चक्र

Submitted by nimita on 26 January, 2019 - 04:21

'चक्र' किंवा 'चाक' या अभूतपूर्व वस्तूचा शोध हा मानवाच्या उत्क्रांतीमधला एक महत्वाचा टप्पा समजला जातो.

खरंच आहे हे ! माझ्या वाचण्यात आलं आहे त्याप्रमाणे आदिमानव सुरुवातीला या चाकाचा उपयोग फक्त जड वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी करत होता. पण हळूहळू त्याला या चमत्कारी वस्तूचे इतरही अनेक उपयोग लक्षात यायला लागले आणि त्याची जीवनशैली च बदलून गेली.

त्या आदियुगापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत मानवाबरोबरच या चाकाचं रूप देखील बदलत गेलं.

आज हे 'चक्र' किंवा 'चाक' आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनलं आहे. अगदी आपल्या वाणीपासून ते करणी पर्यंत आपल्याही नकळत आपण या चाकाच्या चक्रात सापडलो आहोत.

तसं पाहिलं तर या चाकामुळे मानवाच्या प्रगतीला चांगलीच 'गती' मिळाली आहे, पण मला मात्र काही बाबतीत कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं.

म्हणजे बघा ना- शूरवीर सैनिकांना आपल्या पाठीवर बसवून युद्धभूमीमधे थैमान घालणारा अबलख घोडा या चाकामुळे एका टांग्याला बांधला गेला. आणि याहून लाजिरवाणी गोष्ट म्हणजे-दारिद्र्याच्या चक्रातून बाहेर पडता यावं म्हणून काही ठिकाणी या घोड्याची जागा मनुष्य प्राण्यांनी घेतली. यापरते दुर्दैव ते कोणते!

काळ्या मातीतून हिरवं सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा सच्चा साथीदार असा बळीराजा...नांगर ओढताना किती सात्विक सोज्वळ दिसतो ;पण तोच जेव्हा बैलगाडीचं जू आपल्या मानेवर पेलतो तेव्हा त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त केविलवाणा दिसतो.

आणि जेव्हापासून ही चाकं सुटकेस च्या खाली लागली तेव्हापासून हमालांच्या अर्थार्जनावर मात्र गदा आली आहे.

पण या सगळ्यांत त्या बिचाऱ्या चाकाची काय चूक ? त्याचं काम आहे गतिशील राहाणं. पण ती गती कशी आणि कुठे वापरायची हे सर्वस्वी वापरणाऱ्याच्या गरजेवर आणि त्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे.

कधी हे चाक अंदमानच्या तुरुंगात तेलाच्या घाणीचा कोलू बनूनही एखाद्या स्वातंत्र्य वीराच्या जाज्वल्य देशप्रेमासमोर हतबल ठरतं , तर कधी एखाद्याच्या हातचा चरखा बनून लोकांना गुलामगिरीतून मुक्त करतं.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण कितीतरी ठिकाणी या चाकाचा वापर करत असतो. बऱ्याच वेळा तर आपल्या लक्षातही येत नाही. म्हणजे अगदी स्वैपाकघरापासून ते अंतराळ प्रवासापर्यंत... वेगवेगळ्या रूपांत हे चाक आपल्याला मदत करतं.

भल्या पहाटे एकीकडे जात्यावर धान्य दळता दळता बहिणाबाईना ओव्या स्फुरतात !

कधी ते स्वैपाकघरातलं 'कातणं ' बनून एखाद्या सुगरणीच्या करंज्याना नक्षीदार झालर लावायला मदत करतं तर कधी एखाद्या रसवंती गृहात आलेल्या पांथस्थाला थंडगार उसाचा रस पाजून तृप्त करतं.

एखाद्या आलिशान बंगल्यातल्या मुलांच्या रिमोट कंट्रोल कारची 'hot wheels' असो वा झोपडीत राहणाऱ्या मुलांचं जुनं रबरी टायर....त्यातून मिळणारा आनंद सारखाच असतो.

आणि या हरहुन्नरी चाकाचा वापर फक्त मनुष्य च नाही तर देवांनीही केला आहे.. जेव्हा जशी गरज भासली तसा ....

'वेडा कुंभार' बनून विठ्ठलानी या फिरत्या चाकावर मातीला आकार दिला. पण जेव्हा दुष्टसंहाराची वेळ आली तेव्हा हेच चाक कृष्णाच्या तर्जनीवर सुदर्शन चक्राच्या रुपात झळकलं आणि त्यानी शिशुपालाचा वध केला.

या चक्राची (किंवा चाकाची ) व्याप्ती इतकी आहे की ते आपल्या शब्दसंग्रहाचा एक अविभाज्य घटक आहे..अगदी देवळातल्या चक्रीभजना पासून ते रणांगणा वरच्या चक्रव्यूहापर्यंत.....

गणितातील चक्रवाढ व्याजापासून ते विनाशकारी चक्रवाती वादळापर्यंत.

अहो, थोरा मोठ्यांनी तर पती पत्नी यांना 'संसाराच्या रथाची दोन चाकं' असं म्हटलंय.

इतकंच नव्हे तर स्वतःमधे थोडेफार बदल करून हा शब्द आता बोली भाषेत देखील छान रुळला आहे. 'चक्रम','चक्कर' ,'चकरी','चाकोरी' ही याची काही गोंडस उदाहरणं !

थोडक्यात काय तर , स्वतःच निर्माण केलेल्या या चक्रात आपण आता पूर्णपणे अडकलो आहोत ....बाल्यावस्थेतल्या पांगुळ गाड्यापासून ते उतारवयातल्या व्हील चेअर पर्यंत....या चाकोरीबद्ध आयुष्यातून आता आपली सुटका नाही !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users