घर अन् शेत

Submitted by तुकाराम मंदाडे on 27 January, 2019 - 21:33

हिरवेगार शेत आनंदाने डोलू लागले होते. वारा मंजुळ गाणी गात होता आणि त्यास कुठे तरी मक्याची धाटाची पाने साथ देत होती. सर्वत्र हिरवळ पसरली होती आणि धरतीने हिरवा शालू नेसून स्वत:तच गुंग झाली होती. आभाळात ढग पाठशिवणीचा खेळ खेळत होते. एक ढग दुसर्‍या ढगाला पकडल्यावर मध्येच वीज पकडण्याचा संकेत देत होती. खेळ चांगलाच रंगला होता. का कुणास, ठाऊक खेळ मोडला होता. कोणी रूसले असावे अथवा चिडले असावे, असो. खेळ मोडून सर्वजण विखुरले गेल्याने पाऊस पडण्याची शक्यताच विरून गेली होती.
मोहनचे शेत रस्ताच्या कडेलाच होते. मोहनने शेतात मूग पेरला होता आणि आता मूग काढणीला आला होता. कुठे तरी मुगाच्या शेंगा हिरव्या दिसत होत्या. मोहन बांधावर गायी चरत होता. एक बांडी गाय मुगाच्या शेतातील मक्याचे धाटाचे कणीस खत होती. तेव्हा मोहनने गायीच्या दिशेला काठी उगारून ‘ उ --य—‘ ओरडत तिच्याकडे धावला. त्या गायीला काठी मारण्यापूर्वीच गाय बांधावर जाऊन थांबली.
रामजी घराकडे निघाला होता. त्याने मोहनला बघून म्हणाला “ रामराम कारभारी.”
मोहन थोडा झुकून म्हणाला “ रामराम रामदा.”
“ काय गायी वळता व्हय ?”
“ व्हय.”
“ चल मग निघतू, लई काम पडलेत.”
“ आव्ह, थांबा की राव. तंबाखू तर खाऊन जा.”
“ मग काढा की.”
मोहनने खमिसाच्या खिशातून तंबाखूचा बटवा व चुन्याची डब्बी देत म्हणाला “लई घाई दिसत्याय.”
मोहनकडून तंबाखूचा बटवा व चुन्याची डब्बी घेत म्हणाला “तसं काय बी नाय.”
मोहन चुन्याच्या डब्बीकडे पाहत म्हणाला “ मदी चुना हाय का नाय?”
रामजी चुन्याच्या डब्बीचे झाकण काढून म्हणाला “नाय, संमदा संपून गेलाय. रिकामच दिसतोय. “
मोहन गंभीर स्वरात म्हणाला “आता व्ह—!“
“ त्याची काही चिता करू नकोस, माझ्याजवळ हाय की.”
“ बरं झालं , काय का व्हईना.”
रामजीने बटव्यातून तंबाखू काढून उजव्या हाताच्या तळहातावर घेतली आणि स्वत:च्या खिशातून चुन्याची डब्बी काढली. तंबाखूची मूठ झाकून त्याला चुना लावून अंगठ्याने मळत मळत म्हणाला “ बांडी गाय गेल्याय का ?”
मोहन रामजीकडून तंबाखूचा बटवा व चुन्याची डब्बी घेत म्हणाला “नाय.”
रामजीने मळलेली अर्धी तंबाखू मोहनला दिली व अर्धी आपल्या ओठाखाली ठेवत म्हणाला “ दूद बी मायदळ देत असाल की?”
“ नाय.”
“ कस काय कारभारी? येऊन तर चार-पाच महिनेच झालेत की.”
मोहन तंबाखू थुंकत म्हणाला “व्हय , ते बराबर हाय; पर त्याच्या पुढं कुणाचं चालतय व्हय ?”
“बरं, तिच्या पोटाखाली काय हाय?
“हाय नाय होतं. काळवड व्हती महिन्याखालीच मेलय.”
“रामजी चेहर्‍यावर दुख:चे भाव आणत म्हणाला “कसं कारभारी?”
“ तिला खुरी आली व्हती. तानं बच्चा व्हत. सहन झालं नाय अन् त्यास्नी जीव गमवावा लागला.”
ते वाईट झालं. तवा येल्यावर गायीवाणी दिसत व्हत.”
“ व्हय”
रामजी मुगाच्या शेताकडे नजर टाकत म्हणाला “ मूग काढाय आलाय की? तवा काढून घ्यावं मनलं.”
मोहनने कपाळाचा घाम पुसत म्हणाला “ व्हय, कुठं कुठं हिरव्या शेंगा दिसल्यात.”
“ हाईत पर पाऊस-बिऊस आलं म्हंजी समदीच माती वहाणार की.”
“ नायी, आज काढून घ्यायच व्हत; पर गावात ढोराच डाक्टर आलं व्हत, म्हणून म्या गायीला इंजीशन द्यायला गेलो होतो.”
“ तुला मूग मायदळ मूग व्हणार हाईत की. तवा माला गाय घ्यायला पयसं देशील का? म्हंजी लेकर लई दूध दूध करालेत. पोळ्याला सवाई देईल की.”
“ दिलो असतो ; पर म्या गेल्या वरसी बैनीकून धा हाजार आणलेत , ते द्यायला हवं की नको.”
“ म्हंजी तसं हाय म्हणा की “
“खरं म्हंजी म्याच तुझ्याकड पयशासाठी येणार व्हतो. आदीच एकादशीच्या घरी शिवरातर.”
रामजी विषयांतर करून म्हणाला “ बरं जाव दे. आदी शेंगा वरपायच बग . ह्याच काही सांगता येत नायी.”
“ व्हय.”
रामजी टोपी सावरत म्हणाला “ ती बंदी गाय वावरात पडल्याय . चल म्या निघतू . टाइम मायदळ झालाय तवा निघाय हवं .” अन् निघाला.
मोहन गायीकडे काठी उगारून धावत ओरडला ” उ---य—“
गायीने ओळखीचा आवाज ओळखून मक्याचे धाट सोडून बांधावर आली. मोहन त्या गायीकडे डोळे वटारून म्हणाला “ च्या बायला , धुर्‍यावर एवढं मठ्ठ चरायला हाय अन् वावरात काय पडलय.”
दिवस मावळतीला गेला होता आणि आकाशात लाल छटांचे रूपांतर आता निळसर छटात होऊ लागले होते. पक्षांचे थवे त्यांच्या घरट्यांच्या दिशेला निघाले होते. शेतातील गुरे घरच्या दिशेला निघाली होती. काही दुभती गुरे वासराच्या ओढीने हंबरत घराकडे धावत सुटली होती.
मोहनने बांधाच्या बाजूला ठेवलेला गवताचा भारा उचलून गायींना घराकडे हाकू लागला आणि ह्मं ह्मं म्हणता घर आले. गायी घरी गेल्यावर दावणीला जाऊन राहिल्या. मोहनने गायीला बांधण्यासाठी तिच्या मुरकीला धरून दाव्याने बिरडं फोडलं.
बाळया-मोहनच्या मुलाने घरात जाऊन मोहनसमोर पाण्याचा ग्लास देत म्हणाला “ अण्णा, हेव पाणी घ्या. “
मोहनने ते पाणी गटागटा पिऊन बाळ्याला म्हणाला “ जा, आणखी एक गिलास घेऊन ये.”
बाळया घरात धावतच जाऊन एक ग्लास पाणी घेऊन आला व मोहनला दिला अन् मोहनने तोही ग्लास संपविला. बाळया रिकामा ग्लास घेऊन होमवर्क करायला घरात गेला. मंजुळाबाई-मोहनची बायको कंबरेवर हात ठेवत म्हणाली “ चला उठाव बाई, अजून भाकर्‍या बडवायच्या हाईत अन् उदयाला मूग काढायचा हाय.” अन् भाकर्‍या करायला गेली.
मोहनने बाळ्याला हाक मारली ,” बाळया, पेंड भिजू घातल्याय का नाय?”
बाळया होमवर्क बाजूला ठेऊन बाहेर येत म्हणाला “काय अण्णा?”
“म्या काय यड्डोळ बोंबलोत व्हतो व्हय ?”
“ पर............”
“ बरं, सांग की पेंड भिजू घातल्या का नाय?”
“ अण्णा, म्या तर तवाच भिजू घातलाव की.”
“ बरं ,जा. अभ्यास कर.”
“बर “ म्हणून बाळया घरात अभ्यास करायला गेला.
आभाळात पुन्हा एकदा काळ्याकुट्ट ढगांचा पाटशिवणीचा खेळ सुरू झाला. काळेकुट्ट ढग सैरावैरा धाऊ लागले आणि काही वेळेस धावत असताना एकमेकावर आदळू लागले. वाराही त्या ढगांमध्ये भांडण लावण्यासाठी फूस लावत होता , त्या काळेकुट्ट ढगामध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि त्याचा आवाज धरतीपर्यंत पोहचू लागला. वीजही त्या भांडणाचे प्रदर्शन करत होती. आता त्या भांडणामध्ये कर्णकर्कश आवाज रेगारण्याबरोबर रडणेही सुरू झाले होते. आभाळात ढगांचा कडकडाट व विजांचा चमचमत होताच धो-धो पाऊस पडू लागला.
मुसळधार पाऊस सुरू झाला अन् वारा सैरावैरा वाहू लागला. पावसाचे टपोरे थेंब घरावरील पत्रावर पडल्यामुळे टपटप आवाज येत होता. त्या आवाजामुळे सहज बोललेलेसुद्धा ऐकू येत नव्हते. अचानक एका ठिकाणी पत्राच्या सरीतून पावसाचे पाणी घरात पडू लागले. मोहनने पडणारे पावसाचे पाणी पाहून मंजुळाबाईला ओरडला “ चल, उठ इथून, पेंडीच पोत भिजू लागलय.”
तो व मंजुळाबाई पेंडीच पोतं पाणी जेथे येणार नाही तेथे नेऊन ठेवलं. इतक्यात बाळया रडत रडत येऊन म्हणाला “मज्या समद्या वह्या अन् पुस्तकं भिजल्या हाईत.”
मोहन त्याच्याकडे बघत म्हणाला “ तवाच काढाव का नाही र .”
बाळया डोळे पुसत पुसत म्हणाला “तवापस्तोर समद्या वह्या भिजल्या व्हत्या.”
मोहन त्याची समजूत काढत म्हणाला “ बरं , जाऊ दे. तुला आपण नव्या वह्या घेऊन देऊता.”
बाळ्याच्या रडण्याचे स्वर त्याच्या बोलण्यात मिसळून म्हणाला “ पर म्या तेवढया वह्या कवा लेवू.”
मोहन बाळयावर खेकसला “ एमजी म्या लेवेन देऊ काय !”
मंजुळाबाई कोपर्‍यात बघत मोहनला म्हणाली “ आव्ह, इथं तर पाण्याची धारच लागल्याय .”
लगेच मोहन मंजुळाबाईवर खेकसला “ मग काय बगालीस? जा, खाली काही टोपलं ठेव.” अन् लगेच मंजुळाबाईने टोपल आणून त्या पाण्याच्या धारेखाली ठेवलं.
कडकडून चमकलेली वीज पत्रातून काही वेळेस दिसत होती. त्या वेळेस बाळया मंजुळाबाईला घट्ट बिलगला. तेवढ्यात मोहन मंजुळाबाईला ओरडला “ ए—य-, त्याला घेऊन तिथं का थांबलीस? डोक्यात धोंडा-बिंडा पडलं की.”
तेव्हा ती दोघं घरातील एका कोपर्‍यात सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबले अन् पाहतो तर काय ! घरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. बाळया त्याच्या आईला म्हणाला “ आई, माला झोप यायल्याय. “
बाळ्याचे पेंगुरलेले डोळे पाहून मोहन मंजुळाबाईला म्हणाला “त्या घेऊन दरवाज्यात उभी रहा म्हंजी डोक्यात धोंडा-बिंडा पडणार नाही.” अन् ते दोघे दरवाज्यात उभे राहीले, तेव्हा बाळया त्याच्या खुशीत तसाच झोपी गेला. आणि त्या दोघांना सबंध रात्र तशीच उभी राहून काढावी लागली.
सकाळी सकाळी कोंबड्याने बाग दिली आणि मोहनला जाग आली. रात्रीच्या पावसामुळे नदी, नाले तुडूंब वाहत होते. पाण्याचा खळखळ असा आवाज कानी ऐकू येत होता. सूर्याची कोवळी कोवळी किरणे धरतीवर पसरत होती. धरती काळ्या रंगाचे घोंगडे दूर सारून तांबूस रंगाचे वस्त्र परिधान करू लागली होती. सूर्य डबक्यातील पाण्यामध्ये स्वत:चे प्रतिबिंब पाहत होता.
मोहनने मंजुळाबाई दारातच झोपलेली पाहून तिला हलवत म्हणाला “ चल, उठ आता. घरातलं पाणी भरून काढ अन् काय भिजले ते बग. मया शेताकडे जाऊन येतो. काय झालय ते बगून येतो. “ तिने बाळयाला दूर सारून डोळे चोळत उठली अन् कमला लागली.
मोहन शेताच्या वाटेला निघाला. सर्वत्र चिखलच चिखल झाला होता. तो एक पाय चिखलातून काढून दुसरा चिखलात टाकत शेतापर्यंत पोहचला.
अन् पाहतो तर काय ! शेतातील संपूर्ण मूग आडवा पडला होता अन् त्याच्या शेंगा फुटल्या होत्या. फुटलेल्या मुगाला कोंब फुटत होते. सर्व मुगाचे नुकसान झाले होते आणि मोहनने डोक्याला लावलेला हात काढलाच नव्हता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे Sad
फक्त तो होमवर्क शब्द खटकला...

कुनीकडं व्हता इतके दिस...
लय बेस लिहून राहीले, आता इतक्यात नगा संपवू, वाईज मनावर घेऊन म्होरचा भाग लिव्हायचं बगा