करार ...

Submitted by स्मिता द on 18 December, 2018 - 00:46

खूप वर्षांपूर्वी लिहिलेले आहे. ही गझल नाही कारण मला गझल लिहिता येत नाही. Happy काही मनात आले ते कागदावर उमटले इतकेच......

करार

बरीच माझी दु:खे अजून उधार आहे
तराजूच्या पारड्याशी त्यांचा करार आहे

अज्ञातवासाचा पता कोणास देत नाही
तरी शोधती मला ती दु:खे हुशार आहे

नाही बघितले कवडसे, नाही कधी स्वप्ने
न केल्या गुन्ह्याची शिक्षा हजार आहे

निषेध नोंदवण्याची जुनी सवय टाकली
कोपरा दुमडूनी परंतु हळवा नकार आहे

खडतर कठीण दिवस कसाबसा भोगला
रात सारी सरण्यावर बाकी मदार आहे

तुजविन जगण्याचा केला अभ्यास पूर्ण
उजळणीवरी त्यांच्या अजून मदार आहे

निळ्या पाखरात माझी चालू होती उठबस
आता कावळ्यांची मी झाली शिकार आहे

नाही आकांत कुठला नाही कुठला आक्रोश
तरी फिर्यादी म्हणून माझा जयकार आहे

मुजोर मारक-यांची वाढत चालली वस्ती
मरावयास कोणी मिळणे दुसार आहे

त्यांच्या दंभाचा ढोल कधीच फाटला
फाटक्या तुणतुण्याचा बारीक गुंजार आहे

नि:शब्द तरी संगीत फुलते अजून ओठी
सुरांच्या सक्त बंदीचा धुमसता अंगार आहे

रोज भोवती जल्लाद माझ्या फिरत आहे
गराड्यात त्यांच्या अजून सुकुमार आहे

कोटी कणांचे स्वातंत्र्य घेऊन सूर्य येतो
तरी पारतंत्र्याची मी कुठली शिकार आहे

नेस्तनाबूत करण्यास लावले बळ त्यांनी
अजूनही सामर्थ्य माझे झुंजार आहे

स्मिता दोडमिसे

Group content visibility: 
Public - accessible to all site users