वा ! मानवा !

Submitted by Asu on 18 January, 2019 - 09:52

वा ! मानवा !

देवकृपेच्या छत्राखाली
जगतो सालोसाल
नाही भरवसा उद्याचा तरी
बांधी भव्य महाल

टपून बसले जागोजागी
यमदूताचे अवतार
कधी अचानक यम येईल
अपघात आजारावर स्वार

आयुष्याची दोरी नाजुक
विश्वास कसा करणार
तुटेल कधी आणि कुठेही
चिता कधीही सजणार

रात्रीचा अंधार टपला
घेण्या तुझा घास
तरी झोपशी तू सुखाने
कमाल, तुझा विश्वास!

आयुष्य तुझे अधांतरी
ना पायाचा आधार
कशा बळावर भरविशी
तू हा मायेचा बाजार

भविष्य तुझे तुला न ठावे
भूतकाळाचे गाई गाणे
वर्तमानाचा तू गुलाम
तरीही जगशी आनंदाने

जगणे तुझे कमाल मानवा
वा ! मानवा, तुला सलाम !
वा ! मानवा, तुला सलाम !

- प्रा. अरुण सु. पाटील (असु)
(दि. 18.01.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults