आलोय गढ चढून

Submitted by निशिकांत on 6 December, 2018 - 09:38

जीवनात खूप हसलोय
हसतच घेतलंय रडून
मी एक अथक प्रवासी
आलोय गढ चढून

दुसर्‍यासाठी जगणं
मनास खूप आवडे
दुसर्‍यामुळे जगणे
मला होते वावडे
कर्ण नसून देत होतो
कनवटीचं सोडून
मी एक अथक प्रवासी
आलोय गढ चढून

तूच दिलेले पंख लाऊन
उंच उंच उडलो
धवल यशाच्या शिखरासंगे
सहजासहजी जुडलो
सत्कर्माची पुरचुंडी
ठेवलीय बघ उघडून
मी एक अथक प्रवासी
आलोय गढ चढून

चंद्र, तारे, हिरवळ, गारवा
खूप खूप लुटलं
ग्रिष्माच्या संकटकाळी
धैर्य नाही सुटलं
तुझ्या कृपाछत्राची
सवय गेलीय जुडून
मी एक अथक प्रवासी
आलोय गढ चढून

जीवनाचा खडतर प्रवास
माझी काय मजाल!
तूच करता करविता
तुझेच मायाजाल
खूप ठेवलास पाठीवर हात
दर्शन दे पुढून
मी एक अथक प्रवासी
आलोय गढ चढून

जगाच्या या बागेचा
तूच आहेस माळी
बेंबीच्या देठापासून
देतोय तुला हाळी
अब्दा नकोत, सुकण्याआधी
फूल घे खुडून
मी एक अथक प्रवासी
आलोय गढ चढून

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users