जनावरे

Submitted by स्वाती_आंबोळे on 5 December, 2018 - 13:31

तुझ्या नि माझ्या चेहऱ्यांमागिल गुहेत काळोख्या बसलेली
आळसावुनी, तरिही सावध
मध्येच माना उंचावित वर डोळ्यांतुन डोकावित थोडे
नख्या काढती जोखत पारध

जनावरे एकाच जातिची...

तू मी बसलो गप्प तरीही कानोसा घेतात नेमका
श्वासांची उष्णता पारखत
शिकार भिनलेली रक्तातच, माणसाळली म्हणता म्हणता
झडप घालती अचूक अल्लद

जनावरे एकाच जातिची!

जनावरे ही जिवंत तोवर तुला न सुटका माझ्यापासुन
तशी मलाही या पाशातुन
परस्परांच्या त्वचेआडची झळाळणारी गरम कातडी
टिपती कुठल्याही वेषातुन

जनावरे... एकाच जातिची!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गूढ वाटून राहिली ना वं..
नारायण धारप कवी असते तर साधारण अशीच लिहीली असती. आवडली कविता (समजायला वेळ गेला )