तरही - आहे तशीच होते, होते तशीच आहे

Submitted by सुप्रिया जाधव. on 21 January, 2019 - 14:52

तरही

ओळीसाठी बेफिकीरजी ह्यांचे आभार मानून...

पूर्वी तुझीच होते, अजुनी तुझीच आहे
(आहे तशीच होते, होते तशीच आहे)

काळानुरूप नाती बदलू नकोस मित्रा
दिनदर्शिका बदलते खुंटी जुनीच आहे

झाले बरेच झाले अश्रू झरून गेले
डोळ्यांमधे व्यथेला जागा हवीच आहे

प्रेमामधे स्वतःच्या पडते अश्याचसाठी
वर्षानुवर्ष जागा ती मोकळीच आहे

आयुष्यभर जिच्यावर विश्वास टाकला तू
ती साथ सोडणारी छाया तुझीच आहे

एकांतवास मिळता हे ही कळून आले
दोघांमधे तफावत आहे बरीच आहे

पूर्वी म्हणायचा जो आहेस फक्त माझी !
विसरून सर्व हे तो गेला कधीच आहे

ह्यांच्यातली समस्या ही वेगळीच आहे
तोही कवीच आहे तीही कवीच आहे

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह वाह फार सुंदर...

ह्यांच्यातली समस्या ही वेगळीच आहे
तोही कवीच आहे तीही कवीच आहे> किती मस्त! हे फार आवडले...

आयुष्यभर जिच्यावर विश्वास टाकला तू
ती साथ सोडणारी छाया तुझीच आहे> छान!

A1

प्रचंड आवडली

झाले बरेच झाले अश्रू झरून गेले
डोळ्यांमधे व्यथेला जागा हवीच आहे >> जबरा सुंदर