आमच्या घराचा गुरुत्वमध्य.

Submitted by Charudutt Ramti... on 13 December, 2018 - 13:26

एखाद्या सूक्ष्मशा टाचणी पासून ते अगदी “पृथिव्ये समुद्र पर्यंत:” अशा, ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तूला निश्चित असा एक ‘गुरुत्वमध्य’ असतो (सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी). त्या गुरुत्व मध्यापाशी त्या वस्तूचा सर्व तोल आणि वस्तूचे वजन एकवटलेले असते. न्यूटन, गॅलेलियो किंवा तत्सम कोणत्यातरी ऐतिहासिक कुशाग्र बुद्धिमत्तेच्या शास्त्रज्ञानं घालून दिलेल्या ह्या वैश्विक नियमानुसार, कुणी “आमच्या घराचा गुरुत्व मध्य काढून देतो” असं म्हणालं तर त्याला तो आमच्या घराचा गुरुत्व मध्य नक्कीच आमच्या बाबांच्या अवती भोवती मिळेल. त्याला कारण निव्वळ घरातला कर्तापुरुष आमचे बाबा होते म्हणून ते आमच्या घराचा गुरुत्व मध्य - असं इतकं साधं हे गणित नाहीये. त्याची कारणं खूप वेगळी आणि गमतीदार आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेंव्हा आमचे बाबा साधारण पणे सात आठ वर्षांचे असतील. त्यामुळे कळायला लागल्या पासून 'स्वतंत्र'पणे जगण्याचा घटनादत्त अधिकार त्यांना भारतीय संविधानानेच बहाल केला होता. कारण 'रमेश' जसा मोठा ( मोठा म्हणजे किती , ते नक्की माहिती नाही, पण अंदाजे दहा बारा वर्षांचा ) झाला तसा आईने, म्हणजेच माझ्या आजीने , रमेशला पुण्याला पाठवून दिलं, बुधगावहून. शिकायला म्हणून. रमेश च्या मामांकडे. माझी आजी त्यावेळी बुधगावच्या मुलींच्या शाळेत शिक्षिका होती. ती मुलींना हिंदी शिकवायची. बुधगाव त्यावेळी संस्थान होतं. कारण भारत स्वतंत्र झाला तरीही बहुतेक संस्थानं अजून कशी बशी का असेना पण तरीही ‘जगत’ होती. संस्थानिकांच्या तनखाँ अजून बंद झाल्या नव्हत्या. त्या बंद केल्या बऱ्याच वर्षांनी पुढे इंदिरा गांधींनी. साठ किंवा सत्तरीच्या दशकात कधी तरी. शासकीय गंगाजळीवर त्या तनख्यांचा भार जास्त जाणवू लागला तसा. पण ते काहीही असलं, तरी माझी आजी पंडित नेहरूंची ज्याम फॅन. कारण त्यावेळी पंडित नेहरूंनी एक शासकीय योजना काढली होती. त्या योजने नुसार भारतातल्या काही ‘सिलेक्टेड’ प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना एक स्पेशल रेल्वे करून भारत दर्शन घडवून आणायचं असं त्या योजनेचं स्वरूप होतं. त्या स्कीम मधून माझी आजी जवळ जवळ सर्व भारत दर्शन करून आली होती. त्यामुळं माझी आजी नेहरू फॅन. खरं म्हणजे फॅन म्हणणं जरा जास्तचं उथळ पणाचं ठरेल. कारण आज आज्जी असती तर ती शंभरीची असती आणि नेहरू हयात असते तर ते एकशेतीस वर्षांचे असते. नेहरूंची धोरणं जरी मवाळ असली तरी, आजी त्या मवाळ धोरणांची अगदी कट्टर समर्थक होती, असं म्हणणं पॉलिटिकली जास्त करेक्ट ठरेल फॅन बिन शब्द वापरण्या पेक्षा.

पण गंमत अशी की, माझ्या आजीला दोन सक्खे भाऊ. म्हणजे माझ्या बाबांचे मामा. दोन असल्यामुळे एक थोरले मामा आणि दुसरे धाकटे मामा. त्यावेळी नाती बोलवायला सरळ सोपी होती. आणि माझी आजी त्या दोन भावांची एकुलती एक बहीण, त्यामुळे ती "अक्का ". मग ही आजी सगळ्यांचीच अक्का झाली. माझे बाबा आणि पुढे आम्ही सुद्धा तिला कधी आज्जी म्हणत नसू. सगळे घर तिला अक्काच म्हणत असे. पण तिढा असा होता की ह्या आमच्या कट्टर च्याच्या नेहरू समर्थक अक्काच्या ह्या दोन भावांपैकी एक भाऊ म्हणजे ‘धाकटे मामा’ कट्टर आर. एस. एस. वादी. खाकी आणि ढगळ हाप चड्डी वाले. आणि दुसरे म्हणजे थोरले मामा कट्टर काँग्रेस वादी. त्यामुळे फुल बाह्यांचा खादी आणि स्वच्छ पांढरा पायजमा हा त्यांचा पोशाख. हे थोरले मामा एकोणिसशे बेचाळीसच्या 'चलेजाव' चळवळीत इंग्रजांच्या तावडीत पकडले गेले आणि मग त्यांच्या वर खटला भरला गेला. त्यांनी बरेच वर्षं कारावासही भोगला. पुढे देश स्वतंत्र झाल्यावर थोरल्या मामांना (त्यांचं मूळ नावं कै. लालजी उपाध्ये) 'स्वातंत्र्य सैनिक'म्हणून सेंट्रल गव्हर्मेंट ची चांगल्या पैकी पेन्शन होती तहहयात. दरमहा येणाऱ्या पेन्शन मधून ते बरीचशी इंग्रजी आणि काही मराठी पुस्तकं विकत घेत आणी वाचून काढत. ती वाचून झाली की मग त्यांच्या भाच्यांना देत वाचायला. म्हणजे काकांना आणि माझ्या बाबांना.

जेंव्हा बाबा बुधगावहुन शिकायला म्हणून पुण्याला त्यांच्या मामांकडे आले तेंव्हा ते नक्की 'आर. एस. एस.' वादी मामांच्याकडे राहायला आले की 'गांधी वादी' मामांच्याकडे हे मी बाबांना कधी विचारलं नाही. पण बहुदा थोरल्या मामांकडेच गेले असावेत राहायला. कारण त्यांच्यावर संस्कार बरेचसे ह्या मोठ्या मामांचेच आहेत. पण त्यांचे दोन्ही मामा त्यांच्याशी वागायला अगदी जालियन वाला बागेतील हत्याकांड ज्या गोऱ्या जनरल डायर नावाच्या अधिकाऱ्यानं केलं त्या जनरल डायर पेक्षाही कडक होते, असं बाबा आम्हाला कधी कधी जुन्या आठवणी सांगू लागले की सांगतात. (आमच्या बाबांचा गोष्टी वेल्हाळपणा हा अगदी आवर्जून उल्लेख व्हावा अश्या त्यांच्या अनेक स्वभाव वैशिष्ट्यांपैकी एक). आमची आजी सुद्धा त्या जनरल डायर ची सक्खी बहीण शोभली असती अशीच कडक होती. त्यावेळी ह्या बाबांच्या आईकडे आणि मामांकडे बंदुका नव्हत्या म्हणून बरं होतं. नाहीतर वेगळंच जालियन वालाबाग कांड घरात घडलं असतं इकडं घरात. पण झालं असं की घरातल्यांच्या ह्या अतिरेकी कडक पणाचा बाबांच्या मनावर उलट परिणाम झाला. बाबा जरा बंडखोर झाले. त्याला आणखी एक पार्श्वभूमी होती. माझे आजोबा म्हणजे बाबांचे बाबा, त्याकाळी भिक्षुकी करत. त्यामुळं घरी व्रतवैकल्याचा जोर. वातावरण तसं तंग. मी बाबांच्या वडिलांना म्हणजे बापूंना पाहिलं नाही (सगळे त्यांना बापू असं संबोधत, पण ते विचारसरणीनं 'बापू' म्हणजे गांधी वादी अजिबात नसावेत). पण जे काही त्यांच्या बद्दल ऐकलं त्यानुसार अत्यंत स्वैर वृत्तीचा आणि मनस्वी आयुष्य जगलेला हा एक बुद्धिमान माणूस असं माझ्या मनानं त्यांच्या बद्दलचं व्यक्तीचित्र आतल्या आत कुठेतरी रेखाटलं आहे. ते उत्तम ज्योतिष सांगत. पत्रिका उत्तम कळे त्यांना. आणि भिक्षुकाचा व्यवसाय असल्या मुळं, पाठांतर आणि स्मरण शक्ती अगाध. मुख्य म्हणजे व्यक्ती अत्यंत मिस्कील होती. हा मिस्कील पणा पुढे जसाच्या तसा किंबहुना अंमळ जास्तच खट्याळ आणि रसाळ होत बाबांच्या स्वभावात उतरला. पण ह्या व्रत वैकल्याच्या अतिरेकामुळं असेल कदाचित, इकडे आर. एस. एस. आणि काँग्रेस दोन्ही पंथ घरी असून सुद्धा बाबा थोडे विवेकवादी विचार सरणी चे घडू लागले. म्हणजे ह्या सगळ्या विचारांच्या गर्दीत ‘सावरकरवाद’ त्यांना जास्त भावला. आर. एस. एस. च्या लोकांनी सांगितलेला हिदुत्व वाद आणि सावरकरांना अभिप्रेत असलेला हिदुत्ववाद ह्या दोन्ही विचार प्रवाहांच्या मधोमध जाणारी एक सुस्पष्ट आणि 'न' दुर्लक्ष करता येण्या जोगी अशी एक सीमारेषा आहे. बाबा त्या सीमारेषेच्या अलीकडे म्हणजे 'रॅशनॅलिस्ट' विचारासणीचे बनत गेले, ह्या सगळ्या घरातल्या वैचारिक गदारोळात. त्यामुळे आधी सावरकर, पुढे डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. श्याम मानव , डॉ. श्रिराम लागू, डॉ. अब्राहम कोवूर ह्यांची सर्व सामान्यांच्या बुद्धीला चक्रावून टाकणारी भाषणं, लेख आणि शिकवण त्यांना आयुष्यभर आकर्षित करत राहिली.

बाबा आमचे पेशाने डेअरी टेकनॉलॉजिस्ट. मुंबईमध्ये गोरेगावला “आरे मिल्क स्कीम” मध्ये त्यांनी डेअरी टेकनॉलॉजि चे धडे गिरवले. त्यावेळी ह्या कोर्स ची फी सुद्धा बरीच असावी. पण त्यांचा पहिल्या दोन वर्षांचा शिक्षणाचा खर्च आमच्या काकांनी केला. कारण काका तेंव्हा पुण्यात ऍम्यूनिशन फॅक्टरी मध्ये नोकरीला लागले होते आणि त्यांची नोकरीसुद्धा पाचेक वर्षं झाली होती. तिसऱ्या वर्षी मात्र बाबांना स्टायपेंड मिळायला सुरुवात झाली. तो एवढा असायचा की बाबा स्वत:चा खर्च भागवून उरलेला घरी पाठवत. त्यावेळी महाराष्ट्र शासनाचा न्यूझीलंड च्या सरकार बरोबर एक करार झाला होता. त्या करारात त्यावेळी अडीच कोटी रुपयांची तरतूद करून शासनाने एक अद्ययावत अशी डेअरी आणि विद्यार्थ्यांना राहायला तितकंच अद्ययावत असं 'न्यूझीलंड हॉस्टेल' बांधलं होतं. अख्या महाराष्ट्रातून कुठून कुठून विद्यार्थी आले. अडुसष्टचि बॅच असावी बहुदा. बाबांच्या ह्या 'न्यूझीलंड हॉस्टेल' मधल्या आणि आरे डेअरीतल्या आठवणी अत्यंत जिवंत आणि मन रमवणाऱ्या अश्या आहेत. कारण शिकत असताना, त्यांना तिथे आरेकॉलनी मध्ये हिंदी सिनेमाच्या शुटिंग्स आणि त्यावेळच्या नट नट्या नां पाहण्याची नामी संधी मिळायची. बाबांना सगळ्यात आवडता अभिनेता गुरुदत्त. गुरुदत्त नंतर मग आवडत्या नटांची यादी बरीच मोठी आहे. त्यात , बलराज साहनी पासून के. एन. सिंग, दिलीप कुमार, अमोल पालेकर वगैरे समकालीन अभिनेते आणि दिग्दर्शकांच्यात जब्बार पटेल, सत्यजित रे, बासू चॅटर्जी अशी यादी बरीच मोठी...

पण बाबा ह्या आरे कॉलनी मधल्या दिवसानंतर खरे रमले ते पुस्तकांच्यात. 'पेरी मॅसन' पासून ते 'आंतोन चेकॉव्ह' पर्यंत आणि ‘जयवंत दळवीं’ पासून ते ‘नारायण धारपां’ किंवा 'रत्नाकर मतकरीं' पर्यंत त्यांनी किती लेखकांची पुस्तकं संपवली ह्याचा काही हिशेबच नाही. आरे कॉलनीतलं विधिवत शिक्षण संपल्यावर, सरकारी नोकरीत लागले. त्यामुळं बदल्या झाल्या की नवीन गांव गाठायचं आणि राहत्या घराची आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या कनेक्शनची एकदा का सोय झाली की पहिलं आणि महत्वाचं काम म्हणजे नवीन गावातली, सगळ्यात जुनी आणि मोठी लायब्ररी शोधून काढायची. मग त्या लायब्ररीची कमीत कमी ‘एक’ आणि जास्तीत जास्त ‘तीन’ वर्षांची मेंबरशिप ची फी भरत त्या लायब्ररीतील जेव्हढ्या शक्य असेल तेव्हड्या पुस्तकांचा फडशा पडायचा.

लायब्ररीचे लाईफ मेंबर न होता ती मेंबरशिप केवळ तीन वर्षांसाठीच एव्हड्या करीता घ्यायची कारण तीन वर्षांनी परत बदली होऊन नवीन गांव आणि नविन लायब्ररी शोधावी लागणार हे त्यांना मनोमन माहिती असायचं. दर तीन वर्षांनी बदली होणार हे विधिलिखित. त्यांनी उभ्या आयुष्यात किती गावं बदलली आणि किती घरात संसार थाटला ह्याचा हिशेब काढायला गेलं तर, तोच एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल. एकीकडे गांधी वादी विचार सरणी दुसरी कडे 'संघाचे मामा' आणि भाऊ, आणि तिसरी कडे सावरकर अश्या वैचारिक त्रिकोणात वाढलेल्या आमच्या बाबांना त्यांच्या तत्वांना मुरड घालणं कधी माहितीच नाही. त्या तत्वांचा त्यांनी आयुष्यात बाऊ कधी केला नाही, पण त्या तत्वांशी त्यांनी आयुष्यात जरा कधी कणभरसुद्धा फारकत घेतली नाही. पण ह्या त्यांच्या तत्वनिष्ठेमुळं त्यांना आयुष्यात आणि विशेषतः नोकरीत मात्र खूप सहन करावं लागलं. पण एवढा त्रास सहन करूनसुद्धा त्यांच्या तत्वांच्या सत्यासत्ये विषयी त्यांना जराही कुठे शंका नव्हती. सोनं कसं चामड्या वरती घासून आणि आगीत सुलाखून घेतात तशी त्यांची आयुष्यातली आणि सरकारी नोकरीतील तत्वं आणि मूल्यं त्यांनी घासून आणि तावून सुलाखून घेतली होती. ह्या त्यांच्या तत्वनिष्ठे मुळंच दर दोन किंवा अडीच तीन वर्षांनी किंवा त्या आधीच बदली होणार, ही त्यांची काळ्या दगडावरची पांढरी रेघ. तीन वर्षं एके ठिकाणी मिळाली पोस्टिंग तर मग "पर्वणी"च

बाबांचा पेशा दुधाचा. पण दूध बाहेरून जितकं पांढरं शुभ्र दिसतं तितका तो धंदा दुर्दैवानं स्वच्छ मुळीच नाही. दूध म्हंटलं की भेसळ आली. दूध म्हंटलं की राजकारण आलं. दूध म्हंटलं की प्रचंड टाइम प्रेशर आलं. कारण दुधाला नासण्याचा शाप असतो. गंमत अशी आहे की इकॉनॉमिक्स मधले डिमांड आणि सप्लाय चे सगळे नियम दुधाला जसेच्या तसे लागू होतीलच असं नाही. उलट ते गैरलागूच जास्त होतात. कारण मुंबई पुण्यातल्या ग्राहकांची मागणी वाढेल तशी ती दुभती जनावरं, काही त्यांचा त्या अर्भकांसाठी आणि वासरांसाठी फुटलेला पान्हा कमी जास्त करत नाहीत. तो कमी जास्त होतो ते निसर्गानं घालून दिलेल्या नियमांनुसार आणि ऋतू प्रमाणे. म्हणजे अगदी डेअरी टेकनॉलॉजिच्याच च्या भाषेतच बोलायचं झालं तर उन्हाळ्यात आपण रोज नाही पण आठवड्यातून दोन तीनदा तरी आईस्क्रीम खातो, त्यामुळे शहरातील दुधाची मागणी प्रचंड वाढते. पण नेमका उन्हाळ्यातच चारा कमी असतो आणि इतर बऱ्याच कारणांमुळं खेडोपाड्यात होतं असलेलं दुधाचं संकलन (procurement) खूप कमी होत असतं. त्यामुळे उन्हाळ्यात दूध गोळा करण्याचं म्हणजे ‘दूध संकलनाचं’ प्रेशर आणि हिवाळ्यात बरोब्बर एकशेऐंशी औंष विरुद्ध अवस्था. कारण हिवाळ्यात डेअरी मध्ये खूप दूध येत असतं. खूप दूध ह्याचा अर्थ 'एक ते दीड लाख लिटर' दूध "रोज"! आमचे बाबा ह्या असल्या अजस्त्र डेअऱ्यांमध्ये वेगवेगळ्या जवाबदाऱ्या पाहत. दुधाचं प्रचंड प्रेशर असतं ह्या डेअरी वाल्या मंडळींच्या वरती आयुष्य भर. कारण एकतर ३६ तासांच्या वर ते टिकत नाही. टिकवायचं तर त्याच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या मशिनरी ची तेवढी कॅपॅसिटी नसते. मग त्या दुधाची पावडर करून ती साठवावी लागते. किंवा ते अमृता सारखं दूध नासून वाया जाऊ नये आणि त्या गवळी आणि गवळणींनी केलेल्या काबाड कष्टाचं ‘चीज’ व्हावं म्हणून त्या अतिरिक्त दुधाचं ‘चीज’ किंवा टेबल बटर करावं लागतं. पण हे सर्व अगदी फटाफट निर्णय घेऊन करावं लागतं, कारण आजच्या दुधाची योग्य ती विल्हेवाट ( खरं तर हा शब्दप्रयोग चुकीचा आहे, पण इलाज नाही ) नाही लावली तर , तर उद्या परत येणारं एक लाख लिटर दूध कुठं ठेवायचं आणि त्याचं पास्चरायझेशन कसं करायचं असे सगळे प्रश्न आ वासून उभे असायचे.

अश्या कित्येक अडचणींच्या आणि तणावाच्या काळात मी कित्येक वेळेला बाबांना रात्र रात्र स्वतः डॉक वरती उभं राहून शो मॅनेज करताना पाहिलंय. त्यात भरीस भर म्हणून ट्रान्सपोर्टर्स चे स्ट्राईक्स, पूर्वी पाच पाच तास विजेचं जाणं. विज जाणं ही तर बाबांच्या पाचवीला पुजलेली डोकेदुखी असायची. कारण वीज गेली की रेफ्रीजरेशन प्लॅन्ट बंद पडायचा आणि उन्हाळ्यात जास्त टिकावं म्हणून ४ ते ५ अंश सेल्सियस इतकं थंड गार करून साठवलेलं लाखो लिटर दूध नासायची शक्यता असायची. इतकं पुरायचं नाही म्हणून की काय वर त्यात आणि सोसायट्यांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांची किरकोळ आंदोलनं अशी डोकेदुखी असायचीच. पुढाऱ्यांच्या छळाला तर काही सीमाच नसायची. नियम बाह्य कामांसाठी आधी लाच घेऊन अधिकारी बधतोय का ते पाहायचं. आणि लाचेचा इलाज अधिकाऱ्याच्या पचनी पडत नाही असं कळल्यावर ‘आमची ‘सार्वजनिक’ (नियम बाह्य) कामं झाली तर ठीक आहे नाही तर “बदली होईल साहेब तुमची” अश्या धमक्या. गंमत म्हणजे ह्या धमक्या कधीच पोकळ ठरत नसंत. कधी पुण्या किंवा मुंबईतल्या कमिश्नर ऑफिस कडून तर कधी त्याहून वरती मंत्रालयात कुणातरी वस्त्रोद्योग, दुग्ध आणि सहकार मंत्र्याच्या सचिवाची ओळख काढून, दबाव देत आणलेल्या बदलीच्या ऑर्डर्स त्यांच्या वाट पाहत असायच्या टेबलवरती. हे सगळं असं जगले ‘अस्थिर’नोकरीतलं जीवन आमचे बाबा! कारण ज्याप्रमाणे आयुष्य भर शरीरावर दुःखणारं पण घनघोर युद्धात हृदय आणि शिराचं संरक्षण करणारं असं कवच कुंडलांचं वरदान कर्णाला मिळालं होतं, तसंच प्रामाणिकपणाचं त्या कवच कुंडलांसारखं एक अमोघ असं वरदान होतं आमच्या बाबांना मिळालेलं, असं आता कधी कधी वाटतं. त्या कवच कुंडलांचा त्यांना त्रासही झाला आणि त्याच कवचकुंडलांनी त्यांचं संरक्षणही केलं. फक्त फरक हा की कर्णाला ती कवच कुंडलं एकदा कायमची दान करावी लागली, आमच्या बाबांना मात्र ती प्रामाणिकपणा आणि सत्या ची कवचकुंडलं चिरंजीवत्वे मिळाली होती.

पण ह्या दुधाच्या पेशानं जसा बाबांना त्रास झाला तसेच काही दुर्मिळ क्षण सुद्धा दिले. ह्या बाबांच्या दुधाच्या पेशाने आम्हाला डेअरी क्वार्टर्स मध्ये खूप सुंदर जिव्हाळ्याचे मित्र भेटले. त्यात आता आमच्यात नसलेले अशोक काळे ह्यांच्या सारखे अत्यंत दर्दी नाट्य प्रेमी भेटले. त्यात आमच्या बाबांनी आणि काळे काकांनी कामगार कल्याण स्पर्धामधून "तुझं आहे तुज पाशी" सारखी नाटकं बसवत, अगदी राज्य स्तरीय बक्षिसं पटकावली. मुख्यं म्हणजे आमच्या घरी दूध उतू खूप गेलं पण नासलं मात्र एकदाही नाही, कारण घरी पहाटे दूध घालणारा गवळी सुद्धा अगदी आईच्या धाकात असायचा. जराही कुठं त्यानं कुचराई केली तरी त्याचा महिन्याचा हिशेब चुकता व्हायचा. आम्ही शाळकरी असताना उनाडक्या करत डेअरीत जायचो. तिथे बऱ्याच टेकनिकल गोष्टी शिकलो. पुढे पुढे तर माझा मोठा भाऊ, दुधाचं फॅट लावायला सुद्धा शिकला होता. आणि त्यांनी लावलेलं फॅट अगदी तंतोतंत बरोबर असायचं. दुधाचं फॅट लावणे म्हणजे काही मि.लि. दुधाची हैड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर प्रक्रिया करून त्या दुधात किती फॅट आहे त्याची नोंद करतात ती टेस्ट. त्या टेस्ट ला खूप महत्व आहे. कारण डेअरीला दूध विकणाऱ्या कॉ-ऑपेराटीव्ह सोसायट्यांना, त्या डेअरीला विकलेल्या दुधाचा दर त्या फॅट च्या प्रमाणात मिळतो. त्यामुळे त्या फॅटचं रिडींग घेताना अगदी दुसऱ्या अपूर्णांका पर्यंत भांडणं होत, दूध विक्रेत्यांची डेअरी वाल्यांबरोबर. पुढे इंजिनिअरिंग ला अभ्यासाला असणारा रेफ्रीजरेशन हा क्लिष्ट विषय मी आणि माझ्या मोठ्या भावानं अगदी डाव्या हातानं सोडवला, कारण डेअरीतले मोठं मोठे रेफ्रिजरेशन प्लॅन्ट म्हणजे आम्हाला 'गवयाच्या पोराला तानपुरा जितका सहज उपलद्ध असतो' तितका सहज उपलब्ध होता लहानपणापासून पाहायला. एकदा तर चितळे डेअरीचे खुद्द नानासाहेब चितळे आमच्या घरी येऊन चक्क आमच्या आईच्या हातचे कांदे पोहे खाऊन आणि चहा पिऊन गेले. ज्या दिवशी नानासाहेब चितळे घरी येऊन गेले त्या दिवशी गोरा कुंभाराच्या घरी स्वतः विठ्ठल भेटायला आला तर जितका आनंद त्या संताच्या पत्नीला झाला असता, तितकाच आनंद माझ्या आईला झाला.

पण हे सर्व जरी खरं असलं तरी, एका गावात अडीच वर्षं पूर्ण झाली, की आई ला घरी सतत चिंतेनं ग्रासलेलं असायचं. नवीन गांव. तिथली आमची शाळा. तिथलं वातावरण. अगदी प्यायचं पाणी. जवळचे मुलांचे डॉक्टर. नवीन कामाच्या ठिकाणी 'ह्यांना' भेटणारी वरिष्ठ माणसं कशी असतील. तिथले स्थानिक पुढारी कोण? आणि कसे? असतील. सगळ्या गोष्टींची तिला चिंता लागून राही. आणि मग एक दिवस बाबा त्यांच्या बदलीची ऑर्डर हातात घेऊन, आयुष्याचा पुढचा शेर कुठं लिहिला आहे ते तिला सांगत. ती लगेच मग पटकन स्वयंपाक घरात जाऊन तेल, पीठ, मीठ किती शिल्लक आहे ते पाही. फार जास्त असून चालायचं नाही, कारण ते शिफ्टिंग मध्ये हेंदकाळून सांडायची तिला भीती असे आणि मग बांधाबांध केलेले चांगले कपडे वगैरे खराब होत. कारण शिफ्टिंगला लोक असले तरी त्या त्यांच्या घिसाड घाई मध्ये घरातल्या सामानाची फार दुरापास्त होत असे. आणि ते तेल मीठ फार कमी असून चालायचं नाही, कारण नवीन गावी शिफ्टिंग झाल्यावर किराणा आणण्यासाठी थोडे अजून दिवस लागायचे. गाव, जाग, दुकानं वगैरेची माहिती होऊस्तोवर.

मग शेवटी तो निघण्याचा दिवस यायचा. आणि आई अत्यंत जड मनाने देवघरातले एकेक देव एका सोवळ्याच्या कापडात बांधायची आणि पोळ्यांच्या डब्यात घट्ट झाकण लावून तो डबा प्रवासात तिच्या जवळ ठेवायची सतत. घराला शेवटचं कुलूप लावण्या आधी स्वच्छ केर काढायची. तिन्ही चारही खोल्यामंधून. आणि तो केर एका कागदाच्या पुडीत बांधून जाताना कच-यात टाकायची. पण तत्पूर्वी वाकून उंबऱ्याला नमस्कार करून त्या वास्तूचे मनोमन ऋण मानायची. त्या वास्तूनं अडीच तीन वर्षं तिचं आणि तिच्या पिल्लांचं ऊन पाऊस आणि थंडी वाऱ्या पासून संरक्षण केलं म्हणून. किल्ली शेजारी ठेवायची आणि मग शेजारच्या काकूंना बंद घराची किल्ली देताना मात्र तिचा बांध फुटायचा. तीन वर्षांत कित्येक वेळेला तिनं ह्या शेजारच्या काकूंना कडीपत्ता कोथींबीर मागितली असायची. किंवा घरी काही गोड धोड झालं की तिच्या लेकरां साठी म्हणून वाटी भरून मला सांगायची, जरा शेजारी 'विनू च्या आई ला देऊन ये रे' म्हणून. आणि मग आई आणि शेजारणी एकमेकांना घट्ट मिठी मारून शेवटची भेट घ्यायच्या. कारण आता ती विनू च्या आईला परत कधीच भेटणार नसायची. कधी कधी म्हणायची ह्या बदल्यामुळं मला कुठलंच घर आपलं असं कधी वाटलंच नाही. आणि बाबांच्या प्रत्येक बदली नं दुर्दैवानं तिचं माहेरसुध्दा दूर दूर होत जायचं अंतरानं. पण आई हे सगळं निमूट पणे सहन करायची. तिनं ह्या सगळ्या गोष्टींकडे 'भोग' म्हणून कधीच पाहिलं नाही उलट ह्या सगळ्या गोष्टी तिनं धर्म म्हणून पाळल्या. आमच्या बाबांचं हे तत्व निष्टेचं व्रत खरं आई ने अश्या रीतीनं पूर्ण केलं. पण इतके सगळे त्रास सोसले पण आई नं बाबांना दोष मात्र कधी दिला नाही. खरं तर आईन दोष देणं दूरचं , उलट त्यांच्या नोकरीच्या कठीण काळात ती त्यांच्या पाठीशी इतकी खंबीर पणे उभी राहायची की एखाद्या उंच हिमालयातल्या गिरिशिखरावरच्या खडकाला आच्छादणारा बर्फ कसा खडतर थंडीमध्ये त्या खडकालाच चिकटून त्याच्याशी एकसंध होत उभा असतो, तसं सहजीवन माझ्या आई आणि बाबाचं होतं त्या दिवसांपासून आजता गायत.

परवा एक डिसेंबर ला माझ्या बाबांचा पंचाहत्तरावा वाढदिवस झाला. बाबांच्या जुन्या स्वभावाप्रमाणे त्यांनी कुणालाही 'कोणताही कार्यक्रम करायचा नाही' अशी ताकीद देतच फोन वर शुभेच्छा स्वीकारल्या. मी नेमका त्यावेळी टूरवर दिल्ली च्या पुढे हरियाणात गेलो होतो. फोन वरच बाबांना शुभेच्छा दिल्या. त्यांना आम्ही नोकरीत आमची इमाने इतबारे कामं आम्ही करतोय ह्या हुन दुसरं सुख नाही. कारण आयुष्य भर अगदी चोख आणि प्रामाणिक पणे नोकरी सरकारी, सहकारी आणि खाजगी अश्या तीनही संस्थां मध्ये नोकरी केलेल्या आमच्या बाबांना, आम्ही कधी शाळेला किंवा कॉलेजला आणि पुढे नोकरीत सुट्टी घेऊन मौज मजा वगैरे केल्याचं कधीच आवडतं नाही. अजूनही कधी 'पुढच्या महिन्यात दोन दिवस सुट्टी काढलीय’ असं सांगितलं की चटकन - " तू नसताना 'काम' थांबणार नाही नं तुझ्या ऑफिसातलं? बॉस ला आणि क्लाएन्टला माहिती आहे का तुझ्या माहिती आहे का तू दोन दिवस नाही आहेस ते, आणि त्या रजेच्या दिवसातलं काम दोन दिवस कुणाला हँडऑफ कारणारेस काम ते नीट सांगून ये सगळयांना?" असं जरबेनं बोलून जातात. पण इतर वेळेस त्यांच्या सारखा मायाळू माणूस नाही. बदली झाल्यावर त्यांचे कित्येक सबॉर्डिनेट्सना अक्षरश: त्यांच्या ऑफिसातल्या शेवटच्या दिवशी "सेंडऑफच्या सोहोळ्या नंतर, त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवून ढसा ढसा रडताना मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यांना त्यांचे वाढदिवस वगैरे साजरे केलेलं फारसं आवडत नाही. खरं तर अजिबातच नाही. तरीसुद्धा धीर करून माझी बायको आणि सात वर्षांची लेक संध्याकाळी छोटासा केक घेऊन गेलीच आई बाबांच्या कडे आंबेगावला. अगदी अचानक त्यांना न कळवता. आणि मग “आsबा आsबा” करत चिमुरड्या आर्यानं त्यांच्याच मांडीवर बसून त्यांच्या वाढदिवसाचा केक स्वतःच कापत त्यांचा वाढदिवस साजरा केला. आणि मग दोघांनी एकमेकांना केक भरवत तो अभूतपूर्व अश्या रीत्या साजरा केला. सोहोळ्याला फक्त चौघेच. माझे बाबा, माझी आई, माझी बायको आणि माझ्या बाबांची लाडकी नांत. आणि वेदानी, म्हणजे माझ्या सौ. नी मला तिकडे दिल्ली ला तिच्या मोबाईलवरून ह्या सोहोळ्याचे फोटो व्हाट्सअँप केले.

खरं तर बाबा अत्यंत अल्पसंतुष्टी, कमीत कमी गरजा बाळगत सुखी समाधानी असं आयुष्य जगणारे. उमेदवारीच्या काळात शिफ्ट सुपरवायजर म्हणून लागून हळू हळू पदोन्नत्या घेत शेवटी महाराष्ट्र शासनाचे क्लास वन गॅझेटेड ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झाले. पण त्यांनी त्यांची पदं वाढली तरी त्यांच्या गरजा मात्र कधीच वाढू दिल्या नाहीत. जीवनातल्या गरजा नाममात्र ठेवल्यामुळेच असेल की काय कुणासठाऊक, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच समाधानी आणि प्रसन्न असं सर्वांना हवंहवंस वाटणारं हास्य असतं. पण त्या दिवशी वेदा नं मला मोबाईलवर पाठवलेल्या त्या फोटोत मी बाबांना जितके हसरे आणि समाधानी पाहिलं तितकं अनोखं समाधान मी त्यांच्या चेहऱ्यावर गेल्या चाळीस वर्षात अगदी माझ्या लहान पणा पासूनही कधीच पाहिलं नाही. स्वतः उत्सव मूर्ती होण्यास कायमच विरोध करणाऱ्या आणि समारंभांना कधीच मनापासून तयार नसणाऱ्या आमच्या बाबांचा वाढदिवस त्यांच्या नातीनं असा साजरा केला ह्या अश्या योगायोगांना नक्की काय म्हणावे सुचत नाही. कदाचित बाबांच्या आयुष्यातला तो एक "दुग्ध” शर्करा योग असावा !

चारुदत्त रामतीर्थकर.
१३ डिसेंबर २०१८, पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख छान आहे. तुमच्या वडलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जालियन वाला बागेतील हत्याकांड ज्या गोऱ्या 'रँड' नावाच्या अधिकाऱ्यानं केलं>>> हे जनरल डायर होते ना?

सर्वप्रथम गुरुत्वमध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
विनोदी ललिताचं इतिहासात छान रुपांतर करत दुधाची सर्व माहिती दिलीत.
फारच छान झालाय लेख.

प्रतिसादा बद्दल धन्यवाद. शुम्पी जी , हो बरोबर, जनरल डायर, रँड नव्हे. आता दुरुस्ती केलीय वर लेखात.

हा लेख म्हणजे तुम्ही वडीलांना दिलेली लाखमोलाची वाढदिवसाची भेट ठरेल !

आरे कॉलनीच्या सी. ई. ओ. च्या बंगल्यात रहाण्याची संधी मला लहानपणी मिळाली होती. त्यामुळे तुम्ही केलेले वर्णन वाचून सारे डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहिले.

फारच छान झालाय लेख.>+११
मनापासुन लिहिल्यामुळे मनापासुन आवडला...तुमच्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सुरेख...

अतीशय सुंदर लेख !! तुम्ही छानच आणी अकृत्रीम लिहीता. तुमच्या ती. बाबांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. आणी त्यांच्या कामाची माहिती पण छान लिहीलीत. धन्यवाद!!

खूप आवडला लेख !
आजोबा व नातिचा फोटो टाका शक्य असल्यास.
तुमच्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लेख आवडल्याच्या प्रतिक्रियां बद्दल सर्वांचे धन्यवाद.

पशुपत जी , खूप छान परिसर आहे अजूनही हा आरे डेअरीचा. चाळीस वर्षांपूर्वी तर काय अप्रतिम असेल हा परिसर कल्पनाच करवत नाही.

सुरेख लिहिलतं. बाबांना शुभेच्छा खुप सार्‍या.
न बघता त्या फोटोतला सुखी, अभिमानाने झळकणारा चेहरा समोर आला. माझ्या वडिलांचा चेहरा जसा दिसतो तसाचं . Happy
फोटो नका शेअर करू अस मला वाटत. काही क्षण इतके स्वतःपुरते असतात ते तसेच ठेवावेत. पण हे माझ मत.

मस्त लिहिलंय
त्या काळात इतकं ग्लॅम वर्क प्रोफाइल, त्याबरोबर येणाऱ्या रिस्क सर्व चोख उतरलंय.