षष्ठ द्वादश . .ले. सुशांत झाडगांवकर.

Submitted by sushant zadgaonkar on 21 December, 2018 - 08:04

षष्ठ द्वादश
सुशांत झाडगांवकर
तो मिलीटरी एरीयात एका कॉलनी बाहेर च्या पथदर्शक शिल्पावर चढून ते रंगवत होता..विशीत होता तो.जुनाट कपडे, गोरा रंग, तरतरीत उभट चौकोनी चेहरा.. सकाळच्या कोवळ्या ऊन्हात चमकणारे पिंगट केस,तल्लीन होवून झोकात ब्रशने त्या शिल्पाचा वरचा भाग तो रंगवत होता..
ह्या शहरात, छावणीत रहाणार्‍या संपन्न लोकांच्या वस्तीत ह्याने सुशोभीकरण करणार्‍या कंत्राटदाराच्या हाती काम करावं हा नियती चा एक एपीसोड होता..
षष्ठातला व्रुषभेचा मंगळ..
का कुणास ठाऊक.. अचानक हे वाक्य माझ्या मनात आलं आणि मी ह्या सकाळच्या बघितल्या फ्रेम ला खोलवर साठवून ठेवलं..
म्हणजे ...धनु लग्न.. सध्या लग्नी साडेसाती.. म्हणजे वय साधारण बावीस ..जमतंय..त्याला बघुन सुचलं, सध्या रवीसुद्धा वृश्चिकेत,वार मंगळवार, सकाळचं वृश्चिक लग्न..
म्हणजे धनस्थानी मकर..तिखट शिळं किंवा मिळेल ते खाऊन गोड मानणारा,तृतीय स्थानी
स्वतः च्या मग्नतेची साथ कुंभ देत, पराक्रम गंभीर पणे सोसायचा.
चतुर्थात भाबडी अशिक्षित आई,जमेल तेवढी सावली देई,पण सगुणा निर्गुणापलिकडंची ,जरा भ्रमिष्ट,..सकाळी त्याला डबा देणे आणि रात्री अंगावर पांघरूण घालणे एवढी जबाबदारी निभावणारी.पापभिरू, भित्री,बेताच्या परिस्थितीत निरीच्छपणे आलेला दिवस पुढे ढकलत शांत आणि समाधानांत जगायची..
पण पंचमात मिळालेल्या तळपत्या वारसाला कुठे ग्रहण लागलं कुणास ठाऊक, पूर्वजांचा 'माज' तेवढा संतापा सकट मिळाला.प्रेमा दाखल खाली शेपटाची सतत वळवळ करणारं मरतुकडं कुत्र पंचम आणि षष्ठाच्या संधीवर ,माझी साथ देतंय.एकाच वेळी प्रेमिक आणि पाळीवाची भुमिका निभावंतय..त्या पिला सोबत त्याच्या वेगात धावायचं, आपल्यातले दोन घास त्याला द्यायचे. एकमेकाचं रक्षण करायचं..
षष्ठ सोलतंय कोवळ्या उन्हात. काटक शरीर, सभोवताली वैभव नांदतंय, त्याची दखल घ्यावी म्हटलं..इकडे तिकडे एक क्षण नजर जरी फिरकली ..तरी ब्रशचा फटका चुकायचा आणि दिवसभर ती चूक निस्तरत मजूरी कमी मिळायची..निर्जीव शिल्प,सुंदर दिसायला हवं.ह्याचे मात्र सजीव हात थंडीत अकडलेले,गाल ओठ फुटले,डोळे थकले तरी हे शिल्प सजीव केलं तरच संध्याकाळी जेवणाची सोय करता येणार..
बाकी पुढे चांगले दिवस आले कि माझंही आयुष्य रंगीत करायला ,हेच रंग ,तो वरचा बाप वापरणार.. स्वतःच्या बापाची कमतरता कधीच जाणवली नाही सगळं त्या वरच्या बापाच्या भरवशावर..आजच्या माझ्या डोळ्यात ल्या निखार्यांना हीच अवतीभवती ची मंडळी 'चमक' म्हणणार..हातपाय अवघडून थंडी सोसत मुटकुळं करुन झोपणारं हेच शरीर गरजेपेक्षा मोठ्या ऐसपैस मंचकावर विसावणार..टोचणार्‍या घोंगडी च्या तणा ऐवजी दुलईची रेशमी टोकं गुदगुल्या करणार..तोपर्यंत षष्ठू षष्ठू मासेषू मासेषू...
..तोपर्यंत हेच कुत्र्याचं पिल्लू आपले पाय चाटणार ..खरी मित्रता, स्वामीनिष्ठता..ही मात्र खरी श्रीमंती सद्ध्या तरी अबाधित आहे..
सप्तमांत मालक मैत्री गाजवतो ती मतलबा पुरती..माझ्या सोबतीला कुणाला न देता माझी तारीफ करून दुप्पट काम करवून घेतो..हे देईन ...ते देईन..सायकल देईन..
अरे सायकलीचं भाडं सुद्धा त्याच्या हातून सुटेना.. पण कसं, ह्या कामात मला करमतं, कळत नाही.. पण करावंसं वाटतं..दरवेळी रंग तयार करताना,आता ही वस्तू अमूक रंगात अशी छान झोकदार दिसेल,तिच्या नव्या रंगात परिसर खुलेल..खरं म्हणजे,
काही दिवसानी ..मी जर हिला बघायला आलो तरी मला ह्या कॉलनीत शिरुही देणार नाहीत.. माझी निर्मिती हॅ हॅ..निर्मिती?
बघा ...मी त्यावर आता पासूनच अधिकार गाजवतोय..मला माझ्या रंगकामाच्या खुणाही बघायला मज्जाव करतील हे?
मग तरीही मी हे काम करायचं?करत रहायचं?..
दुसरं येतंय काय वेड्या तुला?..चाचानी ब्रश धरायला शिकवलं..रंग मिसळायला शिकवलं..सायकल चालवायला शिकवली..म्हणून रोज खायला मिळतंय,थोडं साठतंय..पुरे नाही का हे?
खाली ठेवल्यास सायकल ला कुलूप लावलंय का,ज्या शिडीवर चढून आलो तिचे सांधे नीट आहेत ना, एखादा खिळा खिळखिळा तर नसेल ना..आणि हा विचार करताना, हातात ला पेंटचा डबा निसटला तर,पगार मोठा,का पेंट,की जीव..?
क्षणभरात भिती झटकायची म्हटलं तरी ..तसा वाकबगार,निष्णात असला तरी किंतु घर करायला वेळ लागतो किती?..
अष्टमात प्रश्न काय थोडे आहेत ..गेल्या वर्षी पुलावर काम करताना, पाण्यात पडला तेव्हा एका क्षणात त्या दहा फुटात,सेकंद भरात सगळी जबाबदारी ची यादी डोळ्यासमोरून स्क्रोल झाली.. चिखल आणि रंग एकत्र फासून बाहेर पडला तो बाहेर मुलं 'भूत..भूत.."ओरडत पसार झाली..
पण जिगर ठणठणीत पोराचा..
गेली दहा वर्षं घरं,बगिचे,पूल,रस्ते,स्मशान सगळीकडे ह्याचे स्ट्रोक्स पोहोचले,..अविश्रांत मेहनत घेतोय,म्हणून एक दिवस हिमतीवर स्वतःचा धंदा नक्कीच सुरु करणार...खर्च झालेली ऊर्जा काय वाफ दवडाय साठी वापरली आहे..अरे चाचा सुद्धा ह्याची हाताची बांधली मूठ उघडु नाही शकत..चेहरा कोवळाअसला तरी तो सिंहासारखा करारी झालाय..
आई म्हणाली नाकी डोळी वडीलांवर गेला..ती सांगते म्हणून.. एरवी दोन वर्षांपूर्वी बाप मेल्याचं कळलं तेव्हाही आईच तिथे गेली होती.. दहा वर्षं साला मावशी कडे झोपला..अजून कुठे खरकटं टाकून मेला त्याचं त्यालाच ठाऊक..
तेव्हा पासून स्वतः चा धंदा सुरु करण्याचं स्वप्नं बळकट होतंय..कष्ट ढीगभर ऊपसतोय..सोबतीची मंडळी संध्याकाळी गुत्त्यावर जातात, झिंगत बाहेर पडतात तरी ह्याच्या जिभेला दारू शिवली नाहीये अजून..
काही चांगले मित्र आहेत ते विचारपूस करतात, हवा असेल तेव्हा सल्ला देतात, अडलं तर पैसा देतात, व्याजाशिवाय परत घेतात.. पेंटिंग च्या टीप्स देतात.
पण मागे एकदा एका मित्रानं सांगितलं म्हणून एका मोठ्या घरी त्याच्या मुलीसमोर मॉडेल म्हणून बसावं लागलं तेव्हा तिनं गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला, सटकन् किस घेतला..आणि ह्याच्या डोक्यात झिणझिण्या आल्या, कमाई तशीच सोडून परत आला,.
मित्रांनी परिस्थिती चा गैरफायदा घेतला आणि तिला ब्लॅकमेल करुन पैसे ऊकळले,ह्याला काही मिळाले.. त्यावेळी आईच्या आजारात कामी आले..त्यालाही एक गोष्ट नक्की माहिती होती..मेहनती शिवाय कमवलेला पैसा वाया जातो.
नंतर ड्रम बडवायला शिकवलं मित्रानं..हा दिसायला छान म्हणून त्या गणवेशात ह्याचं कुणी तरी "शूट " प्रेसला पाठवलं..चाचाला तो फोटो वापरलेला दिसला आणि त्याची ह्यावरची निगराणी वाढली..
राग येतो, अनावर होतो,.. अरे माझ्या नकळत माझ्या परिस्थिती चा गैरफायदा घेतात..कुणी तरी फोटो टाकतं..मी बघितलाच नाही पण त्रास आणि माझ्या भोवती चा जाच वाढला..चाचाला कसं पटवायचं कि शाळेत गेलो नाही तरी मला खूप शिकायचं आहे.शाळेत न जाता जितकं म्हणून शिकता येईल ते सगळं शिकायला आलं पाहिजे..
अरे माझ्या जवळ फक्त पैसाच नाही आहेनं..
आणि परिक्षा तेवढ्या न देऊन सुद्धा मी काम्प्युटर शिकलो,मागे गाडी चालवायला शिकलो, सॉफ्टवेअर मध्ये रोज चाचाचा हिशोब ईंग्रजी भाषेत लिहीतोच कि..
मला कुणी थांबवू शकत नाही...खरंय मित्रा.
हे..अगदी खरं आहे.. मी सुद्धा गेल्या मंगळवारी तुला बघितलं..तु मला दिसला..तो क्षण महत्वाचा होता मग मी तुला एका घरांत..कुंडलीतल्या षष्ठात ठेवलं बरका..आणि तू तयार झाला ओझरता...
अरे तुझी रास कळली असती,तुझी जन्मवेळ कळली असती तर दृष्टींचा, दशांचा पूल बांधला असता..तु कसा आहे हे कळलं असतं,कुठे आहे तेही कळलं असतं...तुझ्याशी कदाचित मैत्री पण झाली असती ती काय आता पण झालीच आहेरे..पण आता फार जास्त लुडबूड करावीशी वाटत नाही.शेवटी तुझं जगणं,तुझे अनुभव, तुझा द्रूष्टीकोन हा तूच विशाल करू शकतोस. ..स्वतःच्या अभिजात जडत्वासोबत तूच खेळू शकतोस..
माझ्या तोकड्या पुस्तकी ज्ञानात मी माझे ईमले रचण्याऐवजी तु स्वत:च मुक्तपणे एक सजीव अभिव्यक्ती म्हणून तू जग...
मी तुला माझ्या कल्पनाविलासातून मुक्त करतो..तुझा विचार करता करता एवढा जवळ आलो तुझ्या..ही किमया तुझ्या आकर्षक व्यक्तीमत्वाची आहे...
असाच कधी तरी पुन्हा भेट..मग मस्त बोलू..
पण तेव्हा तुझ्या बंगल्यात पोर्चच्या मागच्या आफिसात तुझ्या सुंदर कुटुंबासोबत चहा घेत...
हो..खूप मोठ्ठा हो बेटा..
सुशांत झाडगांवकर..
८६००१०४७६४,

Group content visibility: 
Use group defaults