पापण्यांना बांधशी का आसवांची तोरणे ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 24 January, 2019 - 04:24

पापण्यांना बांधशी का आसवांची तोरणे ?

राधिके येईल मोहन, समजवत यमुना म्हणे !
पापण्यांना बांधशी का आसवांची तोरणे ? !! धृ !!

गोपिकांचा घोळका उद्विग्न का करतो तुला ?
गंध येतो वेगळा हरएक फुललेल्या फुला !
मान्य कर, अष्टौप्रहर सोडून दे खंतावणे
पापण्यांना बांधशी का आसवांची तोरणे ? !!१!!

बासरी उच्चारते ना मंत्र नावाचा तुझ्या ?
मोरपिस मुकुटातले व्याकूळ ना बघण्या तुला ?
वेगळे ह्याहून नाही ना तुझेही मागणे ?
पापण्यांना बांधशी का आसवांची तोरणे ? !!२!!

सानिके कानात तुझिया गुपित आहे सांगते
सावळ्याच्या अंतरीची ओढही मी जाणते
भेटण्यासाठी सजण व्याकूळ आहे साजणे
पापण्यांना बांधशी का आसवांची तोरणे ? !!३!!

राधिके येईल मोहन, समजवत यमुना म्हणे !
पापण्यांना बांधशी का आसवांची तोरणे ? !! धृ !!

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर ताई...पापण्यांना बांधशी का आसवांची तोरणे ?> किती सुंदर सुरूवातच आहे...
बाकी सगळ्या उपमा अप्रतिम...