जॉर्डन, इस्त्राइल प्रवास आणि गमतीजमती

Submitted by मोहना on 6 December, 2018 - 21:41

मे महिन्यात लेकाने म्हटलं,
"इस्राइलला जायचं का?"
"कशाला? मरायला?" मी भेदरून विचारलं. पुढची १० मिनिटं ऐकीव माहितीवर विधानं करायची नाहीत असं ऐकवण्यात आलं. मध्येच मी, मी तुझी आई आहे की तू माझा बाबा असं विचारून त्याला गोंधळवलं. पण गाडी पुन्हा मुद्द्यावर आणण्यात तो पटाईत. बसल्याबसल्या इस्राइलबद्दल इतकं ऐकलं की त्याला म्हटलं,
"आता कशाला जायला हवं तिकडे?" त्याने फोनच बंद केला. पण हुकुमाप्रमाणे मी ’चालायला आणि सायकल हाणायला’ सुरुवात केली. मे महिना ते सप्टेंबर रोज. ऑक्टोबर महिना थंडी, थंडी करत वाचवला. ८ दिवस होणारी तंगडतोड झेपायला हवी म्हणून प्रवासाच्या ६ महिने आधी दरवर्षी हे चक्र सुरू. करता करता १४ नोव्हेंबर येऊन ठेपला.

दिवस पहिला: वॉशिंग्टन डी. सी. ते इस्तांबूल थेट विमान होतं. पुढच्या २ तासाच्या विमानासाठी १० तास थांबणार होतो. त्यापेक्षा गाडीने पोचलो असतो या माझ्या वक्तव्यावर घरातल्यांनी फक्त नेत्रकटाक्ष टाकला. मुलगा म्हणाला,
"आई, आपल्याला दुसर्‍या गावाला नाही दुसर्‍या देशात पोचायचंय." तर काय झालं असं सवयीने येणारं वाक्य गिळलं आणि इस्तांबूल पालथं घातलं. फिरता फिरता प्रवासी कुठले ते ओळखून त्यांच्या भाषेत पुकारा करत खायला बोलावण्याची इथल्या माणसांची कुशलता अचंबित करत होती. नमस्ते, नमस्ते झालं तसं आम्हीही खूष होऊन आत शिरलोच. दर पाच मिनिटांनी आतून मातीचं छोटं भांडं, ठेवणी घेऊन कुणीतरी येत होतं. ज्वाळेवर वर - खाली करत हातातल्या हुंडीचं झाकण अलगद फोडून छोट्या मातीच्या भांड्यात शिजवलेली गरम गरम भाजी ताटात ओतत होते. आम्हीही तेच मागवलं. चविष्ट भाजी होती.

दिवस दुसरा: इस्तांबूलहून जॉर्डनला (अमान) पहाटे पोचलो. डोळ्यावरची झोप उडवली उबर चालकाने. रस्त्यावर शुकशुकाट असला तरी गाडी जबाबदारीने चालवतोय म्हणेपर्यंत चालवता, चालवता त्याने आपला फोन काढला, फोन मांडीवर ठेवून, त्यात डोकं खुपसून गाडी चालवायला लागला. ’रस्ता समोर आहे, डोकं वर कर’ हे ’गूगल’ करून त्याला सांगेपर्यंत तो दिवा हिरवा असतानाच थांबला. दुसर्‍या दिवशी आम्हालाच गाडी चालवायची होती. या देशात हिरव्यावर थांबायचं की काय अशा प्रश्नचिन्हांकित चेहर्‍याने एकमेकांकडे पाहत राहिलो. चालकाचा चेहरा वर होईपर्यंत दिवा हिरव्याचा पिवळा, लाल आणि परत हिरवा झाला. अचानक आमचा चालकही जागा झाला. सुटलाच मग तो. त्याने आम्हाला घरापाशी आणल्यावर आम्ही सुटलो. पैसे दिल्यावर सुटे पैसे काही त्याने परत केले नाहीत त्यामुळे एरवी सढळ हस्ते ’टिप’ देणार्‍या मुलाचं अमेरिकनत्व जागं झालं. आता मी नाही देणार त्याला आणखी पैसे असं छातीठोकपणे मराठीत त्याने जाहीर केलं. आपली भाषा दुसर्‍याला कळत नसली की पटकन परक्या देशात ’हुशार’ व्हायला होतं.

संध्याकाळी गावात चक्कर टाकली. रस्त्यावर स्त्रिया फारश्या दिसल्या नाहीत. तिथल्या किल्ल्याकडे जाताना भाषेचा गोंधळ होताच. पण पोचलो. भारतीय म्हटल्यावर तिथे काम करणारे खूश झाले. हिंदी सिनेमाचे संदर्भ देत राहिले. कुणीही कुठून विचारलं की नवर्‍याचं सुरू, "मुळचे भारतीय आता अमेरिकेत..." अमेरिकेच्या ’गन’ संस्कृतीवर ताशेरे ऐकल्यावर आम्ही त्याचं ’अमेरिका’ बंद करून टाकायचा प्रयत्न केला. पण तो दोन्ही देशाचा अभिमानी नागरिक त्यामुळे जिकडे तिकडे भारत - अमेरिका चालूच राहिलं. झालं असं, किल्ल्यावरून मशिदीत गेलो. मशिदीत प्रवेश करण्यासाठी दुकानातून जावं लागतं. तिथे मशिदीत जाण्यासाठी स्त्रियांसाठी असलेला अबया घालायला लावतात, दूध नसलेला तरीही चविष्ट चहा अतिशय आग्रहाने पाजतात. वस्तू बघता बघता एका तलवारी समोर आलो. विक्रेते दोन तरुण मुलं होती. कुठून आलात विचारल्यावर भारत - अमेरिका झाल्याझाल्या तो मुलगा म्हणाला,
"तुमच्या देशात आमच्या तलवारींचा चांगला ’बिझनेस’ होईल. नाहीतरी सर्रास बंदुका वापरता तुम्ही." त्यानंतर असेच काहीतरी विनोद केले त्याने. कर्मभूमीची ही प्रतिमा पचवणं कठीण गेलं. शेवटी अमेरिकेची ही गंभीर समस्या आहे हे सांगितल्यावर त्या मुलांनी विनोद थांबवले. पण त्या मुलांच्या मनातल्या अमेरिकेच्या प्रतिमेचं दर्शन दु:खदायक होतं.

दिवस तिसरा: भाड्याची गाडी करून पेट्राच्या दिशेने प्रवास. चार तासांचा प्रवास आहे. डेड सी बघायचा असल्यामुळे गावातून गेलो. नाहीतर तीन तासात पोचता येतं. गावातून म्हणजे अक्षरश: गल्लीबोळातून. अमान सोडल्यावर नंतर तर वाळवंटच. पहाटेची वेळ असल्यामुळे आमची एकमेव गाडी रस्त्यावर. डेड सी खरंच ’डेड’ होत चालला आहे. मिठाच्या लाद्या तयार झाल्या आहेत. त्यावरून आरामात चालता येत होतं. मिठागरच झालं आहे. डेड सी ने निराशा केली. जितकं वाचलं, ऐकलं होतं तेवढं विशेष काही वाटलं नाही. पेट्राची रात्र मात्र रंजक ठरली. ज्याचं घर होतं त्याचा मेव्हणा गप्पा मारायला आला. तो बेडूविन जमातीचा. त्याने उत्साहाने त्याच्या लग्नाची ’स्टोरी’ सांगितली. १६ व्या वर्षी त्याने वडिलांना लग्न करायचं आहे हे आपल्या मनाचं गुपित सांगितलं. त्याला आवडणार्‍या मुलीच्या घरी या मंडळींनी जाऊन मागणी घातली. मुलीला द्यायची रक्कम मोठी होती. वर्षभर मुलगा पैसे जमवत राहिला. जेव्हा जेव्हा मुलीला भेटावंसं वाटायचं तेव्हा तेव्हा दोन्ही घरातली माणसं एका खोलीत जमत. दोघांनी सर्वांच्यासमोरच बोलायचं. वर्षाने लग्न झालं. ’स्टोरी’ संपवत म्हणाला,
"आता लवकरच दुसरं लग्न करणार आहे."
त्याच्या पहिल्या लग्नाच्या ’स्टोरी’ त आम्ही इतके गुंतलो होतो की दुसर्‍या लग्नाचा विचार मानवेना. बोलणंच खुंटलं. तसं उठता उठता सकाळी नाश्ता करून द्यायचं कबूल करत तो गेला. ठरल्याप्रमाणे सकाळी ७ वाजता येऊन त्याने चविष्ट नाश्ता केला. शाकशुक नावाचा पदार्थ, ऑलिव्ह्ज, हमस आणि नान. नान सगळीकडे गार द्यायचे. सांगितल्यावर गरम करून दिलं. भारतीयांना चहा आवडतो म्हणून त्याने आमच्यावर बिनदूधाच्या चहाचा माराच केला. पण मन लावून खाऊ पिऊ घातलं. नाश्त्याने तृप्त होऊन पेट्रा पाहायला बाहेर पडलो. बाहेर पडताना खिडकीतून पाहिलं तर सगळीकडे बैठे एकावर एक ठेवल्यासारखे ठोकळ्यासारखे दिसणारे डोंगर. छायाचित्र काढली पण प्रत्यक्ष दिसतात तसे फोटोत नाही येत.

दिवस चौथा: पेट्रा सुंदरच आहे. निवांत फिरायचं असेल तर हातात दोन - तीन दिवस हवेत . दगड कोरून बांधलेलं हे पुरातत्त्व वास्तुकलेचं उत्कृष्ट दर्शन आहे. आम्ही एकच भाग केला. जाऊन येऊन तीन तासांच्यावर पायपीट. एवढं केलं तरी पूर्ण पेट्राच्या बांधणीची कल्पना येते. घोड्यावरून गुहेच्या दारापर्यंत जाता येतं. पुढे बग्गीतून. साधारण तासाभराने ट्रेझरीची इमारत लागते. त्या पुढे गाढवांची सत्ता. असं का या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळालं. आतमध्ये एक दोन ठिकाणी खायची प्यायची व्यवस्था आहे. त्या मालकाशी गप्पा मारल्या. त्यावरून समजलं की आताचं पेट्रा हे बेडूविन जमातीचं निवासस्थान. इथल्या गुहांमध्येच ते राहत. पेट्रा पर्यटनस्थळ करायचं ठरल्यानंतर या जमातीला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून इथेच काम किंवा व्यवसाय करण्याची मुभा दिली गेली. राहण्यासाठी स्वतंत्र वस्ती उभारली गेली. यामुळेच जॉर्डन सरकारच्या हद्दीत घोडा आणि बग्गी तर पुढे गाढव असा नियम आहे. हे सांगतानाच त्याच्या गुहेत सलमानखानच्या चित्रपटाचं चित्रीकरण झालं, तो इथे राहायला होता वगैरे माहिती त्याने दिली. आम्ही काही धन्य धन्य होऊन फोटो काढले नाहीत त्या जागेचे. कदाचित नाट्यकलावंत किंवा लेखकाचे पाय त्या जागेला लागले आहेत हे कळलं असतं तर काढले असते :-). गाढवावर बसा म्हणून कुणी मागे लागलं नाही पण घोडेवाल्यांनी मात्र पिच्छा पुरवला. आणि गिर्‍हाईक पकडण्यासाठी आपापसात हुज्जतही घातली.

दिवस पाचवा: पेट्रापासून दोन तासाच्या अंतरावर वादीरम. वाळवंटातल्या मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवताना आपण चित्रपटात एकच गाडी वाळवंटातून बराचवेळ मार्गक्रमणा करताना बघतो तसंच वाटत होतं. गाडीसमोर एक उंटही डुलत डुलत आला. आमचं आश्चर्य ओसरुन फोटो काढायचं सुचेपर्यंत त्याने रस्ता ओलांडलाही. वादीरमचं सौंदर्य अविस्मरणीय आहे. नजर टाकू तिकडे लालसर रंगाची वाळू, वाळूचे डोंगर आणि प्रचंड मोठाल्या शिळा. सुरुवातीला उंटावरून सैर केली. आधी उंचाला उंट धप्पकन खाली बसला तरी तो उंचच होता. कसंबसं त्याच्या पाठीवर स्थानापन्न झाल्यावर असा काही उठला की तोल सावरता सावरता मुष्किल. मुलाचा उंट तर इतका खादाड की जरा काही त्याला हिरवं दिसलं की थांबलाच. मुलगा आपल्यासारखाच आणखी एक प्राणीही आहे म्हणून खूष झाला. माझा आणि मुलीचा उंट एकामागोमाग होते. माझा उंट सारखा मुलीशी ’लगट’ करे. त्याची लगट आणि तो बाजूला व्हावा म्हणून माझा आरडाओरडा एकाचवेळी चालू होता. मुलगी उतरुन चालायला लागेल की काय असं वाटायला लागलं. त्यात कुठल्या भाषेत आरडाओरडा केला की उंटाला आणि त्याच्या माणसाला कळेल हा प्रश्न होताच. घाबरुन उंट पळत सुटला तर काय घ्या. शेवटी सहस्त्र खाणाखुणा आणि वेगवेगळ्या उच्चारात तेचतेच उंटवाल्याला न कळणारं बोलत राहिले. अखेर त्याचा बंदोबस्त झाला. त्याची दोरी अधिक गुंडाळली आणि उंटाचं तोंड मुलीच्या आसपास पोचेनासं झालं. उंटावरुन उतरल्यावर जीपमध्ये. बर्‍याच ठिकाणी भल्या मोठ्या शिळा चढायच्या होत्या, अरुंद खडकांवर पाय टाकत डोंगरांचं टोक गाठायचं होतं. निमुळत्या फटींमधून देह आत सरकवायचे होते. बर्‍याच कसरती पार पाडल्या. रात्री मुक्कामासाठी तंबूत, तिथेच कापडी भोजनालयात वाळूत भट्टी पेटवून केलेल्या जेवणावर सर्वांनीच ताव मारला. जेवण, गप्पा आणि हुक्का. रात्री इतर काहीच उद्योग नसल्याने भोजनालयाचं विश्रांतीगृह झालं. नॉर्वे, जपानहून आलेल्या लोकांशी गप्पा झाल्या. पण बरेचसे हुक्कातच गर्क होते. आम्ही आपले चहा रिचवत होतो.

दिवस सहावा: वादीरमहून इस्राइल. पुन्हा वाळवंटच. वाहतूक जवळवळ नाहीच. मी गाडी चालवायला लागल्यावर वाटेत लागणार्‍या लहान गावातल्या नजरा आश्चर्याच्या होत्या. आकाबाला गाडी परत केली. आकाबा मोठं शहर आहे. गाडी परत करून पायी समुद्रावर चक्कर मारून आलो. तिथून इजिप्त, सौदी आणि इस्राइल असे समुद्रापलीकडे असलेले तीन देश दिसतात. ज्यांच्याकडून गाडी भाड्याने घेतली होती त्यांनी जॉर्डनच्या हद्दीशी सोडलं. जॉर्डनमधून इस्राइलमध्ये प्रवेश. इस्राइलमध्ये गेलात तर अरब राष्ट्रात प्रवेश नाही या अरब राष्ट्रांच्या खाक्याला प्रत्युत्तर म्हणून इस्राइल पासपोर्टवर शिक्का न मारता एक कागद हातात ठेवतात.

दिवस सातवा: इस्राइलमध्ये तेलवीवला आलो. बाहेर पडल्यावर तिथली हसतमुख कर्मचारी मदतीला तत्पर होती. उबर न करता त्यांचं तिथलं अॲप डाऊनलोड करायला लावून तिने टॅक्सी बोलवायला लावली. टॅक्सीलासुद्धा तिने ती उभी होती तिथपर्यत यायला लावलं. ती आम्हाला तिथून हलूच देत नव्हती. सुरुवातीला मदतीचा प्रयत्न वाटला पण नंतर तेच वागणं खटकलं. शेवटपर्यंत कारण कळलं नाही पण सुरक्षितता हे कारण असावं. तेलवीववरुन जेरुसलम. धार्मिक स्थळ. भक्तांची गर्दी अतोनात तेवढीच बंदूकधारी सैनिकांचीही. रस्त्यावर, लोकल, मॉल सर्वत्र. २० - २५ वर्षाची सैन्यातील मुलं - मुली बंदूक (स्टेनगन्स) घेऊन वावरताना पाहिलं तेव्हा सुरुवातीला विचित्र दडपण आलं मनावर. उगाचच कुणी हल्ला तर करणार नाही ना अचानक या दृष्टिकोनातून माझीच टेहळणी सुरू झाली. पण काहीवेळातच बंदूकामध्ये वावरायची ’सवय’ झाली.

’वेस्टर्न किंवा वेलिंग वॉल’ हे ज्यू लोकांचं प्रार्थनास्थळ आहे. स्त्रिया आणि पुरुषांसाठी दोन वेगवेगळे भाग आहेत. अंगभर कपडे असणं आवश्यक आहे. भिंतीवर डोकं टेकून लोक इथे रडतात ते रोमनांनी ’टेंपल’ उद्धस्त केल्याचा निषेध म्हणून. तसंच आपल्या इच्छा लिहिलेल्या चिठ्ठ्या भितींतल्या फटीत लोक ठेवतात. याच आवारात असलेलं ज्यू आणि मुस्लिम लोकांचं ’टेंपल माऊंट/डोम ऑफ रॉक’ बाहेरुनच बघता येतं मुस्लिमाखेरीज इतर धर्मीयांना आत प्रवेश नाही. आम्ही सहज एका स्थानिक जोडप्याला आत जाण्यासाठी काय करावं लागेल विचारलं. दोघांमधला पुरुष आत जाता येणार नाही यावर ठाम होता तर स्त्री अशा निर्बंधांना काय अर्थ म्हणून त्याच्याशी वाद घालत होती. अर्थात नियमापुढे ती काय करणार? पण दोघांच्या मनोवृत्तीतला फरक पाहताना गंमत वाटली. हा सगळा भाग फिरून झाला की बाजारातच बाहेर पडायला होतं. तिथेही जागोजागी बंदूकधारी सैनिक. जेरुसलमहून पॅलिस्टाईनची हद्द अवघी अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. पॅलिस्टिनियन सतत हद्दीवरून दगडफेक करत असतात असं ऐकलं. आम्ही सगळा धोका पत्करून जायचं ठरवलं. पॅलिस्टाईनियनना जेरुसलममध्ये सहजासहजी येता येत नाही. फक्त शुक्रवारी त्यांना जेरुसलममध्ये येता येतं. पण जेरुसलमहून तिकडे जाणार्‍या गाड्या सारख्या सुटत असतात. गाडी खचाखच भरलेली होती. रस्त्यावरही तोबा गर्दी वाहनांची. पुण्याची आठवण झाली. आम्हाला जेमतेम निम्मं अंतर जायलाच २ तास लागले. अजून दोन तास पोचायला लागतील असं बसमध्ये कुणीतरी सांगितलं. परत येताना ’तपासणी’ चक्र असणारच होतं. सगळा विचार करून आम्ही अर्ध्यावर उतरून हळहळत परत फिरलो.

दिवस आठवा: परतीचा. तेलवीव ते इस्तांबूल, इस्तांबूल ते वॉशिंग्टन डी. सी. डी. सी. ते शार्लट.

गाडी चालवताना आठ दिवस पुन्हा पुन्हा शब्दांतून रंगत होते. ठिकाणं, माणसं, खाणं... वेगवेगळे अनुभव पोतडीत जमा झाले. आमच्यासारख्या खादाडखाऊ लोकांची या देशात मजा आहे. चिकन श्वॉरमा, बाकलावा, मलाबी, शाकशुक एक ना अनेक. परत येताना पुढच्यावेळेला कोणत्या देशात जायचं आणि काय खायचं याबद्दल चर्चा रंगली आणि या प्रवासाची सांगता झाली.

DeadSea.jpg मृतसमुद्र

Petra1.jpg पेट्रा

Petra2.jpg पेट्रा

TreasuryBuilding.jpg ट्रेजरी बिल्डींग

Petra.jpg पेट्रा

Petra3.jpg पेट्रा

Petra4.jpg पेट्रा

Petra5.jpgपेट्रा

Wadi Rum.jpg वादी रम

Wadi Rum1.jpg वादी रम

Wadi Rum2.jpg वादी रम

Wadi Rum3.jpg वादी रम

Bhojanalay.jpg भोजनालय

WallPrayer.jpg वेलिंग वॉल

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

Wow, मस्त ट्रिप झाली असणार तुमची

पण अगदीच हायलाईट्स दिल्या सारखे लिहिले आहे,
एक एक दिवस घेऊन त्यातल्या 2 3 आठवणी छायाचित्रांसकट , डिटेल मध्ये लिहिल्या तर जास्त आवडेल

सर्वांना धन्यवाद.

सिम्बा, वावे - हल्ली ’गूगल’ वर प्रेक्षणीय स्थळांची माहिती असते त्यामुळे ’माणसांच्या’ अनुभवांवर थोडक्यात लिहावं असं वाटलं.

साधना - माझ्या मनातलं लिहिलंत :-).

चिमण - तू फक्त फोटोच पाहिलेस की काय? मजकूर वाच Happy

सुंदर लिहीलंय. छान वाटलं वाचून. मृत समुद्राविषयी लहानपणी भुगोलात वाचल्यापासून कुतूहल आहे.

सुंदर खुसशुशीत, सुटसुटीत लेख आणि फोटो..
डेजर्ट सफारीत तो त्यांचा टिपिकल तनुरा डान्स नव्हता का? 'सारा जमाना' मधे अमिताभ अंगभर इलेक्ट्रिकच्या माळा लावलेला ड्रेस घालतो, तसल्या ड्रेस मधे अथक गोल गोल फिरत करतात हे लोक तो डान्स. त्या वातावरणात पहायला मजा येते !
रच्याकने, इस्राइल मधे ते डायबेटिज चं औषध कुठे मिळालं का ? Wink

साधारण 8 दिवसाच्या ट्रिप चा खर्च युरोप च्या तुलनेत किती असेल?
वीणा वर्ल्ड वाले 8 दिवसाच्या युरोप ट्रिप साठे माणशी 1.25 च्या आसपास घेतात.

मित, डायबेटिज औषध तिकडे? समजलं नाही मला. तसं नृत्य तुर्कस्थानात पाहिलं पण ते रेस्टॉरंटमध्ये चालू होतं. आम्ही नेत्रसुख बाहेरुनच घेतलं कारण फार महागडं वाटलं ते रेस्टॉरंट Happy

सिम्बा,
आमचं आम्हीच सगळं नियोजन केलं होतं. म्हणजे मुलाने. निम्मा खर्च वाचतो तसं केलं तर. अर्थात आमच्याबाबतीत मुलाची अट आहे की तो सगळं ठरवेल आणि त्याचा खर्च आम्ही करायचा :-). तो २४ वर्षाचा आहे आणि आत्तापर्यंत त्याने २४ देशांची भटकंती केली आहे. आमच्याबरोबरची फुकटात होते म्हणून प्रवासाची सगळी आखणी तो करतो. विषयांतर झालं पण राहवलं नाही. परुला गेल्यावर्षी गेलो तेव्हा सगळं नियोजन मी केलं होतं त्यामुळे थोडीफार माहिती देऊ शकते.

विमानाचं तिकिट खूप आधी गूगल किंवा Scott's Cheap Flights Alert लावून करतो त्यामुळे ते स्वस्तात होतं. lonelyplanet.com वरुन प्रवासाचे टप्पे ठरवायला मदत होते. https://www.tripadvisor.com/ पण बरं पडतं. चालणे, सार्वजनिक वाहनांचा वापर करणे किंवा गाडी भाड्याने घेणे यामुळे फिरणं तुलनेने खूपच स्वस्तात होतं.

जॉर्डनचा ३ रात्र ४ दिवस असा pass घेतला तर visa साठी वेगळे पैसे भरावे लागत नाहीत. Airbnb हॉटेलपेक्षा स्वस्त पडतं. आमचा विमानप्रवास, राहणं, खाणं, गॅस याकरता चौघांचा ८ दिवसांचा साधारण एकूण ४००० डॉलर्स खर्च झाला.

आपली आपण आखणी करुन गोंधळ होत नाही का? तर काहीवेळा होतो पण फार नाही. जसं अमानला गेल्यावर जेटलॅगमुळे आम्ही जे झोपलो ते संध्याकाळी ४ वाजता उठलो. तिथल्या किल्ल्यावर गेलो तोपर्यंत काळोख झालेला त्यामुळे किल्ला बंद झाला होता पण त्याच लोकांनी शहरात काय पाहता येईल ते सांगितल्यावर रात्री शहर फिरलो. पण असा गोंधळ क्वचित आणि फार होत नाही असा अनुभव आहे.

छान माहिती मोहना. फोटो पण खूप सुंदर.

मित.. Biggrin

मित, डायबेटिज औषध तिकडे?>> "अशी ही बनवाबनवी" या सुप्रसिद्ध चित्रपटाचा संदर्भ आहे त्याला. Happy

सुप्रसिद्ध चित्रपटाचा संदर्भ आहे त्याला. +१
सॉरी संदर्भ आधीच द्यायला हवा होता.. काय करु, इस्राइल म्हटलं की बाय डिफॉल्ट डायबेटिजचं औषधच आठवतं आधी Happy

मित, Nidhi, आसा, अच्छा, अच्छा असं आहे होय. मी इकडे बरंच डोकं खाजवलं. नशिब, जागतिक चर्चेला प्रश्न नाही टाकला:-). चित्रपट पाहत नाही फारसे त्यामुळे कळण्याची शक्यता नव्हतीच. आसांचं, मानेंचा मित्र वाचल्यावर, आता हा कोण? कोणी मायबोलीकर की काय असाही प्रश्न पडला Happy

"आमचं आम्हीच सगळं नियोजन केलं होतं. म्हणजे मुलाने. निम्मा खर्च वाचतो तसं केलं तर." - बिंगो. गेले काही वर्षं, भारतातल्या आणी भारताबाहेरच्या ट्रीप्स स्वतः प्लॅन केल्या आहेत. पैसे वाचवण्यापेक्षा सुद्धा मनासारखी ट्रीप करता यावी हा उद्देश होता आणी तो सफल झाला. मला स्वतःला 'झेंदावंदन ट्रीप्स' फारशा आवडत नाहीत. म्हणजे रोज पहाटे उठून, पुढच्या १०-१२ तासात, पर्यटन विभागाच्या पुस्तकातले सगळे 'पॉईंट्स' कव्हर करणे (अर्थात तिथे जाऊन आलो, असे झेंडे लावणे), ठराविक रेस्टॉरंट्स मधे जाऊन, ठराविक मेन्यू खाणे वगैरे प्रकार मला ट्रीप चं समाधान मिळवून देत नाहीत. त्यापेक्षा, काय पहायचय हे ठरवून, त्याप्रमाणे ट्रीप प्लॅन केली, तर आरामात तुमच्या इंटरेस्ट चे पॉईंट्स पाहूनही होतात, लोकल फूड चा आस्वाद घेता येतो, आणी बहुतेक वेळा जिथे जातो, त्या जागी जरा रेंगाळत, त्या जागेचा 'फील' घेता येतो.