गझल - पत्रकारिता स्वस्त जाहली आहे

Submitted by बेफ़िकीर on 2 January, 2019 - 08:19

गझल - पत्रकारिता स्वस्त जाहली आहे
=====

तिच्यामुळे ही तेढ वाढली आहे
पत्रकारिता स्वस्त जाहली आहे

प्रत्येकाचा देव वेगळा येथे
प्रत्येकाची वाट लागली आहे

एक कधीही नव्हता माझा भारत
ब्रिटिशांनी ठासून मारली आहे

घोड्यावर संसार बांधती धनगर
समानता बस मेंढी शिकली आहे

मूतखडा सोसतात अजुनी पोरी
शाळेची बाथरूम सडली आहे

लग्नामध्ये एक कोट घालवले
वर्षांमध्ये लेक परतली आहे

कितीजणींना सांगू, सोडा चिंता
एक प्रेयसी फक्त वाढली आहे

जी गंगा बाहेर उसाने नेली
कांद्याने डोळ्यात आणली आहे

जगण्यासाठी म्हणावेच हे लागे
'बेफिकीर' दुनिया चांगली आहे

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येकाचा देव वेगळा येथे
प्रत्येकाची वाट लागली आहे

एक कधीही नव्हता माझा भारत
ब्रिटिशांनी ठासून मारली आहे

घोड्यावर संसार बांधती धनगर
समानता बस मेंढी शिकली आहे

मूतखडा सोसतात अजुनी पोरी
शाळेची बाथरूम सडली आहे

लग्नामध्ये एक कोट घालवले
वर्षांमध्ये लेक परतली आहे
जी गंगा बाहेर उसाने नेली
कांद्याने डोळ्यात आणली आहे>>>>>>>>>> अख्खी गझल लाजवाब आहे. वास्तव आहे यात, पण आपल्याला कळकळ वाटुन उपयोग नाही. आपल्या हातुन जमेल ते करायचे.