विराम - २

Submitted by आस्वाद on 29 January, 2019 - 11:24

इतके दिवसांनी ती मनमोकळं कोणाशी बोलली होती. त्यामुळे मोकळं मोकळं, हलकं हलकं वाटत होतं. मैत्रीण जाताना तिला धीर देऊन गेली, चेहऱ्यावरचं हरवलेलं हसू देऊन गेली. मैत्रीण गेली तशी ती कामाला लागली. बाळ उठायच्या आत तिला जमेल तितकी कामं उरकायची होती. काम करता करता तिचं मन भूतकाळात गेलं.

तिला इंजिनीरिंग करून नोकरी लागली मुंबईला तेव्हा ती खरं म्हणजे खूप बावरली होती. पहिल्यांदा घरापासून लांब जायचं होतं. पण संधी खूप छान मिळाली होती. सिविल इंजिनीरिंग केल्यावर लगेच इतक्या मोठ्या कंपनी मध्ये नोकरी मिळणं, सगळ्यांनाच साध्य नव्हतं. तिनी पण संधीचं सोनं करायचं ठरवलं. 'मुली काय साईट वर काम नाही करत, नुसतं डेस्क जॉब करतात. सिविल तर निव्वळ सहज मिळते सीट म्हणून जातात' अशा टोमण्यांना तिला चांगलंच उत्तर द्यायचं होतं. तिनी स्वखुशीने साईट जॉब मागून घेतला. लोक म्हणतात ते खोटं नव्हतं, तिच्याशिवाय दुसरी कोणी मुलगी नव्हती साईट वर कामगारांशिवाय. पण तिला खूप आवडला होता हा जॉब. शिवाय टीम, मॅनेजर सगळेच सांभाळून घेणारे होते. दिवस छान जात होते. रूममेट्स पण मस्त मिळाल्या होत्या. सगळ्याजणी नोकरी साठीच घरापासून लांब राहत होत्या. त्यामुळे त्यांच्यात छान मैत्री झाली होती. एकत्र राहायचं, वीकेंडला भटकायचं, शॉपिंग करायची, मूवी बघायची असं सगळं मनमोकळं राहता येत होत. तिला आई-पप्पांनी आधीच सांगितलं होतं, कि पॉकेटमनी सारखा वापर तुझा पगार. अजून लागले पैसे तर कळव घरी. आई-बाबांना कोण कौतुक त्यांच्या लेकीचं!

पण ३-४ वर्ष झाले तसे घरी स्थळं बघायला सुरुवात झाली. तिला हे स्वच्छंदी आयुष्य सोडायचं नव्हतं, पण 'वेळच्यावेळी' सगळं करणं पण खोडून काढता येत नव्हतं. अशातच हे स्थळ आलं. फोटो पाहताक्षणीच तिला तो आवडला. इतक्या मुलांना नकार दिल्यावर हि कोणालातरी भेटायला तयार झाली याचाच आईला आनंद झाला. त्याला भेटली आणि तो अधिकच आवडला. फोटोपेक्षा जास्त देखणा होता तो. वयात ४-५ वर्षांचं अंतर होतं. त्यामुळे वागण्यात एक समंजसपणा होता, तिला caring वाटला. २-३ वेळेस भेटून तिनी घरी होकार कळवला. आईनी तीनतीनदा तिला विचारलं, नक्की होकार कळवू ना म्हणून.
शेवटी वैतागून तिने विचारलंच, "तुला आवडला नाही का मुलगा?"
"तसं नाही गं. पण त्यांचं घराणं आपल्यासारखं नाहीये ना. तुला आपल्याकडे कधीच आम्ही रोक - टोक नाही केली. पाहिजे ते करायची मुभा आहे तुला. इतकी वर्षं झाली तुला नोकरी करून, पण कुठली आर्थिक जबाबदारी तुझ्यावर नाहीये. त्यांच्याकडे जरा वेगळं वातावरण आहे. त्याची बहीण फार शिकलेली, करिअर करणारी नाही. घरात बिसिनेस आहे. आणि गाव पण लहान आहे. पुढेमागे तो घरच्या बिसिनेस मध्ये आला तर तू त्या लहान गावात काय करशील?"
तिला खरं म्हणजे आईचं पटत होतं, घरातलं अंतर जाणवत होतं. पण आता तो मनात ठसला होता, ती त्याच्या प्रेमातच पडली होती. तिनी आईला होकार कळवायला सांगितलं.

एकमेकांशी बोलण्यात, पुढचे बेत आखण्यात, नवीन स्वप्न सजवण्यात दिवस भराभर जात होते. साखपुडा झाल्यावर ६ महिन्यांनी लग्नाचा मुहूर्त होता. ते ६ महिने गडबडीत गेले. त्याची नोकरी पुण्यात होती आणि त्यांची ब्रांच मुंबईला नव्हती. तेव्हा तिनी पुण्यात नोकरी शोधायच नक्की केलं. लग्नाच्या आधीच नोकरी सोडून ती घरी गेली. महिनाभर आई-बाबांबरोबर, भावंडांबरोबर मजेत दिवस गेले. लग्न झाल्यावर पुण्यात आली. नवीन शहर, नवीन घर, नवीन नवरा सगळंच नवंनवं, हवंहवंस होत. थोडा सेटल झाल्यावर नोकरी पण मिळाली. त्यातच त्यांनी नवीन स्वतःचा फ्लॅट घेतला. मनासारखा जोडीदार, मनासारखं घर, मनासारखी नोकरी - सुख सुख म्हणतात ते हेच, असंच तिला वाटायला लागलं. ६ महिन्यातच इतकं काही झालं होतं.

पण नवऱ्याला कंपनीकडून यूएस ला जायची संधी मिळाली. त्याला हि संधी सोडवत नव्हती. नवरा एकटाच जायचं म्हणताच तिला रागच आला. "६ महिन्यात मला कंटाळास का?" तिनी रागातच विचारलं. त्याला हसूच आलं तिचा तो अवतार बघून.
" वेडी आहेस का? मला काय गम्मत वाटतेय का तुला इथे सोडून जाताना ?" तो म्हणाला.
"मग नकोच जाऊस ना" तिनी टोमणा मारला.
"अगं, तुला तर माहित आहे ना नवीन फ्लॅटचे हफ्ते किती येताहेत? आपण तुझा सगळा पगार त्यातच टाकला तरी कित्ती वर्ष हफ्ते भारण्यातच जातील. त्यापेक्षा मी यूएस ला जाईन २-३ वर्षं तर सेविंग्स होतील, वापस आल्यावर हा फ्लॅट हाताशी असेल. आणि मी तिथे जाऊन जरा बघतो किती दिवस राहता येईल. onsite जाण्यासाठी तर किती कॉम्पेटिशन आहे, पॉलिटिक्स आहे. जर वाटलं कि हा प्रोजेक्ट एक्सटेन्ड होईल, तर तू पण ये. वर्षभरासाठी सगळं इथलं सोडून कशाला येतेस?"

यावर तिच्याकडे पण उत्तर नव्हतं. शेवटी त्याचं जाण्याचं नक्की झालं. ती पुण्यात राहिली. बघता बघता वर्षं सरलं. आणि शेवटी नवऱ्याचा प्रोजेक्ट एक्सटेन्ड झाला. आता मात्र ती अजिबात एकटी राहणार नव्हती. राजीनामा दिला आणि व्हिसाचे सोपस्कार पार पाडून तिनी पण जायचं नक्की केलं. आपल्याला तिथे नोकरी करता येणार नाही, हे तिनी सहज accept केलं. २ वर्षं छान मजेत घालवू, कधी नव्हे ते आरामात राहू. रोज उशिरापर्यंत लोळत
पडू शकू, छान नवनवीन ठिकाणं पाहू, खूप पुस्तकं वाचू आणि परत एकदा नवऱ्यासोबत राहू शकू अशी स्वप्न बघतच ती पण यूएस ला पोचली.

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

> 'मुली काय साईट वर काम नाही करत, नुसतं डेस्क जॉब करतात. सिविल तर निव्वळ सहज मिळते सीट म्हणून जातात' अशा टोमण्यांना तिला चांगलंच उत्तर द्यायचं होतं. तिनी स्वखुशीने साईट जॉब मागून घेतला. लोक म्हणतात ते खोटं नव्हतं, तिच्याशिवाय दुसरी कोणी मुलगी नव्हती साईट वर कामगारांशिवाय. पण तिला खूप आवडला होता हा जॉब. >
इथून
> आपल्याला तिथे नोकरी करता येणार नाही, हे तिनी सहज accept केलं. २ वर्षं छान मजेत घालवू, कधी नव्हे ते आरामात राहू. रोज उशिरापर्यंत लोळत
पडू शकू, छान नवनवीन ठिकाणं पाहू, खूप पुस्तकं वाचू आणि परत एकदा नवऱ्यासोबत राहू शकू अशी स्वप्न बघतच ती पण यूएस ला पोचली. >
इथेपर्यंतचा प्रवास....

Ami - खूप मुली करतात असे, h4 वर येतात usa ला स्वतःची चांगली नोकरी सोडून.
आजकाल मुले पण येतात बायकोला onsite मिळाली तर.

आजकाल मुले पण येतात बायकोला onsite मिळाली तर. >>. हो, आमच्या ऑफिसात्ला एक जण गेला असा जॉब सोडुन. तिथे गेल्यावर मलाही शोधेन असे सांगत होता जाताना.