बस लाजुनी पहा तू...

Submitted by माउ on 2 January, 2019 - 19:58

दु:खास सोसण्याचा भलता थरार आहे..
जगण्याकडे सुखाची बाकी उधार आहे

आता जरा करुया तुझ्या मनाप्रमाणे
नुसतेच बोलण्याला माझा नकार आहे..

चोरून पाहताना चोरून घाव होतो...
जाणे तिचा नि माझा कसला करार आहे?

येथे नकोस शोधू हुंकार भावनांचे..
जगतात कल्पना अन माणूस फरार आहे

पत्रातुनी जमेना उडता निरोप घेणे
भेटून सांगण्याचा त्याचा विचार आहे

स्वप्नातही तुला मी माझे कसे करावे?
सत्यात चाहत्यांची संख्या हजार आहे..

गर्दीत सावल्यांच्या ते बावरून जाते
मी पाहिले उन्हाला हळवी किनार आहे..

तो सांगतो मनीचे शब्दांस पेटवूनी
ना जाणता मनाची होते शिकार आहे..

खोली पुन्हा सुरांना रात्री कवेत घेते
अंधारल्या क्षणांची जुळते सतार आहे...

श्वासास रोखणे हा माझा स्वभाव नाही
बस लाजुनी पहा तू, मतला तयार आहे...

-रसिका
१/२/२०१९

Group content visibility: 
Use group defaults

छानच.

येथे नकोस शोधू हुंकार भावनांचे..
जगतात कल्पना अन माणूस फरार आहे

वाह!

व्वा! छान गझल!
>>>गर्दीत सावल्यांच्या ते बावरून जाते
मी पाहिले उन्हाला हळवी किनार आहे..>>>वाह्,जबरदस्त!सुंदर शेर!
>>>खोली पुन्हा सुरांना रात्री कवेत घेते
अंधारल्या क्षणांची जुळते सतार आहे...>>>सुरेख!

करार,विचार,हजार आणि शेवटचा शेरही छानंच!
लिहित राहता, सहजच वृत्तावर पकड येत राहील.शुभेच्छा!