुसार रोजची सोडियमची गरज २ ग्रॅम आहे आणि याचाच अर्थ असा की ५ ग्रॅम मीठ (NaCl) हे पुरेसे आहे. हा जो आकडा आहे त्याला ‘वरची’ पातळी समजायला हरकत नाही. त्यापेक्षा जरा कमीच खाल्ले तर तब्बेतीला ते चांगलेच आहे असा सर्वसाधारण वैद्यकविश्वातला सूर आहे. अतिरिक्त खाल्ले असता आपली तब्बेत बिघडवणाऱ्या “पांढऱ्या विषां”पैकी ते प्रमुख आहे असे प्रतिपादन काही जण करतात.

शरीरातील अस्तित्व आणि कार्य:
शरीरातील ७५% सोडियम हा विविध क्षारांच्या रुपात पाण्यात विरघळलेल्या स्थितीत असतो. शरीरातील एकूण द्रव हे दोन गटांत विभागलेले आहेत:
१. पेशी अंतर्गत द्रव आणि
२. पेशी बाह्य द्रव

सोडियम हा मुख्यतः पेशीबाह्य द्रवांत असतो. रक्त हे प्रमुख पेशीबाह्य द्रव होय. त्यातील सोडियम हा मुख्यतः क्लोराईड व बायकार्बोनेटशी संयुगित असतो. त्याची मुख्य कार्ये अशी आहेत:

१. पेशींतील मूलभूत प्रक्रियांत आवश्यक
२. रक्ताचे एकूण आकारमान(volume) स्थिर राखणे
३. रक्तातील हायड्रोजनचे प्रमाण (pH) स्थिर राखणे
४. मज्जातंतूंच्या संदेशवहनात मदत.

शरीरातील चयापचय:

आहारातील सर्व सोडियम रक्तात शोषले जाते. त्याचे शरीरातून उत्सर्जन हे लघवी, शौच आणि घामाद्वारे होते. त्यांपैकी सर्वात जास्त उत्सर्जन लघवीतून होते आणि ते आहारातील प्रमाणाशी थेट निगडीत असते. हे उत्सर्जन व्यवस्थित होण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित असले पाहिजे आणि या कामात Aldosterone हे हॉर्मोन महत्वाची भूमिका बजावते. सोडियमचे घामाद्वारे उत्सर्जन हे अत्यल्प असते. अगदी उष्ण व दमट हवामानात देखील ते विशेष वाढत नाही हे लक्षात घ्यावे. दीर्घकाळ अशा हवामानात राहिल्यास शरीर हळूहळू या प्रक्रियेस जुळवून घेते आणि शरीरातील सोडियमचा समतोल राहतो.

आहारातील मीठ आणि रक्तदाब:

BP.jpg

समाजात बहुचर्चित असा हा विषय आहे. त्यातून उच्च-रक्तदाब असणाऱ्यांसाठी तर विशेष महत्वाचा. गरजेपेक्षा जास्त सोडियम रक्तात साठू लागला की त्याबरोबर जास्त पाणीही साठवले जाते. परिणामी रक्ताचे आकारमान (volume) वाढते. त्यातून हृदयावरील भार वाढतो आणि अधिक दाबाने त्याला रक्त ‘पंप’ करावे लागते. त्यातून रक्तदाब वाढतो.
आहारातील सोडीयम आणि रक्तदाब यांचा थेट संबंध (directly proportional) आहे. प्रौढांमध्ये केलेल्या अनेक अभ्यासांतून हे सिद्ध झाले आहे की :
१. अधिक सोडियम >>> रक्तदाब वाढणे आणि
२. कमी सोडियम >>>> रक्तदाब कमी होणे.

असे प्रयोग निरोगी आणि उच्चरक्तदाब असलेले, अशा दोघांत करून झाले आहेत आणि त्यातून वरील निष्कर्ष निघतो. साधारणपणे आहारात १ ग्राम सोडियम वाढवल्यास ‘वरच्या’ व ‘खालच्या’ प्रत्येकी रक्तदाबात ३ mmHg ने वाढ होते. त्यामुळे उच्चरक्तदाबाच्या रुग्णांनी ‘वरून घातलेले’ मीठ आणि प्रक्रियाकृत साठवलेले पदार्थ टाळावेत अशी शिफारस आहे. स्वयंपाकात समाविष्ट मिठाचा मात्र बाऊ करू नये. ते आवश्यकच आहे. (दीर्घ मूत्रपिंड विकाराने बाधित व रुग्णालयात दाखल झालेल्यांबाबत मात्र त्याचे काटेकोर मोजमाप असते).
काही प्रगत देशांत सोडियमचे प्रमाण कमी केलेले खाण्याचे मीठ उपलब्ध असते. हाही एक सोडियम-नियंत्रणाचा उपाय होय.

आजच्या घडीला जगभरातील सुमारे निम्मे प्रौढ लोक उच्चरक्तदाबाने बाधित आहेत. यातून आहारातील सोडियम नियंत्रणाचे महत्व अधोरेखित होते. रक्तदाब योग्य असणाऱ्या व्यक्तींनी मात्र मिठाचा फार बाऊ करू नये, असे अलिकडील एक संशोधन सांगते.

आहारातील मीठ आणि इतर आजार:

अधिक सोडियमचा करोनरी हृदयविकार आणि Stroke यांच्यातील संबध तपासण्यासाठी बरेच संशोधन झालेले आहे. निष्कर्ष उलटसुलट आहेत. दीर्घकाळ सोडियम अधिक्याने या आजारांचा धोका वाढतो असे म्हणता येईल. तसेच वर्षानुवर्षे असे अधिक्य राहिल्यास त्याचा मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. तसेच त्वचा व पचनसंस्थेवरही दुष्परिणाम होऊ शकतात असा इशारा काही संशोधकांनी दिला आहे.

सोडियमची रक्तपातळी :

निरोगीपणात ती १३५ ते १४५ mmol/L इतकी असते. इथे एक मुद्दा ध्यानात घ्यावा. सामान्य आजारांत ती बिघडत नाही आणि ती मोजण्याची गरज नसते. ही चाचणी रुग्णालयात दाखल केलेल्या बऱ्याच रुग्णांत मोजली जाते. डीहायड्रेशन, मूत्रपिंड विकार, हृदयविकार, अतिदक्षता विभागातले रुग्ण आणि शस्त्रक्रिया झालेले रुग्ण इत्यादींमध्ये त्याचे महत्व असते. इथे सोडियमबरोबरच पोटॅशियम आणि क्लोराईड यांची एकत्रित मोजणी करतात. या गटाला ‘Electrolytes’ असे म्हणतात.
आता कोणत्या आजारांत ही पातळी कमी/जास्त होते त्याचा आढावा घेतो.

रक्तातील सोडियम कमतरता :
रुग्णालयात दाखल रुग्णांत खूप वेळा आढळणारी ही स्थिती विशेषतः खालील आजारांत दिसते:
१. हृदयकार्याचा अशक्तपणा (failure)
२. मूत्रपिंड विकार
३. तीव्र जुलाब व उलट्या होणे

सोडियम-पातळी कमी होणे हे मेंदूसाठी धोकादायक असते. त्यामुळे या पातळीवर बारकाईने लक्ष द्यावे लागते. पातळी १२० च्या खाली गेल्यास ती गंभीर अवस्था असते.

रक्तातील सोडियम अधिक्य:
ही स्थिती तुलनेने कमी रुग्णांत आढळते. मूत्रपिंडाच्या व्यवस्थित कामासाठी Aldosterone व ADH या हॉर्मोन्सचे कार्य व्यवस्थित असणे महत्वाचे असते. अनुक्रमे Adrenal व Pituitary ग्रंथींच्या आजारांत ते बिघडते आणि त्यामुळे ही अवस्था येते. वाढत्या पातळीचाही मेंदूवर विपरीत परिणाम होतो. ती १६०चे वर गेल्यास ते गंभीर असते. तेव्हा रुग्ण बेशुद्ध पडतो.

…. तर असे हे धातूरुपी मूलद्रव्य – सोडियम. मिठाच्या खाणी, समुद्राचे पाणी आणि संपूर्ण जीवसृष्टीत आढळणारे. आपल्यासाठी जीवनावश्यक आणि आहारात माफक प्रमाणात हवेच. मात्र जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात त्याचा आहारातील अतिरेक मात्र नको.
***********************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या बाबांच्या रक्तात सोडियमचं प्रमाण अनेकदा कमी झालं आहे. आताही १२६ च्या आसपासच असतं.
अशा वेळी डॉक्टर त्यांना Resodim ही गोळी देतात. ही गोळी लघवीचं प्रमाण वाढवते आणि त्यामुळे रक्तातील सोडियमची पातळी वाढते, असं वाचलं. म्हणजे सोडियम लघवीवाटे वाहून जात नाही का?

चांगला प्रश्न.
Resodim = TOLVAPTAN

या औषधाचे कार्य म्हणजे शरीरातील ADH या हार्मोनच्या कार्याला विरोध करणे.
असे केल्यामुळे लघवीतून निव्वळ पाण्याचे उत्सर्जन बरेच वाढते.
परिणामी रक्तातील सोडियमचे तुलनात्मक प्रमाण वाढून नॉर्मल पातळीवर येते.
हे औषध सोडियम उत्सर्जनावर परिणाम करत नाही.

नवरा मरीन इंजिनिअर आहे. इंजिन रुममध्ये काम करताना function at() { [native code] }इशय घाम येतो. तेव्हा त्या लोकांना सॉल्ट टॅब्लेटस घ्याव्या लागत.
-------------
तुमचे लेख फार छान असतात

ऐकावे ते नवलच :

एक किलो मिठाचा भाव आठ लाख रुपये !
https://pudhari.news/vishwasanchar/404096/expensive-salt-%E0%A4%9C%E0%A4...

https://www.google.com/search?q=Icelandic+salt&oq=ice&aqs=chrome.0.69i59...

ते मीठ तयार करण्याची प्रक्रिया इतकी महागडी आहे असे दिसते.

हे मीठ माणसाने कधी ह्या पूर्वी सेवन केले आहे का?
केले नसेल तर ते मानवी शरीराला सूट होण्याची शक्यता मला तरी खूप कमी वाटत आहे.

सध्या तरी ते जाहिरातींत दिसते आहे.
मानवी आरोग्य-प्रयोग झाल्याचे वाचनात नाही.

भुगर्भ-उष्णतेचा तांत्रिक वापर ही इतकी महाग गोष्ट आहे ? कोणी सांगावे.

वरील चर्चेत उल्लेख झालेल्या डॉ. दिलीप महालनबीस
यांना काल भारत सरकारतर्फे मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे.

एक चांगला लेख:
नवा 'मिठाचा सत्याग्रह'
https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/athatho/daily-intake-of-sa...

"आपल्या देशातील नागरिकांच्या आहारातील मिठाचे-सोडियमचे प्रमाण मर्यादेत राहावे, यासाठी नव्याने अन्न व आहार धोरण तयार करणाऱ्या अवघ्या नऊ देशांची नावे पाहा. ब्राझील, चिली, चेक रिपब्लिक, लिथुआनिया, मलेशिया, मेक्सिको, सौदी अरेबिया, स्पेन आणि उरुग्वे हे ते नऊ देश आहेत".

Post liked.

लोकांच्या खाण्यावर सरकार चे नियंत्रण नको.
निर्बंध आले की काळाबाजार वाढतो आणि किंमती वाढतात.
दारू,सिगारेट,ड्रग्स, हे नशेचे पदार्थ वापरायचे की नाही हे लोकांच्या मनावर ,करणं ह्या व्यवसायात पैसा खूप आहे म्हणून पूर्ण निर्बंध नाहीत.
आणि मीठ ह्यांना जास्त धोकादायक वाटत आहे.
लोकांचे फक्त प्रबोधन करा ..उगाच भीती दाखवून निर्बंध बिलकुल नकोत.
भारतात तर अजिबात नकोत

मागच्याच महिन्यात आईला पेसमेकर बसवला.त्यानंतर तिची काही complications झाली होती.त्यावेळी आई एखाददुसरे वाक्य असंबद्ध बोलायची. डॉक्टरांनी सोडियम टेस्ट केल्यानंतर सोडियम लेव्हल कमी झाली होती.त्यावेळी रिकाम्या कॅप्सूलमध्ये मीठ भरुन तिला देत असत.

देवकी
तुमच्या मातोश्रींना आरोग्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

आहारातील गरजेपेक्षा जास्त मीठ आणि उच्चरक्तदाब यांचा परस्परसंबंध सर्वज्ञात आहे. परंतु ज्यांचा रक्तदाब नेहमीच नॉर्मल असतो अशा लोकांनीही मिठावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे का, हा काहीसा वादग्रस्त आणि चर्चेचा विषय आहे. अलीकडील एका संशोधनातून या मुद्द्यावरही प्रकाश पडलेला दिसतो.

या प्रयोगात रक्तदाब नॉर्मल असणाऱ्या लोकांमध्ये आहारातील मिठाचे प्रमाण दीर्घकाळ वाढवण्यात आले आणि त्यानंतर आधुनिक स्कॅन्सच्या मदतीने त्यांच्या हृदय आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांचा अंतर्गत अभ्यास करण्यात आला.

निष्कर्ष :
1. आहारातील मिठाचे प्रमाण वाढवत नेल्यास रक्तवाहिन्यांमध्ये मेदयुक्त पुटे(atherosclerosis) लवकर चढू लागतात. या स्थितीत रक्तदाबावर परिणाम झालेला नसतो, परंतु तेव्हाही मिठाचे प्रमाण सातत्याने अधिक राहिल्यास याची पुढची संभाव्य अवस्था म्हणजे उच्चरक्तदाब.

2. तसेच, भविष्यात अशा काही लोकांचा रक्तदाब नॉर्मल राहूनही हृदयविकार व मेंदूविकाराचा धोका स्वतंत्रपणे वाढतो.
या मुद्द्यावरील संशोधन दीर्घकाळ होण्याची गरज आहे.

सारांश: (रक्तदाबाचा मुद्दा वगळून देखील) सर्वांसाठीच मीठ नियंत्रण महत्त्वाचे.

डॉ. कुमार,
तुम्हाला संपर्कातून इमेल पाठवली आहे. कृपया बघाल का?
धन्यवाद!

स्नेहा
मी मेलवर लक्ष ठेवून आहे ( spam सह). अद्याप मिळालेली नाही.

पुन्हा जरूर पाठवून बघा. आतापर्यंत मला अन्य वाचकांच्या मिळालेल्या आहेत.
एखाद्याची जेव्हा पहिल्यांदाच येते (किंवा मी त्याला पाठवतो ) तेव्हा ती स्पॅममध्ये जाते हा अनुभव आहे.

स्नेहा,
तुमची दुसरी ई-मेल सुद्धा अद्याप मिळालेली नाही. तुम्ही वेमा यांच्याशी थेट संपर्क साधून त्यांचा सल्ला घ्यावा असे वाटते.
****************************************************************************************
आज जागतिक उच्चरक्तदाब जागृती दिन आहे. त्यानिमित्ताने या विषयातील जागतिक तज्ज्ञांच्या संघटनेने सुचवलेले जीवनशैलीशी संबंधित काही सोपे प्रतिबंधात्मक / पूरक उपाय खालील चित्रात पाहता येतील :

HTN prevent.jpeg

अधिक माहितीसाठी हा दुवा https://journals.lww.com/jhypertension/fulltext/2024/01000/lifestyle_man...

( चित्र वरील दुव्यातून साभार ! )

डॉ. कुमार, मी वेमाना संपर्क केला आहे. पण इथेच प्रश्न लिहिते आहे, मराठी मध्ये नाही पण.
One relative was prescribed a water pill for BP , that didn't suit her. After starting the pill in few days she had horrible headache, shaking, very dry mouth, tingling in face, vomiting etc. She was diagnosed as low sodium/electrolytes and was hospitalized for 2 days. She was discharged 2 days ago but still has lot of tiredness. She was told not to take that pill.
Can you please share some tips on how to recover faster?

water pill
>>> या गटातील औषधांचा हा दुष्परिणाम आहे हे बरोबर.
आता प्रत्यक्ष त्रास झालेलाच असल्यामुळे डॉक्टरांच्या सूचनांचेच पालन करावे.
दिवसभरात मोजून किती पाणी प्यायचे आणि सोडियम वगैरे कोणत्या स्वरूपात किती घ्यायचे याच्या सूचना संबंधित डॉक्टर देतील.
यापेक्षा अधिक इथून काही सांगता येणार नाही.

व्यक्तिगत सल्लामसलत आपण येथे करत नाही.
त्यांना शुभेच्छा !

डॉ. कुमार, तसा नव्हता माझ्या म्हणण्याचा अर्थ. त्यांना खाण्यापिण्याचे सांगितले आहे.

खरं म्हणजे काही जनरल सूचना म्हणायचे होते मला. आजारातून उठलेल्या व्यक्तीने कशी हळूहळू शक्ती भरून काढावी, चालणे फिरणे कसे सुरू करावे, मन प्रसन्न ठेवावे असे.
मला वाटले की मायबोलीवर या विषयावर असा एखादा धागा असेल पण मला सापडला नाही. अर्थात, हे पण आहेच की या गोष्टी आजाराबरोबर बदलतील.

Pages