टेकडी पुराण... भाग 2 .

Submitted by स्वप्नगंधा on 3 December, 2018 - 05:12

टेकडी पुराण... भाग 2

टेकडीवर एकटं जायला मला जास्त आवडतं . आपण आपल्या स्वतःच्या गतीने जाऊ शकतो .बरोबर अमित सारखा fast walker असेल तर कायम त्याला गाठण्याची गडबड करावी लागते. मी कितीही फास्ट चालायचा प्रयत्न केला तरी तो माझ्यापेक्षा दोन ढांगा पुढेच असतो .मग मला अचानक पन्नास शंभर वर्षांपूर्वीच्या काळात गेल्यासारखं वाटतं .तेव्हा म्हणे नवरा-बायको फिरायला जाताना नवरा एका चौकात तर त्याच्या मागच्या चौकात बायको असं दृश्य असे .तसंच काहीसं वाटतं मला.. कधी मैत्रिणीबरोबर गेलं तर मग गप्पा चालू होतात. त्याच त्याच विषयावर ...
याउलट एकटं असलं की 'इतरांच्या गप्पा' ऐकता येतात. वेगवेगळ्या विषयांवर लोक बोलत असतात .चर्चा असते.कवचित वाद पण.... कोण काय गप्पा मारतंय याचा अंदाज घेत मी माझा वेग ठरवते. इतक्या मिनिटात इतकं अंतर आणि इतक्या कॅलरीजचं हवन असा कुठलाही हिशोब मनात न ठेवता....
एकदा दोघी मैत्रिणी गप्पा मारताना ऐकलं .एक म्हणत होती ,"अगं हल्ली खरंच स्वयंपाक घरात जायचा सुद्धा कंटाळा येतो .रोज जाऊन काय बनवायचं त्या विचाराने पण कसंस होतं"... 'मेरी सोच आप से कितनी मिलती है' असं म्हणावंसं वाटलं मला अगदी.. मग मी कान टवकारले .. दुसरी मैत्रीण काहीतरी suggestion देईल, बघू आपल्याला उपयोगी होतं का,म्हणून खरं तर त्यांना ओव्हरटेक करणे शक्य असूनही मी मागे रेंगाळले .. त्या extra ordinary slow moving होत्या . त्यामुळे मग मला थांबून मधेच बुटांची लेस घट्ट बांध, दोन घोट पाणी पी असे माझ्या वेगाला स्पीड ब्रेकर्स लावावे लागत होते ..कान अगदी उत्सुक होते solution ऐकायला.दुसरी मैत्रीण म्हणाली ,"हे बघ तू सकाळ-संध्याकाळ atleast एक वेळेला तरी स्वयंपाकाला बाई लावून टाक"...
छे.. हे सोल्युशन माझ्यासाठी उपयोगी नव्हतं. कारण 'स्वयंपाक करणे हे काही फार दमणुकीचेे काम नसून तो काय करावा हे ठरवणं हे जास्ती थकवणारं आहे 'असं माझं ठाम मत आहे .त्यामुळे या चर्चेतला माझा इंटरेस्ट संपलाच. मी माझा वेग पकडला .फक्त आपल्या प्रमाणेच इतर कुणाला तरी हे वाटतं हाच काय तो समाधानाचा सुस्कारा....

एकदा मी टेकडी उतरत होते आणि एक पंचावन्न-साठ चे नवरा-बायको टेकडी चढत होते .सुरुवातीचे चढण चढून नवरोबा वर आले होते आणि खालून येणाऱ्या बायकोला उद्देशून जोरात ओरडून म्हणत होते , "come on hurry up..you are taking too long to climb a small hillock.". मी त्या दोघांच्या मधोमध होते .त्यांच्या सहधर्मचारिणी च्या डोळ्यात खरंतर पाणी तरळले होते. त्यांच्या मिस्टरांचा बोलणं ऐकू गेलंय मला हे कळलं होतं त्यांना ...मला म्हणाल्या "You know ,he is very well in this ..I am not upto the mark.." हे ऐकून मी चक्क थांबलेच.. त्यांच्या नवऱ्याने त्याच्या नकळत त्यांना इतका inferiority complex दिला होता ..मी माझ्याही नकळत त्यांना म्हटलं ,"Yes he might be better than you in this field , but there could be many more fields where you are better than him"..त्यांचे ते पाणीदार डोळे चमकले एका सेकंदात.
त्या पटकन म्हणाल्या ,"Yes swimming.. he can not swim I am best at that..आणि खुदकन हसल्याच..मला म्हणाल्या,"Thanks dear for reminding me this"...
त्यांना त्या स्वतः गवसल्या त्याक्षणी ..मी खरंतर काहीच नव्हतं केलं ..पण कधीतरी आपले दोन शब्द पण एखाद्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरू शकतात, हे जाणवलं.. इथे एक मोठा समाधानाचा सुस्कारा!

एकदा माझ्या पुढे काही अंतरावर तीन छोट्या मुली मोठमोठ्याने गप्पा मारत चालल्या होत्या..
तिसरी चौथीतल्या असाव्यात. त्या मग मी आणि माझ्या बरेच मागे त्यांच्या आया..
"आपण कसल्या पुढे आलो ना fast चालत." पहिली
" हॅ मी तर नेहमीच fast चालते "दुसरी
"आपल्या मम्मी बघ किती मागे आहेत.. त्या दमल्या असतील.." तिसरी
"हॅ माझी मम्मी नाही ..तुमची दमली असेल "
"मी येताना homework करून आले ""
मी तर तो yesterday ला च केला "
"आमच्या घरी आज पिझ्झा ऑर्डर करणार "
"ई.. त्यात काय, आम्ही तर swiggy तून पास्ता ऑर्डर केला होता काल"
त्यांची शाब्दिक हमरातुमरी आणि आपणच दुसऱ्यापेक्षा किती भारी दाखवायची खुमखुमी प्रातिनिधिक होती की काय? आणि आजच्या स्पर्धेच्या युगाच्या त्या बळी? येथे मी माझा वेग वाढवण्यापेक्षा जास्त काहीच करू शकले नव्हते ...

कधी कधी लोक फोनवर किंवा एकमेकांत इतक्या तावातावाने बोलत असतात की त्यांचा आवाज दूुरदूर जावा यासाठी मला 'पळण्याचा सराव' तिथे सुरू करावा लागतो ..मी त्यांच्या बकबकीतून छुटकारा मिळवण्यासाठी चक्क रनिंग सुरू करते आणि तेवढ्यात समोरून एखादी मैत्रीण पास होताना "वा रनिंग का सध्या ?" असं म्हणत बोटाचा अंगठा थम्स अप करत दाखवते ...हल्ली हल्ली whats app मुळे सगळेजण शाब्बास ऐवजी अंगठा दाखवतात.. पण मराठीतल्या 'अंगठा दाखवणे ' या वाक्प्रचाराशी याचा सुतराम संबंध नसतो... जसं हल्ली नवीन जनरेशन खवाट ,भीषण, भयंकर हे शब्द सुंदर या शब्दाचे समानार्थी म्हणून वापरतात ..नवीन परीक्षा पद्धतीत समानार्थी, विरुद्धार्थी शब्द लिहा हा भाग गाळून टाकलेला दिसतोय वाटतं..

एकदा दोन अनोळखी श्वानप्रेमी बोलताना ऐकले.त्यातील एक कॉलेजवयीन मुलगी आणि दुसरा पन्नाशीचा गृहस्थ असावा." रोज सकाळी येतेस का वॉकला तुझ्या डॉगीला घेऊन?" असं त्यांनी विचारलं ..त्यावर ती म्हणाली ,"नाही मी symbi ला आहे ना 12 th आर्टसला.. मॉर्निंग कॉलेज असतं एरवी ..मी ठाण्याची आहे . इथे आजी सोबत राहते प्रभात रोडला नवव्या गल्लीत बंगल्यात.. पण सध्या आमचे dog walker आणि care taker काका गावाला गेलेत ना आठ-दहा दिवस ...म्हणून मी आणलं आमच्या लिओला. "मला हे फारच गंभीर वाटलं. तो दुसरा इसम सज्जन असेल, पण आजूबाजूला इतर लोक होते त्याने एका विचारलेल्या साध्या प्रश्नाच्या उत्तरात तिने मी आणि माझी आजी प्रभात रोड गल्ली नंबर 9 येथे बंगल्यात दोघीचं राहतो आणि सध्या आमचे care taker सुट्टीवर गेलते ..सकाळी आजी घरी एकटीच असते. इतकं तिच्या नकळत समोरच्या अनोळखी व्यक्तीला सांगितले .खरं तर तिथेच तिला अडवून "बाई गं, नको इतकी माहिती देऊन" असं सांगावसं वाटत होतं .पण ते अशक्य होतं. घरी आल्या आल्या मुलींना समोर बसवून सांगितलं ,आपल्याला बोलताना किती भान ठेवावं लागतं याचं...

काही कॉलेजमधल्या तरुण मुला-मुलींचे घोळके असतात. हे मिश्र हिंदी मराठी आणि इंग्रजी या भाषा वापरत गप्पा ठोकत असतात. इतक्या जोरजोरात बोलत असतात .एकदा वाटलं सांगावं यांना ,जरा हळू बोला रे आणि तो विचार आल्यासरशी माझं दुसरं मन म्हणालं अगं तुम्ही काय वेगळं करता तुम्ही मित्र-मैत्रिणी भेटलात की जातातच ना तुमचे आवाज गगना पर्यंत ..गप्पांच्या नादात व्हायचं की असं .उलट ते फोनवर chat न करता इथे गप्पा मारतायेत प्रत्यक्ष आणि कुठेतरी कॉफी joint वर न जाता टेकडीवर आलेत मोकळ्या हवेत..मला पटलं एकदम माझ्या दुसऱ्या मनाचं बोलणं .. तेंव्हापासून असे जोरात आवाज ऐकू आले की, मी either रनिंग प्रॅक्टिस सुरू करते किंवा shoe लेस बांधते ..

कधीकधी लोकांच्या बोलण्यातली एक दोन वाक्य ऐकू येतात ..आपण त्यांना cross होताना..
"आयुष्यात शेवटी काय महत्वाचं असतं "किंवा
" किती दिवस हे ठरवत होते मी " किंवा
" परवाच मी म्हटलं त्याला ,अगदी माझ्या मनातलं बोललास"... अशावेळी मी त्यांचं पुढचं बोलणं ऐकत नाही. मी माझ्या मनाचं ऐकणं सुरु करते ..कान नाही, ध्यान देऊन ..
"आयुष्यात शेवटी काय महत्त्वाचं आहे माझ्या? ते मला ठाऊक आहे ना ?आणि त्याचं महत्त्व मी मान्य करते ना? बऱ्याच दिवसांपासून काय काय ठरवत होतो आपण? केलं का ते ?माझ्या मनात काय चालू आहे याक्षणी?

ध्यानामध्ये जसं आपण body, breath, mind, intellect ,memory, ego मधून जात शेवटी आपल्या स्वतः पर्यंत पोहोचतो, तसं होतं त्या क्षणी...
घर, संसार ,स्वयंपाक, मान-अपमान ,अहंकार या सगळ्यातून जात, मी शेवटी माझ्यापाशी येऊन पोहोचते.. म्हणून टेकडीवर जाणं माझ्यासाठी ध्यान करण्या एवढंच इंटरेस्टिंग आणि must आहे ...

Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहिलं आहे, जुन्या आठवणीशी खूप रिलेट झालं. आता एरिया बदलला, पण इथे ही छान हिरवी आणि शांत टेकडी आहे, डिफेन्स एरिया असल्याने वेताळ टेकडीसारखी गजबजलेली नाही. इथे यंग ऑफिसर्स जॉगिंगला येतात ते आपापल्या फिटनेस विश्वात हरवलेले असतात आणि एकजात म्हातारे सिनियर / रिटायर्ड जुन्या आठवणीनमध्ये. आम्ही सगळे एकमेकांना वर्षानुवर्षे फक्त विश करतो. पण चुकून एखाद्या रिटायर्ड ऑफिसरने तोंड उघडलं की कळतं की वरवर शांत आणि बऱ्याचदा खडूस वाटणारे म्हातारे कोणाशी संवाद साधायला किती तरसलेले असतात. इतके बोलतात की जाम पकवतात. म्हणजे तुम्ही फिरायला आला आहात, कुत्रा तुम्हाला ओढतो आहे अशा वेळेस युद्धस्य कथा रम्यम नाही वाटत किंवा कोणतंही तत्वज्ञान ऐकावस नाही वाटत. मग ती नेहमीची स्माइल्स आणि गुड मॉर्निंग गुड डे बरं वाटतं.
( आज सकाळी मिळालेलं ज्ञान - what is individuality n personality)

बहुतेक ; मोठ्याने बोलणारी , वाद-विवाद करणारी जी "Charactors" तुम्हाला दिसतात , त्यात मी आणि माझा मित्र अग्रक्रमात असू !

टेकडी हा आवडीचा विरंगुळा / व्यायाम / आनंद / मित्र आणि बरच काही...

तुमचे लेख ही सुंदर मालिका / सदर होइल.