विश्वासघात

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

१९८५/६ चं गिरगाव. अगदी पुलंनी असामी असामीत रंगवल्यासारखं. मे महिन्यातल्या पायरी ।़।़ हापूस पासून ते शहाडे आणि आठवले पर्यंत जसं पुलंनी सांगितलं तसंच. या गिरगावात गोऱ्या रामाच्या मंदिरासमोरच्या गंगाराम खत्री वाडीत मी रहात असे. गोऱ्या रामाच्या समोरच्या पदपथावर नवरोजी शेठ स्ट्रीट आणि भाई जीवनजी लेन या दोन वाड्यांमध्ये एक छोटसं खोपटीवजा दुकान होतं. या दुकानात पेनं, पेन्सिली, गोळ्या, पतंग, च्युईंग गम असं मुलोपयागी सामान मिळत असे. या दुकानाला अगदी छोटं असल्याने नावाचा फलक वगैरे नव्हता. म्हणून आम्ही या दुकानाला त्याच्या मालकाच्या नावावरनं आम्ही "महेशचं दुकान" म्हणत असू. शाळेत - चिकित्सकमध्ये - जाण्यायेण्याच्या रस्त्यावरच हे दुकान असल्याने, दररोजच महेशच्या दुकानाशी थांबणं होत असे. कधी कॅमलची कंपासपेटी घेण्यासाठी तर कधी फुकटात पेन्सिली शार्पन करुन घेण्यासाठी.

महेश फार चांगला होता. दुपारी अाम्ही शाळेतून परत येत असताना त्याच्या दुकानावर थांबत असू तेव्हा त्याचं एवढंसं दुकान मुलांनी भरलेलं असे. चारी बाजूंनी मुलांचा मला गोळी, मला टोपण, मला पेन्सिल असा गलका चालू असे. पण या गलक्यात महेश बरोब्बर सगळ्या मुलांना हवंते त्याच्या गच्च भरलेल्या दुकानातल्या एकमेव कपाटातून काढून देत असे. त्या वेळचे बहूतेक दुकानदार मुलांवर खेकसंत असंत! परंतु मुलांशी गोड बोलत असल्याने महेश मुलांना अतिशय आवडत असे. बहुतेक सर्वच वस्तू त्याच्या दुकानात माफक किंमतीत मिळत असंत. आणि मुलंच ती - शेवटी काय फारसं खरेदी करणार ती शाळेतून येता जाताना? तीही ८५/६ च्या सुमारास? बहुतेक मुलांना काहीतरी क्षुल्लक जिन्नसंच हवे असंत. आठ आण्याची मेलडी म्हणजे डोक्यावरुन पाणी!

तर अशा या महेशच्या दुकानावर जात जात आम्ही मोठे झालो. भराभर वर्षं उलटत गेली. महेशच्या आजूबाजूला वेगवेळ्या प्रकारची दुकानं येऊन जाऊन झाली, पण महेशचं दुकान मात्र जसं होतं तसंच राहीलं. मुलांची तशीच गर्दी आणि त्यांच्याशी अतिशय संयमाने वागणारा महेश. हा हा म्हणता ९२ साली दहावी झालो. आता महेशच्या दुकानात फारसं जाणं होत नसे, परंतु भर गिरगाव रस्त्यावरचं हे दुकान नाही म्हटलं तरी टाळता येत नसे. आमच्या घरावरुन कुठेही महत्वाच्या ठिकाणी जायचं झालं तरी महेशच्या दुकानावरुनच जाणं भाग असे. आताशा या दुकानाशी काही तरुण मुलंही उभी असंत. महेशच्या दुकानाशेजारी एक कोल्ड्रींक हाऊस उघडलं होतं. भाई जीवनजी लेनच्या तोंडावर असलेल्या शिवसेना शाखेतली हे तरुण या कोल्ड्रींक हाऊस मध्ये बसून असंत. त्यांची आणि महेशची गट्टी होती. शाळेची गर्दीची वेळ संपली की महेश ह्या तरुणांबरोबर गप्पा मारत बसत असे. गर्दिच्या वेळी कधी कधी त्या कोल्ड्रींक हाऊसचा तरुण मालक महेशला मदतही करत असे.

६ डिसेंबर १९९२ - भारताच्या इतिहासातला काळा दिवस. हा हा म्हणता मुंबई पेटली. पुलंनी रंगवलेलं एरवी शांत असणारं गिरगावही तंग झालं. वाड्यावाड्यातनं गस्ती सुरु झाल्या. तसं गिरगावत फारसे मुसलमान नव्हतेच, पण भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड गिरगावापासून फार लांब नसल्याने शिवसैनिक तयारीतच होते. आमचं बाहेर जाणं आईवडीलांनी जवळ जवळ बंदच करुन टाकलेलं. रस्त्यावरही दुकानं बंद, सर्वत्र एक प्रकारचा तणाव होता. बसेसही तुरळकच चालू असंत. दररोज वर्तमान पत्रात रकानेच्या रकाने भरुन दंगलीचं वर्णन येत असे. ऐन तारुण्याचे दिवस. भिती वगैरे वाटण्याऐवजी नाक्यावर आई वडीलांना न सांगता जाऊन गटागटाने चर्चा करण्याचे दिवस. या गटांमध्ये काल फणसवाडीत एकाला कसा भोसकला, भेंडी बाजारात एका हिंदुला कसा मारला याच्या तपशीलवार चर्चा होत असंत. परंतु तुरळक प्रकार वगळता ज्याला दंगल म्हणता येईल असा हिंसाचार मात्र गिरगावात झाल्याचं माझ्या ऐकीवात नव्हतं.

हळूहळू परीस्थिती पूर्ववत व्हायला लागली. बाबा कामावर जायला लागले. मी ही एके दिवशी गिरगावचा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. नवरोजी शेठ गल्ली मागे गेल्यावर मात्र जे दृश्य बघितलं ते मला आजही लख्ख आठवतं. महेशचं खोपटं जमिनदोस्त झालं होतं. त्याच्या दुकानातला उरलेला सुरलेला माल रस्त्यावर पडला होता. त्याच्या दुकानातला एका दाढीवाल्या वृद्धाचा फोटो कुणीतरी पायाखाली तुडवलेला होता. कोल्ड्रींक हाऊसमधले तरुण गायब होते. कोल्ड्रींक हाऊसचा मालक खिन्नपणे बसला होता. पादचारी पदावरचे लोकं आपल्या घाईत महेशच्या दुकानातील पदपथावर विखुरलेल्या सामानाला ओलांडून जात होते. मी आश्चर्याने थक्क झालो. भर हिंदुवस्तीत महेशचं दुकान कोणी फोडलं असावं याचा विचार करायला लागलो. विचारातच घरी परतलो. वाडीतल्या एका मित्राला गाठून त्याला पाहीलेला प्रकार सांगितला. त्याला ही बाब आधीच कळली होती. त्यानेच मग मला सांगितलं - "महेश मुसलमान होता. महेश हे त्याचं टोपणनाव होतं". माझ्यावर जणू बँाबगोळाच पडला - तो मुसलमान होता म्हणून नाही, तर तो केवळ मुसलमान होता म्हणून काही आक्रस्ताळ्या तरुणांनी गिरगावातल्या समस्त शाळकरी मुलांचं आवडतं दुकान तोडलं होतं म्हणून. माझा विश्वासच बसेना. त्याने काय बिघडवलं होतं आमचं? केवळ त्याचा धर्म वेगळा म्हणून त्याचा असा विश्वासघात? तोही त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या तरुणांकडून? त्याच्या दुकानावरच पोसलेल्या तरुणांकडून?

४/५ महिने निघून गेले. महेशचं दुकान पुन्हा सुरु झालं होतं. पण त्या दुकानात आता महेश नव्हता. एक मध्यमवयीन बाई ते दुकान चालवत होत्या. मी त्या दुकानापाशी गेलो. पाहतोतर दुकानात महेशचा फोटा लावला होता. कुणीतरी सांगितलं, महेश दुकान फोडल्याचा धक्का बसून वारला. आता त्याची विधवा दुकान चालवते. मला आजही स्पष्ट आठवतं - मी ढसाढसा रडलो. गिरगावाने - ज्याला मी इतके वर्ष मराठी संस्कृतीचं मुंबईतील माहेरघर मानत आलो, वेडाच्या भरात एक कुंटूंबाला देशोधडीला लावलं होतं - आणि गुन्हा काय, तर त्याने भर हिंदुवस्तीत दुकान उघडलं आणि सचोटीने धंदा केला. माझा मानवतेवरचा विश्वासच जणू उडाला होता. ज्याला आम्ही महेश - एका हिंदु देवतेच्या नावाने हाक मारत असू -त्याला आम्ही मारला होता.

या घटनेला आता बरीच वर्षं उलटून गेली आहेत, पण आजही पेपरात हिंदु-मुस्लिम वाद भडकावणारी वक्तव्यं ऐकायला मिळाली की महेश आठवतो. मनाच्या कोपऱ्यात खोलवर कुठेतरी झालेल्या जखमेवरची खपली निघते आणि रक्त भळाभळा वहायला लागतं. महेशच्या बायकोने कदाचित गिरगावातल्या त्या तरुणांना माफ केलं असेलही, पण मी मात्र महेशच्या या विश्वासघातक्यांना कधीच माफ करु शकणार नाही.

विषय: 
प्रकार: 

पुराणिक छान लेख. पण लांडा हा शब्द त्यात वापरला नसता तर बरे झाले असते असे मला वाटते.

मंदार

मंदार, तो शब्द मी काढून टाकला आहे. मला तशी शंका होतीच.

Sad ....
=========================
नूतन वर्षाभिनंदन..

पुलंच्या एका लेखात त्यानी वूडहाउसचे एक वाक्य दिले आहे...
"I can't hate in plurals"
शक्य आहे का हे आपल्याला??

अतिशय परिणामकारक लेख/कथा...

वैभव,
खूपच छान कथा झाली आहे. अंतर्मुख व्हायला झाल. असच लिहीत रहा.
कल्पू

अकोल्याला आमच्या घरासमोर अण्णा राहायचा. बेकरी होती त्याची. बायकोमुलं तिकडे केरळात होती. गावी गेला की अख्ख्या गल्लीसाठी काहीतरी खाऊ घेऊन यायचा. अकोल्यातली सर्वोत्तम बेकरी होती त्याची. केक, बिस्कीटं असं सतत प्रत्येक घरी तो स्वतःहून पोचतं करीत असे.
७ डिसेंबरला त्याची बेकरी जाळली त्यादिवशी आम्हाला कळलं की अण्णा मुसलमान होता. गल्लीतल्याच काही लोकांनी त्याची बेकरी उद्ध्वस्त केली. त्याने बेकरी परत सुरू केली पण दुसरीकडे राहायला निघून गेला. आता बेकरीत गेलो की तो अजूनही पूर्वीसारखाच बोलतो, पण त्याच्या नजरेला नजर देऊन बोलण्याची माझी हिंमत अजूनही नाही.

दोन्ही बाजूच्या लोकांसाठी हे लागू - कुठचा धर्म असतो छोट्या बाळाचा?

किती क्षुद्र असतात माणसे? केवळ धर्मामुळे? शी!

मी याच विषयावरचा एक चांगला हिंदी चित्रपट अलिकडेच बघितला - नाव धर्म - दिग्दर्शन भावना तलवार यांचं आहे - http://movies.indiainfo.com/2007/06/08/dharm.html

छान लेख. अतिशय परिणामकारक. असे लेख, कथा वाचुन सम्वेदनशिल लोकतरि काहि बोध घेतिल तर धर्मान्धळ्या लोकान्च्या वाढत्या सन्ख्येला आळा बसेल.

बाप रे! काय भयानक आहे हे... शेवटी माती एकच आहे.

उत्क्रुष्ट लेख, कोणत्याही समाजाचा घाऊक द्वेष तेच करु शकतात जे अत्यंत आयसोलेटेड समाजात,एकाच प्रकारच्या घातकी प्रचार ऐकत लहानाचे मोठे होतात.तुमचा एक जरी मित्र मुस्लिम असेल तर 'सर्व मुस्लिमांना ठेचा' वगैरे वाक्य बोलताना दहादा विचार होईल.त्यामूळे 'प्ल्युरिस्टीक' समाजाची गरज आज पहिल्यापेक्षा कितितरि जास्त आहे.दुर्दैवाने आपण जास्त जास्त 'आयसोलेशन' कडेच चाललो आहोत.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

धर्माच्या नावाखाली अधर्म. माणुसकीला लांच्छन.

दुर्दैवाने आपण जास्त जास्त 'आयसोलेशन' कडेच चाललो आहोत >> अनुमोदन आगाऊ

आज निवडणुकांमधेपण इतर महत्त्वाच्या विषयांपेक्षा हाच विषय राजकरणी आणत आहेत..

खूप छान लेख.
इतका वेगळा विषय निवडल्याबद्दल धन्यवाद. Happy

वैभव,

खूप छान लेख आहे रे. असे अनुभव आपल्या आयुष्याला एक वेगळी दिशा देतात.
असेच लिहीत रहा.

गौरी भागवत.