वायला

Submitted by अभ्या... on 6 December, 2018 - 03:02

नमस्कार माबोकरांनो,
शालीभाऊनी लिहिलेली गनी ची कथा वाचली अन माझ्या ह्या पूर्वप्रकाशित कथेची आठवण झाली. आता हि व्यथा किन्नराची नाही पण बघणार्‍यांच्या नजरेबद्दल आहे इतकेच.
................
"किरण्या लका आवल की लौकर"

लालजर्द लिपस्टीक ओठावर फिरवायच्या आधी तोंडातली तंबाखू थुंकायला किरण्या उठला. ऊंच टाचेचा तोल सांभाळत चुडीदार सावरुन अन ओढणी ओढून परत गायछाप मळायला लागला.

"किरण्या, तुझी सुपारी नाय फोडायला चाललो भाड्या. येतोयास का न्हाय?" "आहाहा आली माझी डार्लिंग. आयायाया काय दिसतीया" म्हणत दिप्याने किरण्याला आवळला.

"गपेय तुझ्यायला. आजची हजाराची लेवल कर अन पाश्शे त्या राणीवर घालीव. हितं काय उपेग नाही. मला नड हाय पाचशाची तेवढे गावले की बास्स"

दिप्याने झाडीत लावलेली यामा काढली. ओढणीनं तोंड झाकून किरण्या मागं बसताच गिअरमध्येच उचलली.

घाटाखाली हायवेवर किरण्याला सोडून दिप्या सराट घाटाच्या वर धाब्यावर जाऊन बसला. परश्या न आज्या आधीच मोबाईलात तोंडं घालून कोपर्‍यात बसले होते. तिसरी सिग्रेट पेटवणार इतक्यात दिप्याचा फोन बारीकसा वाजला. पाटदिशी दोन गाड्या धाब्यावरुन हलल्या. घाटातून वर चढणारे दोन ट्रकलाईट पार वरुन दिसत होते. कोपर्‍यावर लाईट बंद होऊन दोन्ही ईंडिकेटर चमकायला लागले तसा दिप्याने अ‍ॅक्सीलेटर पिळला. ट्रक गाठस्तोवर ड्रायव्हर अन क्लीनर अंगावर येणारी दगडं चुकवत किरण्याच्या मागं लागले होते.

दोघांच्या मधी गाडी घालत दिप्याने राडा चालू केला. मागनं आलेल्या आज्यानं अन परश्यानं नीट केबीन उचकली. केए पासिंगची ट्रक. ड्रायव्हर किन्नर पार खपाटीचे. आडदांड दिप्याच्या दोन लाथात पाया पडायला लागले.

"भडव्यावो गावच्या पोरी हक्काच्या वाटत्येत व्हय. पासिंजरं दाबायला लै भारी वाटतेत व्हय" दिप्याची रसवंती ड्रायव्हरचे घड्याळ आन तीनेक हजार रुपये मिळस्तोवर अशी वाहात होती. तवर परश्याने आतला टेप आन मोबाईल साफ केला होता.

दोनच मींटाच्या खेळात ड्रायव्हर किन्नर बिना किल्लीच्या ट्रकात बनेन अंडरवेअर वर थरथरत बसले होते. कुठून अवदसा आठवली आन पोरीला ट्रकात घेतलं असं झालतं. बर घेतलं ते घेतलं, पोरीनं अशा काय अदा दाखवल्या की किन्नरला लैच खेटू वाटलं. जरा कडंला घ्यावं म्हन्लं तर पोरगी पार उडी मारुन दगडं मारत पळाली. अशी पळाली की तासभर हितून हालायची भ्याव वाटायली. मागनं दुसरा ट्रक आला तवाच हि जोडगोळी पोपटावानी बोलायला लागली.

धाब्याच्या पार मागं शेड मदी लुटीच्या वाटण्या होत हुत्या आन किरण्या सलवार बनेन वर तंबाखू मळत गप्प पाहात बसला होता. तिज्यायला टाइम बी काय आला न कराया लागतंया काय.

...............................................................&&&&...........................................................................................

गरीबी नडली तिज्यायला. बाप दिवसभर देशी पिऊन लास. आयनी कशीबशी धडपड करीत एकुलत्या एका लेकाला वाढीवलं. शिक्षणाच्या आईचा घोच होता पण किरण्यानं रुप मात्र आईचं उचल्यालं. पोरीनी बी लाजावं अस्सा नित्तळ गोरा रंग, डोईवरचं काळ्भोर कुरळं केस सोडले तर आख्खं आंग नितळ. नाकनख्श तर जणू पुतळ्यासारखं कोरीव. शाळेतला मास्तर बी दहांदा म्हणायचा, पोरगी आसतास तर आसलेली बायको सोडून किरण्याला पळवला आसता.
दहावीच्या चार वार्‍या हुनसुदा किरण्याला दाढी तर सोडा व्हटावर लव पन नाही फुटलेली. मास्तरासारख्याच गावातल्या आंबटाच्या असल्या नजरांना सरावला किरण्या, पण पोटासाठी कामधंदा काय मिळंना. कष्टाचं काम त्येला झेपंना. शेवटी पुण्यामुंबईला तर नशीब काढावं म्हणून दिप्याला गाठला. दिप्या शाळेतला नापाशीदोस्त. बापाच्या धाब्यावर पडीक राहून रोज पन्नास बाटल्या आणायच्या ड्यूटीवर. बाटलीमागं धा रुपये सुटायचे.

दिप्या म्हणला "कुठं जातो लका. राहा हितंच. कमज्यादीला म्या देत जाइन पैसे."

धाब्याच्या मागची पत्रा शेड हीच मुक्कामाला झाली. दिप्याला पण आपल्या लव्ह स्टोर्‍या आयकवायला हक्काचा पंटर गावला.

दिप्याची आयटेम गावातली राणी. पुण्याला तीन वर्शे हॉस्टेलात काढून नापास होऊन गावात हिरवीनी हुऊन हिंडायची. मांजरानं पिळग्या ऊंदराला खेळवांव तसं दिप्याला खेळवायची. आपल्याशिवाय दिप्याला कुणी गावणार नाही याची पक्की खात्री तिला. सारक्याला वारके जणू. एका भांडणात "तुझ्यासारख्या छप्पन्न फिरतील माझ्यामागं" आसं दिप्या बोलून गेला आन पेटली बया. एकतरी पोरगी फिरवून दाखीव आन मग ये आसली पैज लावून बसली. पार थटूनच बसली. दिप्यापन पेटला. पण पोरगी तरी गावणार कुठं. आखरीला किरण्यावर नजर पडलीच. त्याला कसंबसं पटवून बहीणीच्या पंजाबी ड्रेसावर तालुक्याला घेऊन गेला. जातानाच रस्त्यावरच्या लोकांच्या वळून वळून बघणार्‍या नजरा किरण्याच्या सौंदर्याला दाद देत होत्या. दिप्या बी टोचणार्‍या गोष्टी माहीत आसून एंजोय करुन घेत होता. दिप्याची पैज संपली. पण किरण्याच्या नशीबी अजून एक भोग देऊन ग्येला.

पैसे मिळवायचा सोपा मार्ग. एक दोन आठवड्याआड एखांदा ट्रक नायतर कार हेरुन किरण्यानं भुलवायचं. घाट चढूस्तोवर झुलवायाचं मग दिप्यानं दोन टगे सोबतीनं घेऊन लुटायचं.

"दिप्या नगं बे आसले धंदे, लाज वाटतीया" किरण्या कुरकुरला तसं दिप्या बोलला "भाड्या कोण खायला घालत नव्हतं तवा लै मर्द बनत होता का बे.?"

"तसं न्हवं. ह्ये पोरीचं सोंग काढायचं नगं वाटतं"

" अबे जिंदगी वायली ह्ये सोंग वायलं" तू काय हाईस हे मला म्हैते मग झालं.

पण पण म्हणता तीन चार लुटीतच हातात पैसा खेळायला लागला. दिप्याचा, किरण्याचा मुक्काम धाब्यामागचं शेड हाच झाला.

एक दिवस दिप्याला बोलवायला त्याची बहीण ज्योती आली आन डायरेक्ट शेडमध्येच घुसली.

जणू चित्रात बघितल्या सारखा एक मदनाचा पुतळा बाजेवर पडला होता. तिला बघताच किरण्याला अंगावर बन्यान बी घालायला सुचंना की ज्योतीला त्याचं देखणं रुप बघून दुसरं काय बघायचं सुचंना.

...............................................................&&&&...........................................................................................

आजची लूट वाटून झाली. आज्या परश्या दोन बीअर मारुन हालले. दिप्या जरा तरांगायला लागला तसा किरण्या बोलला

" दिप्या लका बास करु आता. कायतरी दुसरं बग काम मला"

" का डार्लिंग. वाटनी कम आली का तुला. घे माझ्या वाटचं बी. तू हायेस तर चालालीय एश आपली."

"तसं न्हवं बे. कायतरी इज्जतीचं काम करुन संसाराला तर लागावं म्हणतो"

"अबे धंदा वायला संसार वायला आसतो बे" न्हायतरी तुझ्यामागं एखादा आंबटच लागावा. पोरगी कुठली गावावी तुला"

"भाड्या आसला आवतार तुझ्यापायी करुन घीतला आन मला हांडगा म्हणतुस"

बीअर चढलीच व्हती. आवाज चढत चढत भांडण बी पेटलं.

नाजूक साजूक किरण्याला पिलेला असला तरी आडदांड दिप्या जडच होता.

कुत्र्यागत तुडवला किरण्याला. पार चुथडा करुन ठेवला. एकेक लाथ पोटात बसताना आतडी तुटायला आली तशी किरण्याची शुध्द हारपायली. ज्योतीचं दिप्याला बोलावं म्हणत होतं तर वायलंच झालं. नशेत आन माराच्या धुंदीत किरण्या बरळू लागला. ज्योतीचं सगळ्च प्रकरण न सांगता दिप्याला उमागलं. आता तर हाणायला फर्मास कारण गावलं. वळ उठून अर्धमेला हुस्तवर किरण्यानं मार सोसला. तो थंड झाला की दिप्या बी चार लाथा घालून गार पडला.

गार वार्‍यानं आख्खं आंग चिरत हुतं. एकेक वळ ठणकत होता किरण्याचा. धाब्यावरुन वाटीत तूप न हळद घेऊन दिप्या आल्लाद त्येंना लावत हुता. लोण्यागत फिरावा तसा किरण्यावरुन त्याचा हात फिरत होता.

"काय नसतं ग डार्लिंग. प्रेम वायलं आन व्हेव्हार वायला आसतूया बग. भैन माझी हाय पण कुणा पिळग्यासाठी नाही, औकातीनं राहावं, इज्जतीनं खावं" आस्लं कायबाय बडबडत होता.
.
.
...............................................................&&&&...........................................................................................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे.... चांगली आहे कथा.
किरणचे वर्णन वाचून Andrej Pejic च आठवत होता.

फक्त ते पहिल्या भागात 'ड्रायव्हर किन्नर' मुद्दाम लिहिलं आहे का? क्लिनर लिहणच योग्य झालं असतं असं वै म.

> ग्रामीण बोलीत क्लिनरला सर्रास किन्नर या नावानेच हाक मारतात. डायव्हर किन्नरची जोडी असते. Happy > ओह्ह अच्छा. माहित नव्हतं.