चलायचं?

Submitted by अज्ञातवासी on 27 December, 2018 - 11:11

१.
"पक्या, जरा दमाने घे. जीव खालीवर हुतुय माझा."
"आग राणी असं दमून कसं चाललं, अजून तीन टेकाड वलंडायचित,"
"पक्या, आक्ख रान पालथं घातलया, तरी तीन टेकाड बाकी?"
"गप की राणी. हे घे. दोन घोट हाण... आणि चाल..."
दोन्हीही जिवाच्या आकांताने टेकडी चढत होते.
"पण पक्या, ती दावल ना व?"
"आग लिहून ठेवलंय... वाच..."
ती वाचू लागली.
'काळा कातळ, लाल घोडा,
शेंदूर फासतोय मारुती!
करा मारुती बाजूला,
भुत्याची करा आरती!
भुत्या बाजू होई,
गणाला आरोळी देई!
गण आला धावून
विहीर जावा पोहून!
मासा तळाला,
लागल गळाला!
तडफडत मासा
कसा कासा!
ती येईल
आणाभाका घेईल!
मागा सगळ्या इच्छा,
पूर्ण करील!
परत फिरा माघारी,
जाऊ नका कुणाबरोबरी!
जाल जाळ्यात,
मासा फसला कोळ्यांत!!!'
"मग राणी, चलायचं?"
...आणि एवढं बोलून दोन्ही जोमाने टेकडी चढू लागले.

२.
"आपल्याला अशी ही बनवाबनवी बघायचाय बरं."
"हो ग, कसं विसरेन?"
"ए त्या टेकडीवरच्या दाराची गोष्ट सांग ना."
"अग कितीदा ऐकशील?"
"अरे सांग ना प्रकाश. रात्रीच्या वेळी ऐकायला मस्त वाटते."
"अग प्रिये, ऐकण्यापेक्षा बघण्यात खरी मजा आहे."
"काय सांगतोस? अशी टेकडी आहे?"
"हो, लिहून ठेवलंय. ऐक"
'सोनेरी किरणे,
दारावर पडती!
अगडबंब पहारेकरी,
दार उघडती!
मोहरा टेकवा,
बाजूला होती!
न टेकवता,
जीव घेती!
आत बसलाय
काळा नाग,
लावता आग
उडून जाई!
पकडा त्याला,
ती येईल,
आणाभाका घेईल!
मागा सगळ्या इच्छा,
पूर्ण करील!
परत फिरा माघारी,
जाऊ नका कुणाबरोबरी!
जाल बिळात,
नाग फसला गारुड्यात!'
"तर मग प्रिये, चलायचं?"
...आणि ती त्याच्या डोळ्यात हरवून गेली.

३.
"पीके, यु डोन्ट अन्सर माय हंड्रेड व्हॅटसाप मेसेजेस!"
"सॉरी बे, जरा बिजी होतो."
"व्हॉट रबिश, आणि फेसबुकवर ऑनलाईन नाहीये तू, फ्रॉम लास्ट थ्री डेज. ओ एम जी!"
"बे मला काहीतरी इंटरेस्टिंग सापडलंय..."
"आय नो, त्या रिनाच्या बडेला तू स्टेटस टाकलं, तेव्हाच आय नो."
"नो ग बे, लिसन. जरा अवघड मराठी आहे, बट एव्हरी वर्ड इज रियल. ऐक."
'सनराईजच्या नन्तर,
प्लेन उडत!
त्यात चढा,
रोप ओढा!
रोप ओढताच,
स्वान येतो!
मिल्क दाखवताच
घटघट पितो!
मिल्कचा थेंब,
बाकी वॉटर ठेवा!
स्वानला टाइम लागतो,
नेट तयार ठेवा.
स्वान कॅच करताच,
ती येईल!
आणाभाका घेईल!
मागा सगळ्या इच्छा,
पूर्ण करील!
परत फिरा माघारी,
जाऊ नका कुणाबरोबरी!
जाल ढगात,
स्वान फसला डकात!'
"मग बे, शाल वी गो, मिन्स, चलायचं?"
...आणि ऑडी सुसाट निघाली...

क्रमशः.... ठेऊ?
Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages