अजरामर थोडासा झालो

Submitted by निशिकांत on 14 January, 2019 - 00:12

अजरामर थोडासा झालो---( करम आणि रंगत संगत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १३.०१.२०१९ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथे अवयवदान या गंभीर विषयावर एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात या विषयावर मी पेश केलेली कविता---)

कलेवराच्या डोळ्यांना मी
अजून थोडे जगा म्हणालो
अमृत प्यालो नसून सुध्दा
अजरामर थोडासा झालो

नेत्रदान ही रम्य कल्पना
वास्तवात मी उतरवल्याने
दोन जिवांचे जगणे आता
बहरत होते कणाकणाने
वरून बघता हास्य तयांचे
मीही आनंदात बुडालो
अमृत प्यालो नसून सुध्दा
अजरामर थोडासा झालो

एकच किडनी हवी जगाया
दुसरीचा मग मोह कशाला?
गरजू मृत्यू शैय्येवरचा
भीक मागतो जगावयाला
वैचारिक या उत्क्रांतीला
शुभशकुनी सुरुवात म्हणालो
अमृत प्यालो नसून सुध्दा
अजरामर थोडासा झालो

माझे अवयव जर का आले
इतरांच्या कामास कधी तर
स्वर्गसुखाला अनुभवेन मी
कांही मजला नको अवांतर
पुण्यकर्म हे घडल्यावरती
म्हणेन क्षितिजापार उडालो
अमृत प्यालो नसून सुध्दा
अजरामर थोडासा झालो

मला कळाले मरणोत्तरही
नक्की येते पुण्य कमवता
तर्कशुध्द दृष्टी जोपासा
बघून देहाची नश्वरता
कर्मकांड अन् श्राध्द कशाला?
देहदान करण्यास निघालो
अमृत प्यालो नसून सुध्दा
अजरामर थोडासा झालो

निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०८७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच....

नक्कीच प्रेरणादायी....

____/\____