मी टू .......

Submitted by शरद on 18 January, 2019 - 04:29

मी टू, मी टू करता करता, का रडशी तू मुळू मुळू?
थप्पड पडली नव्हती म्हणुनी स्वैरपणे फिरतात वळू! ........... || धॄ ||

साथी म्हटले विश्वासाने,
कापला गळा पण केसाने,
उभे ठाकले संकट, सारे विश्व तुझे लागले जळू
थप्पड पडली नव्हती म्हणुनी स्वैर इथे फिरतात वळू! ........... ||१ ||

केलेस सहन तू का सारे?
की घडले सारे व्यवहारे?
खचून गेली? की निर्ढावत? पदर कशाला दिला ढळू?
थप्पड पडली नव्हती म्हणुनी स्वैर कसे फिरतात वळू! ........... ||२||

नव्हतीस कधीही तू अबला,
रणचंडीचा अवतार भला,
कडाडते जर आसुड असते, नीच अधम लागले पळू
थप्पड पडली नव्हती म्हणुनी स्वैर पहा फिरतात वळू! ........... ||३ ||

रात्रीनंतर येतेच उषा,
उजळते प्रभा मग सर्व दिशा,
न्याय मिळे देवाघरचा, पण कधी कधी तो हळू हळू
थप्पड पडली नव्हती म्हणुनी स्वैर अजुन फिरतात वळू! ........... ||४ ||

घडलेले सारे आठवुनी,
संचित पापाचे खरे धनी,
प्रारब्धातुन सुटका नाही, आले त्यांना आज कळू
थप्पड पडली नव्हती म्हणुनी स्वैर 'शरद' फिरतात वळू! ........... ||५ ||

कवी शरद पाटील
मोबा: ९४२०४३५८२१

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults