झिरो परीक्षण

Submitted by अज्ञातवासी on 23 December, 2018 - 11:59

गणेशोत्सवात गावोगावी खूप देखावे उभारलेले असतात.पण प्रत्येक गावाचं आकर्षण असतो, तो एक देखावा, जो सगळ्या देखाव्यात उठून दिसतो. आपल्याला माहिती असतं, हा एक देखावा आहे, मूळ घटना यापेक्षा खूप भव्यदिव्य आहे. पण तरीही आपण तो देखावा मनापासून एन्जॉय करतो, त्या देखाव्यातील सत्यतेत कितीही भगदाडे असली तरी!

झिरो बघून मला काय मिळालं?
आनंद? हो थोडासा.
मी भावनिक झालो? नाही.
माझ्या मनावर काही खोलवर ठसा उमटला? नाही.
तरीही हा चित्रपट मी एन्जॉय केला. एका तटस्थ नजरेतून. ना मला कंटाळा आला, ना मला असं वाटलं हा चित्रपट संपू नये.
कारण भव्य देखावे सगळ्यांना आवडतात, पण देखावा संपल्यावर कुणालाही तिथे थांबावं वाटतं नाही!
या चित्रपटाची कथा सांगायची झाली तर बव्वा सिंग नावाची व्यक्ती वयाच्या ३८ व्या वर्षीही अविवाहित असते. कारण सगळ्यांना माहितीये, तो बुटका असतो. लग्नासाठी तो आसुसलेला असतो, आणि असच एका लग्न जुळवणार्या संस्थेत त्याला एक फोटो मिळतो. त्या मुलीला तो बघताच पसंद करतो, पण तिला प्रत्यक्षात बघून तो शॉक होतो, कारण ती असते नासाची वैज्ञानिक व तिला सेरेब्रल पालसी चा आजार असतो. मात्र आता बव्वा हट्टाला पेटलेला असतो, तो तिला पटवतो, मात्र त्याच्या आयुष्यात येते बबिता, आणि सुरू होतो प्रेमाच्या त्रिकोणी प्रवास. खाचखळग्यांचा प्रवास!
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर मी उतरत्या क्रमाने बोलेन. सर्व सहकलाकार, मग बव्वाचे आई वडील असो, लग्न जुळवणार्या संस्थेत असलेला पांडे असो, किंवा बव्वाचा मित्र असो, हे सर्व हिंदी पट्ट्यातील सिनेमामधील अत्यंत कसलेले कलाकार आहेत. त्यांच्या वाटेला कोणतीही भूमिका येवो, त्यांनी ती चोखपणे बजावली आहे, आणि येथेही त्यांच्या वाटेला जेवढं काम आलंय, ते त्यांनी चोखपणे बजावलंय, ना कमी ना जास्त. चोख व्यवहार.
आता मुख्य तीन कलाकारांविषयी म्हणायचं ठरलं, तर सगळ्यात कमी भूमिका कतरिनाची आहे. एक अल्कोहॉलिक, नैराश्य आलेल्या पण अजूनही अहंकार असलेल्या बबिताची भूमिका कतरिना करते, आणि नेहमीप्रमाणे, कतरीना कुठेही या रोलमध्ये फिट बसत नाही, आणि तिने या रोलसाठी मेहनत घेतलेलीही कुठे जाणवत नाही. सगळ्यात जास्त तिने माती खाल्ली असेल, तर हिंदी पट्ट्यातल्या उच्चारांमध्ये. इतकी वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत राहून जर साधे शब्दोच्चार न जमणारी ऐक्ट्रेस फक्त सुंदरतेच्या बळावर आज टॉपला असेल, (आता कतरिनाला मी ती आता सुंदर दिसत नाही असं म्हणणार नाही, कारण अजूनही ती छान दिसते. भलेही तिचा जुना चार्म गेलाय तरी!) तर हॉलीवूड बॉलीवूडला भारतातच का मागे टाकतय, याचं उत्तर मिळतं.शब्दोच्चार जरी सोडलेत, तरीही अभिनयाच्या बाबतीतही कतरिना कुठेही बबिता जाणवत नाही. दिसते ती फक्त कतरीना.
आता अनुष्काविषयी बोलूयात. तोंड वेंगाडून बोलणे, वाकडं चालणे ह्या दोन गोष्टी करून अनुष्का स्वतःला सेरेब्रल पालसीची रुग्ण दाखवते. पण तिच्या देहबोलीत कुठेही तो आजार, अथवा मर्यादा जाणवत नाही. कितीही आशावादी असलं, तरीही या आजारांनी शारीरिक मर्यादा येतातच. पण वरवरची शारीरिक लक्षणे घेऊन भूमिकेचा अभ्यास न करता, अनुष्काने ही भूमिका साकारलीये, मग त्या व्यक्तीची मानसिकता दूरच राहिली. अनुष्काच्या भूमिकेत पावलोपावली तो भडकपणा व उथळपणा जाणवत राहतो.
आता या कथेतील सर्वात मुख्य पात्र, ज्याच्यावर या चित्रपट मार्केटिंगचा सर्वात जास्त फोकस होता, त्या शाह रुख खानवर येऊ. एका शब्दात सांगायचं झालं, तर या चित्रपटात शाहरुखने फक्त माती खायची बाकी ठेवलीये. मी बाकी ठेवलीये असं यासाठी म्हटलो की नेहमीच गालात हसणं, शरीर वाकवून रोमान्स करणं, भडकपणे राग दाखवणं, मान हलवून अभिनय करणं, यात शाहरुख पैकीच्या पैकी मार्क घेतो. पण एका बुटक्या व्यक्तीचा लहेजा, शारीरिक मर्यादा, त्यातून येणारा न्यूनगंड, लग्न जमत नसल्याने येणारी निराशा, काहीतरी नवीन करण्याची प्रचंड उर्मी व आशावाद, या सर्व आघाडीवर तो सपशेल माती खातो.
आता या चित्रपटाच्या VFX अथवा CGI कडे वळू. एका शब्दात म्हणायचं झालं, तर वेल ट्राय, पण बुटका आणि लहान हे शब्द कितीही समानार्थी वाटत असले, तरी यांचा स्पष्ट अर्थ ना समजल्यास काय अनर्थ होऊ शकतो, याच उत्तम उदाहरण. एखाद्या १२ वर्ष वय असलेल्या मुलावर तुम्ही शाहरुखला चिकटवला, असं वाटत राहतं, आणि ते बेमालूमपणे झालंय. पण त्याची चित्रपटात गरज नाही, आणि ज्याची गरज आहे, ते कुठेही दिसत नाही. म्हणून लहान शाहरुखला पैकीच्या पैकी मार्क, बुटक्या शाहरुखला शून्य मार्क, आणि गरज बुटक्याची होती राजा...
छायालेखन ज्या मनू आनंदने केलंय, त्यांना सलाम. देशी मातीपासून अंतरिक्षपर्यंत जो एक टच आहे, तो त्यांनी छान जपलाय. प्रत्येक फ्रेम नेत्रसुखद वाटते. भव्य वाटते. चित्रीकरण तर अत्यंत टवटवीत वाटत. एकंदरीत हा खुप छान अनुभव वाटतो.
म्युजिक मध्ये अजय अतुलने तुम्ही हिंदीत का नेहमी माती खाताय? असा प्रश्न मला यावेळीही विचारण्याची संधी दिलीय. 'मेरे नाम तू' सोडलं तर सगळी गाणे विस्मरणीय आहेत. आणि 'मेरे नाम तू' वर 'सैराट झालं जी'चा प्रभाव जाणवत राहतो.
आता बोलूयात कथेविषयी आणि पटकथेविषयी. कथा खरंच भव्य आहे. कथेची कल्पनाच मुळात अतिशय एपीक म्हणावी अशी आहे (मी एपिक म्हटलंय, युनिक नाही. गैरसमज नको). मात्र पटकथा, जी चित्रपटाचा आत्मा असते, तिच्यातच जीव नाही. मुख्य त्रिकोण सोडला तर, कुठल्याही व्यक्तिरेखेची चित्रपटात नीट वाढ किंवा ओळख होत नाही. मुख्य व्यक्तिरेखाही खूप उथळ लिहिलेल्या वाटतात. छोट्या छोट्या गोष्टी का व कशा घडतात, याचं स्पष्टीकरण मिळत नाही, व प्रेक्षक गोंधळून जातो.
आता शेवटचा व मुख्य भाग दिग्दर्शन. आनंद राय ही व्यक्ती उत्तर भागातील चित्रपट बनवणारा हुकुमी एक्का. तिथल्या व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणं, ही त्यांची खासियत. पण या चित्रपटात नेमकं त्यांना व्यक्तिरेखा उभ्याच करता आल्या नाहीयेत,कारण...
...त्यांचं सगळं लक्ष शाहरुखच्या स्टारडमकडे केंद्रित झालंय...
वरची ओळ मी यासाठी हायलाईट केली, कारण याच एका कारणाने चित्रपट दणक्यात आपटतो. बव्वा सिंग जरी बुटका आहे, तरी तो शाह रुख असल्याने त्याची वागणूक स्टारसारखीच असणार, हे धरून सगळा चित्रपट त्याभोवती केंद्रित केलाय, आणि परिणाम... शून्य!
समारोपात मी असं म्हणेन की शेवटी ही कथा भव्य आहे, देखाव्याच्या कथेसारखी. पण देखावा दाखवताना त्या कथेला करावी लागणारी डागडुजी स्पष्ट दिसते. पण भव्यदिव्य देखावा उभं करायलाही कसब लागत...
हा चित्रपट म्हणजे असाच एक देखावा आहे. भव्य कथा, पण भगदाड पडलेली पटकथा. सर्व कलाकार अभिनयाचा देखावा करतायेत, पण कुणीही तो जगत नाहीये. सादरीकरण सुंदर आहे, पण ओढ लावणारं नाही. एखाद्या सुंदर देखाव्याकडे माणूस क्षणभर ओढला जाऊन तटस्थ होतो, तसंच इथे होतं. हा चित्रपट ना हुरहूर लावतो, ना टिकणारा आनंद देतो. आपण चित्रपट बघायला आलोय, चित्रपट संपलाय, चला आता घरी जाऊन अर्जंट मेल टाकायचाय...
...आणि शून्यापासून सुरुवात करून बाहेर पडताना तो शून्य होऊनच पडतो...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरूखने बुटक्याचा रोल केलाय म्हणे. म्हणजे अजून किती बुटका ?

व्हीएक्सएफ तंत्रज्ञानाचा वापर तर कॅटरिना, तब्बू, करीना, दीपिका, अनुष्का अशा उंच हिरॉईन्ससोबत त्याला त्यांच्यापेक्षा उंच किंवा बरोबरीचा दाखवण्यासाठी करावा लागत असेल ना ?

शाहरुख बिचारा वाटला.. बौवा सिंग नव्हे शाहरुख खान बिचारा वाटला .. 200 -200 करोड टाकून फुकट रिस्क घेऊन का चित्रपट काढत असावेत.. भव्य काहीतरी नेहमी करायची काय गरज..
शाहरुख ने जीव तोडून अभिनय केलाय अस वाटलं.. पण त्याने प्रॉपर बुटका न दिसणं हे व्ही एफ एक्स ची चूक आहे.. आणि एवढे पैसे घालऊन असलं व्ही एफ एक्स ?.. फॅन मध्ये नीट जमल होतं .. त्यात पण त्याची हाईट कमी दाखवली होती नॉर्मल पेक्षा..
फर्स्ट हाफ ओके आहे .. मुव्हिंग ..एनटरटेनिंग..
सेकंड हाफ मध्ये काहीही आहे मंगल ग्रह काय नी काय काय.. सकाळचा 8 चा शो बघितला .. 6 लोकच होतो आम्ही.
शाखा बद्दल वाईट वाटलं . खूप ग्लॉरिअस दिवस बघितले आहेत त्याने .. निदान एक मोठा हिट मुव्ही मिळावा त्याला .. ऍक्टर चांगला आहे..
या मुव्हीमध्ये मात्र टिपिकल राज राहुल मिस्टर रायचंद टाईप नाही वाटला .. टिपिकल दिल्ली वाला वाटला

चित्रपट फेल आहे हे न बघता पण कळते, त्यासाठी इतकी जीवावरची रिस्क घ्यायची काय गरज होती? Happy
आयुष्याचे ३ तास वाया, पैसे वाया.

वन टाईम वॉच आहे. फॉर अ चेंज अनुष्का पेक्षा चांगली अकटिंग कतरीना ने केलीय.
शाखा ने चांगले काम केले आहे, स्टोरी फुसकी आहे शेवटी शेवटी.

चित्रपट फेल आहे हे न बघता पण कळते,

√√√√

दिवाळी ईद आणि ख्रिसमसच्या मुहुर्तावरचे चित्रपट हे चार दिवसात शंभर कोटी याच हिशोबाने बनवले जातात.
शाहरूख सलमान आमीर पैकी एखादा खान सुपर्रस्टार घ्या. चारसहा महिने आधीच मार्केटींग करा. चित्रपटाची हवा करा. एकाचवेळी हजारो चित्रपटगृहात प्रदर्शित करा. आणि लोकांना चित्रपट फेल आहे हे समजायच्या आधीच त्यांच्या खिश्यात हात घालून गल्ला गोळा करा.
दुर्दैवाने या पॅटर्नला वर्षानुवर्षे लोकं फसतच आहेत आणि सो कॉलड ब्लॉकबस्टर चित्रपट सर्वांच्या आधी पहिल्या विकेण्डलाच बघायला हवा या हव्यासापोटी यांचे दुकान चालवत आहेत.

शाखा ने चांगले काम केले आहे,

√√√√

येस्स !
त्यासाठी होमपीच होता. चित्रपट त्याच्या चाहत्यांना निराश करणार नाही हे नक्की ..
जेव्हा टीव्हीवर येईल तेव्हा मी बघेन असे वाटतेय.
फक्त आता गल्ला किती कमावतो हे बघायचेय. बनवायला २०० कोटी लागले अशी चर्चा आहे पण तो आकडा खोटा वाटतो.

चित्रपट फेल आहे हे न बघता पण कळते, त्यासाठी इतकी जीवावरची रिस्क घ्यायची काय गरज होती? Happy
आयुष्याचे ३ तास वाया, पैसे वाया.>>>>>
नाही, जिवावरची रिस्क ठग च्या वेळेस घेतली होती. एकदा वाघाच्या तोंडातून सुटल्यावर माणूस मांजराला भितो होय Wink

वन टाईम वॉच आहे. फॉर अ चेंज अनुष्का पेक्षा चांगली अकटिंग कतरीना ने केलीय.
शाखा ने चांगले काम केले आहे, स्टोरी फुसकी आहे शेवटी शेवटी.>>> धन्यवाद च्रप्स

मानव तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहीत असूनही तुम्ही दिले नाहीत तर तुमच्या प्रतिसादाची शंभर शकले होऊन ती तुमच्याच धाग्यांवर लोळू लागतील .... असे काही मला म्हणायचे नव्हते. एक औपचारिकता म्हणून उत्तर देतो.

https://www.maayboli.com/node/68440

ओके, मी लेखकाची लेखन यादीही पाहिली होती, या विषयाचा एकच धागा दिसला तो हाच.
आणि माझा प्रतिसादही गायब.

असो. आता कळाले, धन्यवाद मेरिच गिनो.

पण एका बुटक्या व्यक्तीचा लहेजा, शारीरिक मर्यादा, त्यातून येणारा न्यूनगंड, लग्न जमत नसल्याने येणारी निराशा, काहीतरी नवीन करण्याची प्रचंड उर्मी व आशावाद, या सर्व आघाडीवर तो सपशेल माती खातो.
आता या चित्रपटाच्या VFX अथवा CGI कडे वळू. एका शब्दात म्हणायचं झालं, तर वेल ट्राय, पण बुटका आणि लहान हे शब्द कितीही समानार्थी वाटत असले, तरी यांचा स्पष्ट अर्थ ना समजल्यास काय अनर्थ होऊ शकतो, याच उत्तम उदाहरण. एखाद्या १२ वर्ष वय असलेल्या मुलावर तुम्ही शाहरुखला चिकटवला, असं वाटत राहतं, आणि ते बेमालूमपणे झालंय. पण त्याची चित्रपटात गरज नाही, आणि ज्याची गरज आहे, ते कुठेही दिसत नाही. म्हणून लहान शाहरुखला पैकीच्या पैकी मार्क, बुटक्या शाहरुखला शून्य मार्क, आणि गरज बुटक्याची होती राजा...>> हे चांगले लिहीले आहे.

माझी एक थिअरी आहे. गेम ऑफ थ्रोन्स ची अभूत पूर्व लोकप्रियता व प्रेक्षकाम्मधील युनिफॉर्म अ‍ॅक्सेप्टन्स बघून बॉलिवूड हादरले आहे.
इतका प्रयत्न इथे स्क्रिप्ट लेव्हल ला कधी केला जात नाही. त्या कर्माची फळे भोगायची वेळ आली आहे. थग्ज मध्ये तसा प्रयत्न करोन झाला
जहाजे काफिले वगैरे. ते फेल गेलं . इथे टिरीअन लॅनिस्टर पक्षी पीटर ड्रिंकलाज की लेज ह्यांच्या व्यक्तिरेखेशी व अ‍ॅक्टिंग शी स्पर्धा करायचा प्रयत्न आहे. जो फेल गेलेला आहे. पण व्यक्तिरेखाच मुळात कमी विकसित केली गेली आहे. पटकथा अगदीच वीअर्ड. आणि सुमार स्किल्स ह्यांचा संगम झाल्यावर काय होणार. अनुश्का व कतरैना ह्यातील जास्त मोठी डोके दुखी कोणची हे मला ठरवता येत नाही. उथळ पाण्याला खळ्खळा ट फार अशी अवस्था आहे.

फार पूर्वी जिम कॅरी चे पेट पेट डिटेक्टिव्ह व व्हेन नेचर कॉल्स हे दोन सिनेमे आलेले तेव्हा बादशहा सिनेमात यु नो हू ने तंतो तंत मॅनरिझम्स ची कॉपी मारलेली ती इतकी फेल गेलेली की कीवच आली. बघवत नाही हो बघवत नाही.

टिरीअन लॅनिस्टर मध्ये बुटके असण्याचे विविध त्रास व कायम लोकांकडून व खुद्द वडिलांकडून होणारे अपमान सहन करतही व्यक्तिरेखेने स्वतःतले मी पण जिवंत ठेवले आहे. आपली अशी खास वैशिष्ट्ये जपून, चमकदार बोलून लोकांना गुंगवून ठेवायचे कसब डेव्हलप केले आहे.
जीव वाचवला आहे. युद्ध केले आहे. व आत एक प्रेम करू शक णारा पुरुष आहे. हे जाणवून दिले आहे. त्यात ते सोनेरी केसांचे झगरे व निळे आर पार बघणारे डोळे म्हणजे वाहवा. पर्फॉरमन्स असावा तर असा.

आतापर्यंत थांबले होते, पण आता लिहीतेच. शाहरुखच्या नावाखाली ऋन्मेष , दुसर्‍याला प्रचंड इरीटेट करतो. अमीर / सलमान/ अमिताभ अथवा दुसर्‍या कुठल्या नटावर कुणीही काही कुठेही लिहीले तरी हा तिथे येऊन शाहरुखला मध्ये घुसवुन वाचकाला स्वतःचे केस ओढायला मजबूर करतो, आणी कुणी याच्याकडुन उत्तराची अपेक्षाही करत नसतांना धागा वाढवतो आणी प्रत्युत्तरे करीत बसतो. आता आता परीक्षणच शाहरुखच्या सिनेमावर असल्याने याच्या हातात कोलीत आलेय.

काही जणांना तो ( ऋन्मेष ) आवडत असल्याने ते कायम त्याची बाजू घेत असतात, घेऊ दे, मला राग येत नाही. पण दुसर्‍याला किती त्रास द्यावा यालाही काही मर्यादा आहेत. अज्ञातवासींनी थोडेसे त्या शाहरुखच्या विरोधात काय लिहीले तर याचा पोटशूळ उठला. अख्ख्या पानभर याचीच सायको बडबड. अरे आवर आता.. खूप झाले.

काही जणांना तो ( ऋन्मेष ) आवडत असल्याने >>> गैरसमज आहे ताई तुमचा हा. त्यांना ऋन्मेष आवडतो कि नाही हे अलाहिदा. ते त्याचा उपयोग स्कोअर सेटल करून घेण्यासाठी करत असतात. अर्थात ऋन्मेषला प्रतिसादकांची गरज नाहीच. ते त्याने कष्टाने उभे केलेले आहेत.

मेरिच गिनो +1

पण हा धाग्याचा विषय नाही त्यामुळे लेखकाला आपण सहाय्य केले पाहिजे आणि धागा bharkatwala नाही पाहिजे.

रश्मी मी शाहरूखचा चाहता आहे... भक्त नाही.
मी त्याच्या चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट बोलतो.
मात्र कोणी त्यावर न पटणारी टिका करत असेल तर मी ती खोडून काढणारच !

जसे की हा चित्रपट फसलाय अशी चर्चा होतेय हे कबूल !
मात्र शाहरूखने धमाल केलीय हे सुद्धा कानावर येतेय ..

असो...
तेवढे माझा आणि माझ्या शाहरूखप्रेमाचा विषय वेगळ्या स्वतंत्र धाग्यावर काढूया का? आधीच यामुळे एक धागा स्थलांतरीत करावा लागला आहे. ईथे पुन्हा तेच नको. चित्रपटाबद्दलच बोलूया. असा चित्रपट वर्षातून एकदाच निघतो. जो फ्लॉप जाऊनही वर्षात सर्वधिक चर्चा त्याचीच होते. त्या चर्चेचा आनंद घेऊया Happy

आणि हो रश्मी, मला सांगा माझा त्या धाग्यावरील कुठला प्रतिसद चित्रपटाच्या बाहेरचा अवांतर असा होता? नंतर लोकांनीच माझ्या शाहरूखप्रेमाचा विषय काढला.

याऊलट याच धायावर पहिला प्रतिसाद बघा.
शाहरूखच्या बुटकेपणावर विनोद केलाय.
अर्थात, मला आणि शाहरूखला यावर जराही आक्षेप नाही. पण ही चित्रपटाशी संबंध नसलेली शाहरूखवर वैयक्तिक कॉमेंट झाली. आणि त्याला मात्र खुद्द धागालेखकाने गूड वन म्हटले आहे Happy

गैरसमज आहे ताई तुमचा हा. त्यांना ऋन्मेष आवडतो कि नाही हे अलाहिदा. ते त्याचा उपयोग स्कोअर सेटल करून घेण्यासाठी करत असतात. अर्थात ऋन्मेषला प्रतिसादकांची गरज नाहीच. ते त्याने कष्टाने उभे केलेले आहेत.>> +११११११११११११११११११११११११

पण हा धाग्याचा विषय नाही त्यामुळे लेखकाला आपण सहाय्य केले पाहिजे आणि धागा bharkatwala नाही पाहिजे.>> +११११११११११११११११११११११११

शाहरूखचा चाहता आहे... भक्त नाही.
मी त्याच्या चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट बोलतो.
मात्र कोणी त्यावर न पटणारी टिका करत असेल तर मी ती खोडून काढणारच !>>+११११११११११११११११११११११११

Really, really liked Zero. Barring one sequence where all the stars gather post interval, which disconnected me. No easy resolutions, stretching the imagination, it’s really a brave film. It engaged me throughout. I really feel its the people’s expectations that disappoint them.” Anurag Kashyap

कश्यप सारख्या नो नॉन्सेन्स सिनेमाच्या जाणकाराणे असे म्हणणे ही खूप मोठी झिरो साठी खुप मोठी पावती आहे. प्रेक्षकही चुकू शकतात.

Barring one sequence where all the stars gather post interval, which disconnected me. No easy resolutions, stretching the imagination, it’s really a brave film.
>>>>

याला कोणीतरी मराठी करा ना प्लीज..

धागे हायजॅक होतात तसा आयडी पण होतो का
हे हायझेनबर्ग पूर्वी बरे होते आता ते दुसरा धगाविभू होत आहेत का
का हे काट्याने काटा काढत आहेत
पण जे काही सुरू आहे ते मस्त इरिटेत करणारे आहे
गुड वन कीप इट

Pages