आठवणींची रिमझिम

Submitted by Asu on 28 January, 2019 - 06:57

आठवणींची रिमझिम

भल्या पहाटे प्रातःकाळी
प्राजक्ताखाली होतो बसलो
नको नको ते काय आठवुनी
मनात मी मलाच हसलो

प्राजक्ताचा सडा सांडला
आनंदे हा फुलून हसतो
रोष आठवुनी सत्यभामेचा
की दुःखावेगे टिपे गाळतो

हृदयाच्या छेडित तारा
रिमझिम सुमने गंधित वारा
प्राजक्तासम मनात डुललो
अंतरीच्या झुल्यात झुललो

आकाशी मुखचंद्र बघता
आठवणींनी बेधुंद झालो
चांदण्यांच्या टिपूर सरींनी
अंतर्बाह्य चिंब चिंब न्हालो

- प्रा. अरुण सु. पाटील ( असु)
(दि. 28.01.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults