निःशब्द

Submitted by आस्वाद on 8 January, 2019 - 15:31

तो झोपेतून खडबडून जागा झाला. क्षणभर कसला आवाज आहे ते त्याला कळेना. मग लक्षात आलं की फोन वाजतोय केव्हाचा. त्याने घाईघाईने फोन उचलला. तिकडून आईचा आवाज आला. "गुड मॉर्निंग, बेटा, उठला नाहीस का अजून? काय रे, बरं नाहीये का? आज ऑफिसला नाही जाणार आहेस का?"
त्याने डोळे चोळत पाहिलं फोन मध्ये तर ८ वाजले होते. अरे बापरे! अलार्म कसा नाही झाला की आपणच बंद केला. त्याला काही आठवेना... आता आई काळजीने पुन्हा विचारत होती "काय रे, बोलत का नाहीस? बरा तर आहेस ना?"
"हो, अगं, झोप लागली. चल, मला उशीर झालाय, नंतर बोलतो" असा म्हणून त्याने फोन ठेवला आणि ऑफिस च्या तयारीला लागला. आज उशीर झाल्याने चहा वगैरे बनवायच्या भानगडीत ना पडता त्याने भराभर आवरले आणि घर लॉक करून तो बाहेर पडला. साडे आठ वाजले, म्हणजे तिकडे सात वाजलेत....आई बाबा त्यांचं सिरीयल बघत असतील...आता फोन करण्यात अर्थ नाही. त्याने गाडी मध्ये रेडिओ लावला आणि ऑफिस ला निघाला.

ऑफिस मध्ये पोचल्यावर तो गुपचूप डेस्क वर जाऊन बसला. हो उगाच कोणाला दिसायला नको लेट आल्याचं.. तसं आज त्याचा टीम मेट सुट्टी वरच होता आणि मॅनेजरचा पण वर्क फ्रॉम होम चा मेल होता. तसं पण डिसेंबर लास्ट वीक मध्ये तुरळक लोक ऑफिस ला येत. काही काम हि नव्हतं. पण त्याला मात्र या वर्षी इंडिया ला जाता आलं नव्हतं. मग घरी बसून एकटा काय करणार म्हणून आणि जमलंच तर थोडे ब्राउनी पॉईंट्स गोळा करायला ऑफिस मध्ये येत होता.

बराच वेळ इकडचं तिकडचं काहीतरी कोड मध्ये करत बसला…त्याला भूक लागली होती. १२ वाजायच्या आधीच तो बाहेर पडला. गाडी मध्ये पेट्रोल टाकायचं होतं. गॅस स्टेशन वर गेला. थंडीत गाडीतून उतरून स्वतः पेट्रोल भरायला खूप कंटाळा आला, तरी नाईलाजाने उठला. हम्म पेट्रोलच्या किंमती कमी झाल्यात, त्याने नोंद घेतली. तिथे जवळच शॉप मध्ये गेला. स्क्रीन वर येणाऱ्या सगळ्या मेनू मधून त्याने सँडविच वर क्लिक केलं. ऑर्डर झाल्यावर टोकन नंबर आला. तो घेऊन तो पे करायला लाइन मध्ये उभा राहिला. त्याचा नंबर आल्यावर सेल्फ -चेकऊट करून त्याने पे केलं. आणि त्याचा टोकन नंबर येण्याची वाट पाहत उभा राहिला. नंबर चा पुकारा झाल्यावर तो पुढे झाला. त्या मुलीकडून सँडविच घेत "थँक्स" म्हणून तो परत गाडीत येऊन बसला. फोन वर काहीबाही बघत त्याने जेवण उरकलं. मग परत ऑफिस ला येऊन डेस्कवर येऊन बसला.

मग ३ वाजता उठून कॉफी प्यायला गेला. कॉफी मशिन मधली कॉफी गार झाली होती. त्याने ती फेकून नवीन पॉट लावला. तेव्हड्यात एक कलीग आला. "Hi, होऊ आर यु?" "गुड, हाऊ आर यु?" त्याने विचारलं. "डुईंग गुड, थँक्स मॅन, आय निडेड स्ट्रॉंग कॉफी" असं म्हणून तो पण वाट पाहत बसला कॉफी ची. मिनिट भरात कॉफी झाली. कॉफी घेऊन तो जागेवर येऊन बसला. मग उगाच न्यूज चाळत थोडा डोकमेंटशन केलं. ५ वाजले. तो बाहेर पडला. अंधारून आलं होतं. सवयीप्रमाणे तो घरी गेला, थोडा वेळ आराम करून स्वयंपाक करायला किचन मध्ये गेला. अर्धा पाऊण तास स्वयंपाक करून, भांडी घासून आणि आवरा आवर करण्यात गेला. मग वाढून घेऊन तो टीव्ही समोर येऊन बसला. जेऊन मग लॅपटॉप घेऊन tp करत बसला. ९ वाजून गेले तसं त्याने घरी फोन लावला. खूप वेळ रिंग वाजून फोन बंद झाला. मग त्याला आठवलं कि सगळे कोणाच्या तरी लग्नासाठी काल गावी जाणार होते. व्हॅट्सऍप चेक केलं तर कन्फर्म झाला. कोणाकोणाला रिप्लाय करत जरा वेळ घालवला

काय करावं ना सुचून तो मूवी बघत बसला.... बघता बघताच कधीतरी झोप लागली.

आजचा दिवस परत १५ शब्दात संपला होता....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

खूप आवडली.

'निःशब्द' शब्दाची अशी छटा कधी लक्षातच आली नव्हती.

आजचा दिवस परत १५ शब्दात संपला होता... >. आधी कळालं नाही, मग लक्षात आलं. खूप अंगावर आलं. स्वतःचा दिवस असा १५ शब्दात संपत नाहीये म्हणून खूप सुदैवीही वाटलं

आवडलं लिखाण.

छान Happy

कधी कधी असा दिवस पण मस्त जातो.

आधी कळालं नाही, मग लक्षात आलं. खूप अंगावर आलं. स्वतःचा दिवस असा १५ श्ब्दात संपत नाहीये म्हणून खूप सुदैवीही वाटलं +११११

सुन्दर लिखाण

छान आहे.
'निःशब्द' शब्दाची अशी छटा कधी लक्षातच आली नव्हती.> + १

<<कोणी जरा उलगडुन सांगाल का प्लीज काय नक्की १५ शब्दांचा रेफ्रन्स आहे ते>>
तो दिवसभरात फक्त १५ शब्द बोलतो. म्हणतात ना गर्दी मध्ये एकटा
शिवाय लो ह्यूमन interaction कारण सगळं ऑटोमेटेड आहे - पेट्रोल पंप, रेस्टॉरंट्स etc

ओह !
बापरे किती भयंकर वास्तव असेल ते Sad
समजावून सांगितल्याबद्दल खुपखुप धन्यवाद आस्वाद

हा हा हा हा मला खरंच हसायला आलं. खरंच असतो असा दिवस एखादा Lol पंधराच काय तीन चार शब्दात पण संपतो कधी कधी Rofl

पण कमाल लिहिलंय Happy