उदयपूर !

Submitted by Charudutt Ramti... on 5 January, 2019 - 14:17

प्रवास, हा माझ्या पत्रिकेत राहूच्या शेजारच्या, म्हणजे पाचव्या स्थानात आहे. मला आवडो न आवडो. आज ठरलं की पोतडी बांधून उद्या पहाटे निघायला लागतं. पण रेल्वेस्टेशन, विमानतळ अथवा बस स्थानकाच्या अलोट गर्दीत असूनही ते, कामा निमित्त एकलकोंडेपणाने प्रवास करणं वेगळं, आणि कामाच्या ठिकाणी रीतसर सुट्टी टाकून सहकुटुंब ‘केल्यानं देशाटन’ वेगळं. कारण कामासाठी प्रवास म्हणजे एखाद्या ‘हुमनॉइड रोबो’ च्या मेकॅनाईज्ड हालचाली असतात तश्या ठोकळेबद्ध आणि साचेबद्ध. पण तोच प्रवास जर पर्यटन म्हणून केला, तर मग मात्र कत्थक, कुचिपुडी किंवा भरतनाट्यम निपुण कमनीय बांध्याच्या एखाद्या नर्तिकेनं पायात छुम छुम करणारे घुंगरू बांधावेत आणि अलगत पदन्यास करत दोन्ही हाताच्या आणि कटिकेच्या मोहक हालचाली कराव्यात तसा, हा सहकुटुंब पर्यटनाचा सुखद अनुभव. ही प्रवासाची तौलनिक कविकल्पना लिहायला आणि वाचायला कितीही रम्य जरी असली तरी ह्या प्रवासाच्या घडी आधीचा एकूण एक दिवस मात्र युद्धाच्या आधी कशी तंग परिस्थिती असते तसा असतो.

कारण मी जर म्हंटल की “यंदा सुट्टी काढून कच्छचं रण पाहायला जाऊ, अमिताभ बच्चन बिचारा बरेच प्रमोशन करतोय…” की दुसऱ्याच क्षणाला

“ मेलं ते वाळवंटात काय डोंबल बघायचंय? सगळी कडे वाळू नुसती, एवढे पैसे खर्च करून काय बघितली ? तर म्हणे वाळू ? " - ह्या अश्या तीव्र प्रतिक्रिया कानी पडतात कुटुंबाच्या.

“ बरं मग गोव्याला जायचं का ? ” - ह्या वर

" गोव्याला कशाला ? स्वस्तातली द्यारु ढोसायला ? त्या पेक्षा इथंच बसून का नाही पित ? जायचा यायचा खर्च काढलात तर इथे वर्षभराची दारू विकत मिळेल तेवढ्या खर्चात. तुमचं काय म्हणतात ना ते "मेन विल बी मेन" ते काय ते तेच दळभद्री लक्षण मेलं, दुसरं काय ? "

मग अलिबाग, गणपती पुळे, तारकरली असली ठिकाणं सुचवली की त्यावर, “मुल्ला की दौड मस्जिद तक” किंवा “सरड्याची झेप कुंपणा पर्यंत” असल्या कुजकट म्हणी ऐकवायच्या. ज्या वर्षी मला शिमला कुल्लू मनाली ला जायची इच्छा असते त्या वर्षी तिला केरळ कन्याकुमारी ला जायचं असतं. ज्या वर्षी मला गुजरातला जाऊन गीर सासन इथे सिंह बघायची हुक्की येते नेमकी त्याच वर्षी तिला आसाम ला जाऊन वाघ पाहायचे असतात. मी दार्जिलिंग ला जाऊन चहाचे मळे पाहूया म्हंटलं की ही कूर्ग ला जाऊन कॉफीच्या बागा पाहू म्हणणार. मी उत्तर ध्रुव म्हंटल की “उत्तर ध्रुवावर काय आहे मेलं बघण्यासारखं, त्या पेक्षा दक्षिण ध्रुवावर जाऊ, मस्त पैकी” असं ही म्हणणार. मी वाळवंटात फिरायला जाऊ म्हंटल की ही म्हणणार “वाळवंट नको आपण सरळ दलदलच पाहायला जाऊ”. मी कर्क वृत्त म्हंटल की ही मकर वृत्त म्हणणार. हे आता मला गेल्या बारा वर्षांत चांगलं कळून चुकलंय. ह्या असल्या वैचारिक मतभिन्नतेतुन शेवटी आम्ही ह्या वर्षी राजस्तानांत ‘उदयपूर’ बघायला जायचे सामंजस्याने कसे मान्य केलं ते माझं मलाच कळत नाही. मी प्रस्ताव मांडला की तिनं तो उधळून लावायचा अशी सवय असल्यामुळं, तीचं उदयपूर ह्या नावावर अनुमोदन येईल असं मला जरासुद्धा वाटलं नव्हतं. पण शेवटी कसं काय कुणास ठाऊक? उदयपूरला जाण्याचं नक्की झालं आणि आमचा ट्रॅव्हल प्लॅन लॉक झाला.

मला स्वतःला भटकायचा उदंड अनुभव गाठीशी असल्यामुळं मी मँगो, क्वेस्ट, वीणा, केसरी, गिरिकंद वगैरेंच्या जराही नादी लागत नाही. एक तर त्यांचे दरच मला पटत नाहीत. दुसरं त्यांचा ट्रिप मॅनेजर सांगणार " उदया सकाळी बरोब्बर सात वाजता इथे लॉबीत सगळ्यांनी भेटायचंय". मग ती सकाळी सात ची वेळ पाळण्यासाठी परत पावणे सहा पासून उठत आवरण्याची गडबड करायची. म्हणजे मुख्य धंद्यात दिनक्रमाचा कंटाळा आला म्हणून पर्यटनासाठी रजा टाकायची आणि रजा असून सुद्धा इकडे ह्या टूर कंपन्यांमध्ये त्या टूर मॅनेजर च्या हाताखाली आपण कामाला नोकरीत असल्या सारखे आपण त्यांच्या वेळा पाळायच्या, हा जोड धंदा सांगितलाय कुणी? माझ्या ‘प्रिन्सिपल’ मध्ये न बसणारा हा कॉन्फ्लिक्ट ऑफ ‘इंटरेस्ट’ आहे. त्यामुळं मी सरळ गुगल मॅप्स उघडतो आणि माझी राउंड ट्रिप मीच प्लॅन करतो.

जागतिक बाजारपेठेतील एकंदर डॉलर चा भाव, रुपयाची झालेली अमाप घसरण आणि एकंदरच आखातातील खनिज तेलाचे भाव पाहता “पुणे ते उदयपूर” हा विमान प्रवास माझ्या खिशाला झेपणार नाही हे माझ्यातल्या प्रदीर्घ अनुभवी प्रवाश्यानं ताडलं होतं. चैन करताना जमेल तेवढी काटकसर करायची हा माझा प्रवासाचा मूलमंत्र जपतच मी टूर प्लॅन करतो. त्यामुळं पुणे ते मुंबई हा द्रुतगती मार्ग, पुढे मुंबई ते अहमदाबाद लोहमार्ग आणि त्यापुढे परत गांधीनगर मार्गे अह्मदाबाद ते उदयपूर असा खुश्की चा मार्ग शोधत प्रवासाचे ढोबळ मानाने तीन पाडाव ठरवले.

ह्या आमच्या उदयपूर प्रवासाचे मुख्य तीन उद्दिष्ट्य ठरवण्यात आले.

पहिलं उद्दिष्टय आणि महत्वाचं. रजपुतांचे - मुघलांशी, मुघलांचे - इंग्रंजांशी, मराठ्यांचे - राजपुतांशी आणि इंग्रजांचे - मराठ्यांशी एकंदर परस्पर संबंध कसे होते ह्याचा अभ्यास करणे.
दुसरं पण तितकंच महत्वाचं, “वर्षं भरात मला मेलीला कुठं फिरायला म्हणून मिळत नाही, हे एकटेच नुसते बोंबलत चैन्या करत फिरत असतात ” ह्या जिव्हारी लागणाऱ्या टीकेस जमेल तेव्हढं शब्दांपेक्ष कृती करून प्रत्युत्तर देणं.
तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांनी ज्यांनी फेसबुक वर त्यांच्या सहकुटुंब ट्रिपांचे रोज किमान बारा आणि कमाल आठेचाळीस ह्या दराने त्यांच्या वॉल वर फोटो टाकून आमचे सौहार्दाचे वैवाहिक संबंध तणावग्रस्त केले त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत, आमच्या ट्रिपचे रोज किमान बावीस फोटो आमच्या वॉल वर टाकून, त्यांच्या वैवाहिक जीवनात आम्हाला जमेल तितक्या प्रमाणात व्यत्यय आणि वादळ निर्माण करण्याचा मज पामराच्या परीने हा एक छोटासाच प्रयत्न.

बॅगा भरताना बॅगांचे झिप्स आणि चेनचे रनर्स तुटण्यापासून आमच्या प्रवासाची सुरुवात होते. सर्कशीचा तंबू एका गावातून पंधरा तीन आठवड्याचा खेळ संपवून दुसऱ्या ठिकाणी नेताना जितके ट्रक्स सामान होतं त्याच्या साधारण एक त्रितीयांश सामान आमची सौ. आमच्या एका प्रवासात हलवते. कमाल भारवाहन क्षमतेच्या बऱ्याच पलीकडे आम्ही आमचे सामान वागवत असतो. एकदा विमान प्रवासात २५ किलो दरडोई इतकं सामान नेण्याची मुभा असताना आम्ही जवळ जवळ सर्व बॅगा मिळून सव्वा एक टन सामान घेऊन गेलो होतो. त्यामुळं विमान तळावर चक्क, इकडे जकात नाक्या शेजारी लॉर्यांमधील माल मापतात तो धरम काटा दिसतोय का? ते शोधण्याची वेळ माझ्यावर येते की काय असं मला वाटू लागलं होतं.

ह्या वेळी शत्रुत्व पत्करायला विमानकंपनी नसून सरकारी रेल्वे होती. त्यामुळं कमाल माल वाहू क्षमतेचं काही दडपण नव्हतं. परंतु अश्या अनंत अडीअडचणींना मात देत देत आम्ही शेवटी उदयपूर ला पोचलो तेंव्हा रात्रीचे साडेआठ वाजले होते. ऊन म्हणतं तशी थंडी ‘मी’ का म्हणत नाही ते माहिती नाही. पण राजस्थानांतील विषम हवामानाचा पहिलाच अंक आम्हाला त्याच दिवशी रात्री अत्यंत बोचऱ्या थंडी ने दाखवून दिला. थंडी गुलाबी वगैरे अजिबात नव्हती. रंगातच व्यक्त करायची तर गर्द लाल तपकिरी च्या ही पुढे अंगावर काटा उभं करणारी ती उदयपूरची २९ डिसेम्बरची थंडी कानशिलांना चांगलीच जाणवत होती.

सकाळी उठलो. अहमदाबाद मध्ये सेल्फ ड्रायविंग कार च्या ऍप वरून हायर केलेली आणि अहमदाबाद ते उदयपूर अशी २६० किलोमीटर चा प्रवास करून आणलेली एस. यू. व्ही. धुळीने चांगलीच माखलेली होती. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर आय. आर. बी. constructions ने हाती घेतलेली सहापदरीकरणाची प्रचंड कामं सुरु होती. त्यामुळं आमचा हा खुष्कीचा प्रवास चांगलाच खडतर झाला. सकाळी स्टार्टर मारला आणि रस्त्यावरच्या एका खोजा नं सांगितलं की 'भाई साब टायर पंक्चर हे आपकी गाडी का'. मग नमनालाच घडाभर तेल ओतत गाडीचं पंक्चर काढलं. आणि साधारण साडे दहा सव्वा दहा च्या सुमारास उदयपूर “एक्सप्लोर” करायला बाहेर पडलो. पूर्वी आम्ही नवीन शहर ‘पाहायला’ म्हणून बाहेर पडायचो, पण हल्ली हल्ली एक्सप्लोर करतो, म्हणजे जरा काळाच्या बरोबर पावलं टाकल्यासारखं वाटतं.

शहरात जरा फिरायला म्हणून बाहेर पडलो आणि मान वर करून पाहिलं तर, सोनेरी आणि चंदेरी असे दोन्ही रंग जर कुणी एकत्र करून कोणता रंग निर्माण बघूया अश्या उत्सुकतेने कलर पॅलेट वरती कुंचल्यानं मिसळले तर जो रंग निर्माण होईल तसलाच कोणता तरी अपूर्व रंग पांघरून सकाळची उन्हं अख्या उदयपूर शहरावरती आपलं सौंदर्य आणि वैभव दोन्हीही चौफेर उधळत होती. पाचूपेक्षाही हिरवा कंच आणि एखाद्या राजस एमराल्ड खड्या पेक्षाही गर्द निळा असा मोरपंखी छटा ल्यालेला एक विस्तीर्ण असा जलाशय ह्या उदयपूर शहराच्या मधोमध वास्तव्यास आहे. 'पिचोला' नावाचा हा ऐसपैस तलाव कुणी क्षेत्रफळ मोजायलाच गेलं तर सात वर्ग किलोमीटर भरेल इतका विस्तीर्ण. आणि ह्या पिचोला च्या अवती भवती हे अक्ख प्रागैतिहासिक असं उदयपूर शहर वसलेलं आहे. एखाद्या नक्षीदार कलाकुसर असलेल्या सोन्याच्या अंगठीनं हिऱ्याला कोंदण म्हणून आयुष्यभर जगावं तसं ह्या तलावा भोवती इसवीसन १५५९ साली आरवली पर्वत शृखलांमध्ये वसलेलं पुरातन असं हे सुंदर रमणीय शहर.

" युध्दस्य कथा रम्य: " ह्या उक्तीनुसार उदयपूर शहराच्या स्थापनेची गोष्टही अगदी रम्य आहे. मेवाड हे सूर्यवंशी राजघराणं, पाचव्या शतकापासून अस्तित्वात आलेलं. ‘सूर्यवंशी’- अर्थात सूर्याचे पूजन आणि स्तवन करणारे. महाराणा उदय सिंह द्वितीय, ह्यांनी ह्या नूतन अश्या शहराची स्थापना केली. सन १५५७ ला उदयपूरच्या महालाचं भूमिपूजन आणि पायाभरणी झाली. महाराणा उदयसिंह हे अत्यंत दैदिप्यमान आणि शौर्यपूर्ण इतिहास असलेल्या सिसोदिया घराण्याचे वंशज. महाराणा उदयसिंह शिकारी साठी गेले असताना इथे एका टेकडी वरती एका साधू संन्याशाला भेटले. त्या साधूनी ह्या राजाला "ही जागा वास्तव्यास अत्यंत सुरक्षित आहे, तेंव्हा इथेच राजाने बस्तान हलवावं असा सल्ला दिला". आणि हा सल्ला तसा योग्य होता. कारण उदयपूर हे शहर आजूबाजूच्या डोंगराळ प्रदेशा मुळं तसं दुर्गम आणि परकीय आक्रमणापासून सुरक्षित होतं. राजानं ह्या साधूचा सल्ला शिरोधार्य मानत इथे किल्याची बांधाबांध सुरु केली. हाच बळकट किल्ला आज उदयपूरचा “सिटी पॅलेस” ह्या नावानं प्रसिद्ध आहे. उदयसिंह राजाची दूरदृष्टी कामी आली. कारण तद्पर्यंत "चित्तोडगड" हा मेवाडच्या राजधानी असलेला किल्ला १५६७ साली अकबराने जिंकला आणि मग उदयपूर त्या दिवसापासून ते आजतागायत ‘राजधानी’ म्हणून सिसोदियांचा लढाऊ बाणा ललाटी मिरवत उदयपूर हे शहर मेवाड देशावरती अहोरात्री राज्य करत राहिले. पुढे हळदीघाटात शौर्याची गाथा लिहिलेले महाराणा प्रताप ह्याच गादीचे.

पॅरिसला जाणं आणि आयफेल टॉवर न पाहता येणं, किंवा रोम ला जाऊन पिसाचा झुकलेला मनोरा ना पाहताच परत येणं, जितकं बावळट पणाचं दिसेल तितकंच उदयपूर ला जाऊन सिटी पॅलेस न पाहता परतणं ठरेल. आत्ता पर्यंत ट्रिप करून परत आल्यावर तुम्ही जे ठिकाण वेळेअभावी "ह्या वेळी राहूदे, पुढच्या वेळी करू" असं म्हणत बाजूला ठेवता, नेमके तेच ठिकाण किती महत्वाचे आणि सुंदर होते, हे घरी परतल्यावर शेजार पाजारचे आणि मित्र मंडळी सांगतात आणि आपण कौतुकानं फोटो दाखवायला जावं तर "काय राव? इतक्या जवळ जाऊन नेमकं तेच न बघता परत आला होय, तोच तर मेन स्पॉट होता, बाकी तुम्ही सगळं फिरलात ते सगळे असेच टाईमपास वाले स्पॉट्स होते..." अश्या आशयाचे कॉमेंट्स ऐकवतात. आणि आपण पण एवढे पैसे खर्च करून शेवटी जिथं जायला पाहिजे होतं ते ठिकाण न पाहताच परत आलो अशी समजूत घालून स्वतःलाच वेड्यात काढत बसतो. ह्या वेळी असं घडू नये ह्या करीत दक्षता घेत सकाळी नाश्त्याच्या वेळी वेटर पासून ते मगाशी टायर पंक्चर झालं ते काढणाऱ्या ते टायर वाल्यापासून ते 'राजस्थान टुरिझम' नावाच्या एका सेंटर वर जाऊन दोन दोन दा खात्री करत ‘काय काय बघायला विसरलं तर चालेल’ आणि ‘काय काय राहून गेलं’ असं सांगितलं तर लोक “हमखास वेड्यात काढतात” अश्या ठिकाणांची एक वादातीत यादीच तयार केली. यादी खालून वरून, डावीकडून उजवीकडे आणि उर्दू किंवा फारसी सारखी उजवीकडून डावीकडे, कशीही वाचली तरी सिटी पॅलेस लिस्ट मध्ये पहिल्यांदाच येऊ लागला. घरात आम्ही दर महिन्याला भरतो त्या किराणा मालाच्या लिस्ट मध्ये सगळ्यात वर पहिल्यांदा जसा “हिंग” येतो तसा.

सिटी पॅलेस ला पोहोचताना जगातले सर्वात जास्त अरुंद आणि चिंचोळे, आणि पेठेत जन्म झाल्या शिवाय कधीच कुणालाच कधी न सुधरणारे गल्ली बोळ इथं फक्त पुण्यातच असू शकतात हा वृथा अभिमान गळून पडला. सिटी पॅलेसच्याच वाटेत चारशे पाचशे मीटर अलीकडे अती प्राचीन आणि तितकंच सुंदर असं जगदीश मंदिर लागतं. पण ते "विसरलो" असं सांगितलं तर कुणी मुर्खात काढेल असं वाटलं नाही त्यामुळं "येताना पाहू" ह्या सदरात टाकलं आणि पुढे चालत निघालो. सिटी पॅलेस चे तिकीट पाहून किंचित भुवया उंचावल्या गेल्या. थोडी इकडे तिकडे नजर फिरवली. तेंव्हा जाणवलं. हा किल्ला कम राजवाडा भारतीय पुरातत्व खात्याच्या म्हणजेच इंडियन आर्कीओलॉजिकल सोसायटीच्या ताब्यात नसून अजूनही ही मालमत्ता खासगी स्वरूपातली आहे. आणि हे एक प्रायव्हेट म्युझीयम म्हणून पर्यटनास उपलध्द आहे. त्यामुळे प्रवेशिका शुल्क बऱ्यापैकी जास्त आहे.

राजस्थानातील बऱ्याचश्या राजघराण्यांनी भारतीय गणराज्याची स्थापना झाल्यानंतर आणि त्यांच्या संस्थानांचं रिपब्लिक ऑफ इंडिया मध्ये विलीनीकरण झाल्यानंतर जशी त्यांच्या संपत्तीवर "कमाल भूधारण" वगैरे वेगवेगळ्या कायद्यांमुळे टाच येऊ लागली तस तशी त्यांनी त्यांच्या बऱ्याचश्या वैयक्तिक मालमत्ता जनतेसाठी खुल्या करून दिल्या आणि तात्पुरते का होईना सरकारी जप्ती पासून ‘अभय’ मिळवले. पुढे मग रीतसर टुरिझम कंपन्या स्थापन करून त्यांनी उत्पन्नाचा एक हमखास स्रोत प्राप्त केला. कारण सरकारी तनखाँ बंद झाल्यावर पुढे उपजीविकेसाठी करायचं काय हा गंभीर प्रश्न आ वासून उभा होता इथल्या अनेक संस्थानिकांवरती.

खरं तर जो पर्यंत लढत होते तो पर्यंत ठीक होते. पण युद्धात आणि तहात हार पत्करावी लागल्यावर जगावं लागणारं शापित जीवन ह्या राजघराण्यांइतकं दुसरं कुणाला नसावं. रजपुतांनी बऱ्याचं पिढ्या मुघलांच्या दरबारी आज्ञा स्वीकारल्या. मुगलांचं मांडलिकत्व पत्करत. छत्रपतींना शिवाजी राजेंना पुरंदरच्या किल्यात वेढा घालून तहास आणि वाटाघाटीस भाग पडायला लावणारे मिरझा राजे जयसिंग सुद्धा राजपूत आणि मुघलांच्या दरबारी सेवेस. रीतसर राज्याभिषेक झालेले राजे असले तरी औरंगजेबाच्या मुघल साम्राज्याला शरण.

राजवाड्याची जरा चांगली माहिती मिळावी ह्या हेतूने एक गाईड गाठला. चांगला माहितगार वाटला. त्याच्याशी थोडी घासाघीस करत शेवटी आम्ही एक तह केला आणि त्या तहातील वाटाघाटी नुसार ‘दोन फॅमिली मिळून एक’ असं त्यानं शेअर बेसिस वर आम्हाला गाईड होण्याचं मान्य केलं. ह्या गाईड लोकांना बऱ्याच भाषा येतात. आमचा गाईड बऱ्यापैकी मराठी समजू आणि किरकोळ बोलू सुद्धा शकत होता. पण इतर वेळेस फ्रेंच, पोर्तुगीज वगैरे तो व्यवस्थित बोलत असावा. परदेशी पर्यटकांना किल्याची आणि राजवाड्याची माहिती देताना. त्यांना ह्या युरोपिअन भाषा उपयोगी पडतात. कारण आपण भारतीय लोक मातृ भाषेबाबत जितके "लिस्ट बॉदर्ड" असतो तितकेच हे युरोपिअन लोक इंग्रजी भाषेच्या च्या बाबतीत असतात. इथे परदेशी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात दिसले. त्यांच्या आणि आपल्या पर्यटनाच्या संकल्पनाच मूलभूत रित्या आणि आमूलाग्र पणे वेगळ्या आहेत. हे लोक पायी भटकत भटकत आपला संबंध देश फिरतात. थकले की थांबतात. आणि थकवा दूर झाला की परत उठून चालायला लागतात. एक जण तर मला पिचोला लेक च्या काठावर असलेल्या दगडी घाटाचा पायऱ्यांवर मस्त पैकी उन्हात कोणतीतरी रोमँटिक कादंबरी वाचत बसलेली दिसली.

गाईड च्या मागे मागे राजवाड्याच्या उंच द्वारा तुन प्रवेश करून आत गेलो. राजवाडा / किल्ला चांगल्यापैकी भरभक्कम उभा अवस्थेत उभा आहे. अवघे ‘पाचशेच’ वर्षं झाली म्हणा. आपल्याकडं दोन हजार वर्षांपूर्वीची लेणी अजून आहेत. फक्त मूर्तिभंजक परकीयांची वाईट नजर ह्या अवर्णनीय अश्या स्थापत्यकलेच्या अत्युच्य शिखरांवर न पडते तोवर. राजवाड्याचं बांधकामही अगदी कसं विचारपूर्वक केलेलं आहे ते गाईडनं स्पष्ट करून सांगितलं. चौसोप्यातून कोणत्याही दालनात जाण्याकरिता कमरेत, किमान पाठ क्षितिज समांतर होईल इतके तरी वाकून जावे लागते. कारण शत्रूचा हल्ला झाला तर दरवाज्याच्या मागच्या बाजूस उभ्या असलेल्या सैनिकाला कमरेत वाकलेल्या हल्लेकऱ्यास मानेवरून तलवारीचा वार करून क्षणार्धात ठार मारणे शक्य असते.

गाईड किल्याच्या एक एक खुबी सांगत होता, आणि एका दालनातून दुसऱ्या दालनात पुढे नेत होता. तेवढ्यात गर्दीत आमची चुकामुक झाली. मी किल्याच्या भटार खान्यात तर आमची ही गाईड चा हात पकडून किल्याच्या खलबत खान्यात. मग मी वाट शोधत शोधत कसा बसा खलबत खान्यात पोचलो तोपर्यंत ही आणि गाईड दारुखान्यात. मला मराठी बोलणारा गाईड करून चूक केली की काय असं क्षणभर वाटू लागलं. माझ्या माहिती प्रमाणे हिला इतिहासाची एवढी आवड कधीच नव्हती, तरी मी वरून सज्जातून उंच वर पाहत होतो गाईड हिला काही तरी तर्जनी नं खूण करून दाखवत होता, आणि ही सुद्धा अगदी इंटरेस्ट घेत लक्ष देऊन एकेक अक्षर मोबाईल वर टिपून घेत होती. मी माझी उत्सुकता ताणली गेल्या मुळं न राहवून राजवाड्यातले एक दोन भुयारी मार्ग आणि चोरवाटा शोधात शेवटी गाईड आणि हिच्या पाशी पोचलो. आणि पाहिलं गाईड हिला नक्की काय दाखवतोय ते. तिथं गेल्या वर समजलं की हिनं इतक्या दूर ह्या भरभक्कम किल्यात येऊन गाईड ला पैसे देऊन काय विचारावं तर, " इथे उदयपूर ला बांधणीच्या साड्या आणि ड्रेस मटेरियल कुठे स्वस्त मिळतात ? " आणि हा एवढ्या महागा मोलाचा गाईड सुद्धा अगदी कौतुकाने आमच्या सौ. ला कोणत्या तरी उंच अश्या पूर्वी हेरगिरी करण्यासाठी वापरात तसल्या बुरुज वजा मनोऱ्यावर नेऊन अक्ख: उदयपूर शहर जिथून स्पष्ट दिसू शकत अश्या ठिकाणावरून सांगत होता की कोणत्या गल्लीत राजस्थानी बांधणी आणि कटवर्क च्या साड्या, बेडशिट्ट, उश्याचे खोळ, अभ्रे, डायनिंग टेबलावर अंथरायचे कापड इत्यादी वस्त्र स्वस्त आणि रास्त दरात मिळतात ते. मी कपाळाला हात मारून घेतला. इथे जवळ पास राजघराण्याची ईमा ने इतबारे पणे सेवा करणारे कुणी भालदार शिलेदार चोपदार असते तर त्यांनी आमचं आणि त्या गाईड चं मुंडकच तलवारीनं छाटलं असतं. " हा एवढ्याकरता बांधलं का हा उंचच्या उंच बुरुज एवढे पैसे खर्च करून ? " असा जाब विचारत. मला ह्या बांधणी च्या शॉपिंग मधून सोडवणूक करून घेण्यासाठी पुढे चक्क अर्धा दिवस किती त्रास झाला ते सांगण्यासाठी योग्य शब्द संपदा माझ्याकडे सध्यातरी उपलब्ध नाही. एकीकडे हा बांधणी प्रकार उलगडत असताना दुसरीकडे "बाबा अप्पन इथेच्च का नै येत रायल्ला?" असे तिच्या वयाला शोभणारे बालिश प्रश्न विचारून माझीच लेक मला त्रास देत होती. त्यावर " अगं शोना हा ल्लाज्जाच्च्या महाल आहे , ते कशे काय आपल्याला लाहू देतील बलं इत्त " असं खोट्टं खोट्टं उत्तर देत तिची समजूत घालायचा प्रयत्न करत होतो. खरं तर जिभेवर येऊन सुद्धा मी "ठेवलंय तुझ्या बानं " असं उत्तर न दिल्यामुळं त्या निरागस मुलीच्या झाशीच्या राणी प्रकृतीच्या आई सोबत माझी होऊ घातलेली, त्या राजवाड्याच्या इतिहासातली एक घनघोर लढाई टळली हे आवर्जून इथे नमूद करू इच्छितो.

राजवाड्यातून मग आम्ही लागूनच असलेल्या जनान खान्यात गेलो. तिथे राजेरजवाड्यांच्या वैयक्तिक वापरातील वस्तूंचं एक सुंदर दालन होतं. तिथं सगळ्यात कमी किमतीची वस्तू ही हस्तिदंती होती. एकंदर घरी आपण फर्निचर करायला घेतलं वॊर्डरॉब किंवा टी. व्ही. वॉल युनिट वगैरे , की साधारण किती प्लायवूड लागू शकतं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात इथे चांदीचा वापर केलेल्या वस्तू होत्या. चांदीच्या पलंगापासून ते चांदीच्या पाळण्या पर्यंत. शेवटी जनांनखानाच तो. लोखंडाला जस्ताचं, जस्ताला तांब्याचं , तांब्याला चांदीचं आणि चांदीला सोन्याचं पाणी देऊन मुलामा केलेल्या चीज वस्तू पाहून नंतर नंतर मलाच त्याचं फारसं काही नवल वाटेनासं झालं. ही मात्र अधून मधून “ बघा जरा राजाला किती हौस होती ते” असं ही टोमणे मारत होती. त्यावर मीही तिला " हा इथल्या राजाच्या पट्टराणीचा शयनकक्ष नसून जनान खाना आहे” असं सुनावलं तेंव्ह कुठं गप्प बसली.

एकन्दर सगळा राजवाडा एका दिवसात ( खरं तर एका जन्मात ) पाहणे शक्य नाही , कारण मुळात हा राजवाडा दोनशे वर्षं ही सिसोदिया मंडळी बांधत होती, म्हणजे २५ वर्षांची एक पिढी जरी मानलं तरी तब्ब्ल सहा पिढ्या हा राजवाडा बांधण्याचं आणि त्याचा विस्तार करण्याचं काम सुरु होतं. त्यामुळं ह्या असल्या अजस्त्र राजवाड्यात फिरताना पाय बोलू लागले. पोटाची आतडी ‘रसद’ मागू लागली. शरीरातली कुमक संपू लागली. चार साडेचार तास झाल्यावर किल्ल्यातून काढता पाय घेतला. जाता जाता गाईड नं सांगितलं " आप जहाँ अभि खडे हो वहा पिचले हप्ते मूकेस अंबानी के बिटिया की सादी रची गई " मी धन्य झालो. वर वर “ वाह वाह क्या बात है!” असं म्हंटलं तरी मनातून " उसके बाप का क्या जाता है ? उसका बस चाले तो वो पुरा मेहेल खरीद ले, पुरा देश तो उसिका है, " असं म्हंटल पण ते बहुतेक किंचित स्पॉण्टेनियसली तोंडून मोठ्यानं म्हंटल गेलं. कारण मी असं म्हणता क्षणी हिनं डाव्या हाताच्या कोपराने माझ्या पोटात जोरात वार केला. जवळच काचेच्या पेटित एक चिलखत होतं, ते मी आधीच घातलं असतं आणि हेल्मेट घालून मोटारसायकल वर गाव भर फिरतात तसं चिलखत घालून महाल भर फिरलो असतो तरी चाललं असतं, निदान हिनं कोपरानं केलेला वार माझ्या वर्मी तरी लागला नसता.

बराच वेळ मग किल्याच्या शेजारी असलेल्या पिचोला तळ्याकाठी भिंतीवर रेलून बसलो. जेवण होऊन तास दिड तास झाले चहाची तलफ झाली. राजवाड्याच्या कोर्टयार्ड ला लागून पलीकडच्या सामायिक भिंती जवळ राजवाड्यातच एक हॉटेल होतं. पण ते ‘ताज’ किंवा ‘ओबेरॉय’ ह्या पैकी कुणीतरी चालवायला घेतलं होतं. तिथं चहा ची किंमत विचारून, वेटर लोकांकडून माझीच किंमत केली जाण्याची शक्यता होती. कारण उदयपूर ला हॉटेल शोधात होतो तेंव्हा सहज विरंगुळा म्हणून एक दोन पंच आणि सप्त तारांकित पॅलेस हॉटेल्स च्या वेबसाईट पहिल्या होत्या. (वेबसाईट) देखने मे अपने बाप का क्या जाता है? असं म्हणत. तेव्हा लेक पिचोला च्या मधोमध असणाऱ्या ताज च्या प्रॉपर्टी चा रेट साधारण एका रात्री साठी पन्नास हजार ते दीड लाख इतका वाचल्याचं कुठं तरी स्मरतंय. पण इयर एन्ड असल्यामुळं तिथले दर थोडे महागलेत आणि आता इयर एन्ड संपला की स्वस्त होतील अशी खोटी आशा मी मनाशी बाळगली. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. तळ्याकाठी फिरता फिरता बायकोनं डेस्टिनेशन वेडिंग हा नवीन प्रकार काय असतो ते सांगितलं. म्हणजे जुन्या राजवाड्याचं हॉटेल वगैरे करतात तिथे लग्न करायची. कन्सेप्ट नवीन आणि चांगली वाटली. मी हळूच एके ठिकाणी फिरता फिरता कुठल्या राजवाडा कम हॉटेलच्या आत डोकावत ‘वधूपक्षाची खोली’ आणि ‘वरपक्षाची खोली’ अश्या पाट्या दिसतायत का? ते पाहिलं. हे असले डेस्टिनेशन वेडिंग तिकडे दूर राजस्तानातच करतात ते बरंय. आमच्या इकडे असते तर “ही जेवण झाल्यावर हात धुण्याची जागा नव्हे” किंवा “इथे चूळ भरू नये” अश्या पाट्या ह्या हस्तिदंती राजवाड्यावर लावण्याची वेळ ह्या ताजच्या टाटांवर आली असती.

सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. पिचोला लेक वर सूर्यास्त पाहावा आणि हॉटेल मध्ये जाऊन मस्त दालबाटीचं राजस्थानी जेवण करावं आणि दिवस संपवावा असं योजिलं. सूर्यास्ताची कातरवेळ पाहता पाहता ह्या अथांग जलाशयावर तिची तांबूस निळसर चादर विणू लागली. गार बोचरा वारा, तलावा भोवती चौफेर गोफ धरून नाचू लागला. पक्षी घरट्यांकडे परत फिरू लागले. साडेचारशे पाचशे वर्षं जुन्या वास्तूच्या भिंतींना बिलगून तितक्याच पुरातन अश्या वड पिंपळ सदृश वृक्षांवर संधीप्रकाशात सावल्या खेळ मांडू लागल्या. दूर कोणती तरी शिडाची नाही पण डिझेल वर चालणारी मोटारबोट सर सर पाणी कांपत तलावाच्या एका काठाला बांधलेल्या छोट्याश्या बंदरावर येण्याकरिता वेग धरू लागली. इतक्यात सूर्यास्त झाला. पाहता पाहता ह्या सूर्यवंशी साम्राज्यावरचा सूर्य तलावाच्या पाण्यात नाहीसा झाला. खरं सांगायचं तर ह्या मेवाड साम्राज्यावरचा सूर्य केंव्हाच अस्तावला होता. गतवैभवाच्या आणि थिजलेल्या संपत्तीच्या पाऊलखुणा मागे टाकून खरे खानदानी शौर्य कधीच इतिहासात विसर्जित झाले होते. उरले ते फक्त नामधारी राजे.

काळोखात किल्याच्या तटबंदीवरुन हळूच खाली वाकून बघितले. झाडावरून खाली तलावाच्या पाण्यात गळून पडलेलं किंवा कुणीतरी विसर्जन केलेल्या फुलं आणि पानांचे निर्माल्य तलावाकाठी बांधलेल्या त्या पुरातन राजवाड्याच्या तटबंदीच्या भिंतींवर लाटांच्या माऱ्याने आदळत होते. कुणा तरी राजकुमाराच्या राज्याभिषेकाच्या सोहोळ्यानंतरचं विसर्जन केलेलं ते निर्माल्य? की तर कुणा परकीय शत्रूला परतऊन लावण्यासाठी युद्धात प्राण गमवावे लागल्यानंतर केलेल्या दशक्रिये च्या विधीचं होतं ते निर्माल्य ? त्या निर्माल्यातले एकेक पान इतिहासाची साक्ष ठेवून पिचोला तलावात तरंगत होतं. आम्ही संध्याकाळच्या त्या शांत वातावरणात एक एक पाऊल टाकत त्या राजवाड्याच्या परिसरातून बाहेर पडलो. डोक्यात दिवसभरात पाहिलेले चांदीचे पलंग आणि चांदीचे पाळणे होते. पण ती चांदीच्या पाळण्यात झोपलेली किती तरी निष्पाप अशी तान्हुली बाळं, अश्या इराण आणि अफगाण हुन आलेल्या अतीव क्रूर शत्रू कडे तहात ओलीस ठेवली गेली असतील. आणि ती तान्ही बाळं ओलीस ठेवली जात असताना त्या राजस अर्भकाच्या आईच्या काळजाचं पाणी पाणी होत असताना तिची असावं टिपायला कोण येतं असेल? ती पंचवीस खणी राजमहालातली सोन्याचं पैंजण पायी ल्यालेली महाराणी असून सुद्धा शेवटी पोरकीच ठरलेली आई, अंगावर पिणारं पोटचं मूल ओलीस ठेवताना नक्की कोणत्या जन्मात केलेल्या पापाचं प्रायश्चित्त भोगत असेल बिचारी? इसापनीती मधल्या गोष्टीत असायच्या तसल्या असंख्य यक्षप्रश्नांनी बऱ्याच वेळ डोक्यात न सुटणाऱ्या दुष्ट सारीपाटाचं किल्मिष मांडलं होतं. चांदीचा का असेना, पण रिकामा हलणारा मनातल्या विचारांचा पाळणा तिच्या दोरीला चटकन धरून, का कुणास ठाऊक, पण थांबवावासा वाटला.

चारुदत्त रामतीर्थकर.
६ जाने १९, पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भारी लिहिलंय.
आता त्या फेसबुकवरच्या 22 पैकी थोड्या फोटोंचं खोबरं कोथिंबीर टाका पाहू.आमच्याकडे बऱ्याच दिवसात ट्रिप आधीचं भांडण नाही झालेलं. ☺️☺️

छान लिहिलंय! पुलंच अपूर्वाई वाचतानाच तुमचा लेख वाचला, आणि साम्यस्थळे जाणवलीत.
पुढच्या वेळी प्लिज प्रत्येक वाक्यमागे कोटी करणं किंवा विनोद करणं टाळा. उस्फूर्तपणे येणारे विनोद आनन्द देतात, पण जाणून बुजून केलेल्या विनोदांचा भडिमार खड्यासारखा टोचतो.
तेच सर्वात शेवटच्या परिच्छेदाच, खूप अवांतर झाल्यासारखं वाटलं.
अजून खूप माहिती मिळेल उदयपूरविषयी असं वाटलं, पण चांदीच्या खेळातच लेख संपला.
असो, क्रमशः नसेल तर पुभाप्र

जाम खदखदुन हसले, सकाळीच अर्धा वाचल्याने आता दुपारी उरलेला वाचला. सकाळ व दुपार दोन्ही सार्थकी लागली. Proud

फोटोसाठी अनुला अनुमोदन !!

मजा आली वाचताना Happy

.. बा द वे, ते बांधणीच्या साड्या आणि ओढण्या कुठे मिळतात, त्या घेतल्या का?
त्यो पत्या हामालाबी शेअर करा की वाईच

भारी लिहिलंय. खूपच आवडलं. Lol
फोटोसाठी अनुला अनुमोदन !!>> +1

 ही मात्र अधून मधून “ बघा जरा राजाला किती हौस होती ते” असं ही टोमणे मारत होती. त्यावर मीही तिला " हा इथल्या राजाच्या पट्टराणीचा शयनकक्ष नसून जनान खाना आहे” असं सुनावलं तेंव्ह कुठं गप्प बसली.>> Rofl

खरंतर भटकंती लेख मी उघडूनदेखील बघत नाही पण ललित विभागात असल्याने हा वाचला.
छान लिहले आहे. पंचेस आवडले मला. पुलंची लेखनशैली आहे होय ही!

शेवटचा परिच्छेदमात्र उगाच लिहल्यासारखा वाटला. मी स्क्रोलडाऊन केलं ते.

लेखाचा उद्देश संदिग्ध वाटला !
मोठ्ठी प्रस्तावना ( ही मार्मिक , खुसखुशीत विनोदाच्या अंगाने मस्त जमली आहे !) आणि त्रोटक शेवट ...
'उदयपूर आणि त्याच्याशी निगडीत इतिहास याचे तुमच्या नजरेतून अवलोकन' हा मुख्य अपेक्षित गाभा राहून गेलाय , असं वाटत राहिल ं

अलीकडेच राजस्थानची भरगच्च ट्रीप झाली. त्यात उदयपुरही होते. एकूणच राजस्थान सुंदर आहे. उदयपुरही अपवाद नाही!
National Handloom, जोधपूर येथे खरेदीसाठी बराच वाव आहे.

अज्ञातवासी जी , पशुपत जी आणि अॅमी जी, तुमच्या ह्या लेखाविषयीच्या परीक्षणा बद्दल आणि टिपणी बद्दल धन्यवाद, अश्या सूक्ष्म निरीक्षणा मुळे आणि ते आवर्जून उदगृत केल्यामुळं पुढच्या वेळी लिहिताना नक्की काय काय सुधारणा करणे अपेक्षित आहे ( किंबहुना , कोणत्या चुका न करणे अपेक्षित आहे ) ह्या साठी खूप मोलाचे दुवे मिळतात.

लेख आवडल्याचे प्रतिक्रियां बद्दल सर्व वाचकांचे पुन्हा एकदा आभार !