घर देता कां कुणी ?

Submitted by Asu on 10 January, 2019 - 03:01

*घर देता कां कुणी ?*

घर देता कां कुणी ? घर

दारा खिडक्यांचे नको
विटा सिमेंटचें नको
भाव-भावनांनी वसलेलं
प्रेमाच्या विटांनी रचलेलं
आपुलकीच्या सिमेंटनी बांधलेलं
घर देता कां कुणी ? घर

भाड्याचं पण घेऊ
पण आम्ही काय देऊ ?
आयुष्य डिपॉझिट ठेवू
आशिर्वादाचं भाडं देऊ
तुम्हाला चालेल का भाऊ ?
घर देता कां कुणी ? घर

आशिर्वादाचा विनिमय दर
नाही आम्हाला माहित
प्रेमाचा हिशोब आम्ही
नाही लिहिला वहीत
नाही साधलं स्वहित
घर देता कां कुणी ? घर

भाव-भावना, प्रेम आशिर्वाद
तुम्हा कवडीमोल निर्विवाद
वेळ कुणास ? सारा बकवास
तरीही आम्ही अजुनि जपतो
ठेवून माणुसकीवर विश्वास
घर देता कां कुणी ? घर

शोधला नाही कधी
नात्यांमधील अर्थ
प्रेम आपुलकी विना
जग आमचे व्यर्थ
आयुष्य असे निस्वार्थ
घर देता कां कुणी ? घर

- प्रा. अरूण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults