स्वप्न-वेडी

Submitted by Asu on 6 January, 2019 - 22:14

*स्वप्न-वेडी*

मनात माझ्या नकळत शिरतो
काय करू बाई जीव घाबरतो

स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलता
मनात सजणा क्षणात येतो
ध्यानी मनी काही नसता
अलगद मजला चुंबून घेतो
मनात माझ्या नकळत शिरतो
काय करू बाई जीव घाबरतो

स्वप्न वेड्या शयन मंदिरी
प्राजक्ताचा सडा शिंपितो
गंधित बंधित करून सजणा
धुंदीत मजला मिठीत घेतो
मनात माझ्या नकळत शिरतो
काय करू बाई जीव घाबरतो

स्वप्नधुंद पाऊस धारा
मेघ होऊनि मनी बरसतो
अंग अंग भिजवून चिंब
रोम रोम चेतवून जातो
मनात माझ्या नकळत शिरतो
काय करू बाई जीव घाबरतो

स्वप्नचं झाले जगणे माझे
कणाकणात तोच दिसतो
ठेवुनी मागे स्वप्न लोचनी
रात्र रात्र जागवून जातो
मनात माझ्या नकळत शिरतो
काय करू बाई जीव घाबरतो

स्वप्नसखया नटखट का रे
खेळ खेळुनि मजला छळतो
रात्रंदिन का स्वप्नी येऊनि
प्रणयरंगी मज वेड लावितो
मनात माझ्या नकळत शिरतो
काय करू बाई जीव घाबरतो

-प्रा. अरुण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults