शिशिर

Submitted by दत्तात्रय साळुंके on 11 December, 2018 - 09:02

शिशिर

थरथरले ते झाड शिशिर लहर येता
पानांना हुडहुडी भरे पाहता पाहता
शाल हिरवी अंगावरची गळाली झणी
रानोमाळ पाचोळा आळवितो विराणी

जीव आखडता फांदीचा झाडही थिजले
डोळे मिटूनी निराधार ते, होते निजले
गनिमी कावा ऋतूचक्राशी झाड खेळले
प्रतिकुलतेत माघारी कधी घ्यावी पाऊले

चाहूल वसंताची एके दिवशी त्या लागली
एकवटून बळ, गलितगात्र फांदी हुंकारली
तांबूस हिरव्या तजेल्यात तरु तनु नाहली
फुटता कंठ प्राक्तने तान कोकीळ घेतली

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

'चाहूल वसंताची एके दिवशी त्या लागली
एकवटून बळ, शुष्क काटकी ती हुंकारली
तांबूस हिरव्या तजेल्यात तरु तनु नाहली'
या पंक्ती मी खूप जवळून न्याहळल्या आहेत, आमच्या कुंडीतले गुलाबाची वाळलेली कांडीला काय पालवी फुटली होती!!!!! अक्षरशः बय्राच बघेकरांनी 'दे टाकून---' असा सल्ला दिला होता,मी पाणी घालू लागले की!!!!