सारे तुझेच आहे सारे तुझेच होते

Submitted by द्वैत on 16 December, 2018 - 23:27

सारे तुझेच आहे सारे तुझेच होते
तू सोडलेस जेथे सारे तिथेच होते

हे मार्ग जीवनाचे गंधाळलेच नाहीत
हे रंग जीवनाचे सारे फिकेच होते

त्या मेहफिलीत झाला पाऊस आसवांचा
त्या मेहफिलीत सारे प्याले रितेच होते

ज्यांनी हसून लुटले ते आपलेच होते
जे ठोकरून गेले ते ही भलेच होते

आता जरी ही गाडी मुक्काम थेट घेते
पूर्वी कधी तिलाही थांबे बरेच होते

Group content visibility: 
Public - accessible to all site users