भोपळ्याच्या फुलांची भजी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 December, 2018 - 02:53

इतक्या दिवसांनी रेसिपी टाकतेय आणि मासे सोडून हिला फुलेच मिळाली का अस तुम्ही मनातल्यामनात नक्की म्हणत असाल ना. येतील येतील माशांच्याही अजून रेसिपी येतील लवकरच. पण बरेच दिवसांचा गॅप आधी पाना फुलांनी भरून काढुयात.

मी भोपळ्याच्या वेली लावल्या आहेत त्यावर रोज सुंदर पिवळी फुले फुलत असतात. अजून भोपळे लागले नाहीत व जी फुले येतात त्यांना भोपळे येणार नाहीत कारण येणार्‍या भोपळ्यावरच कळी येते. त्या एक दोन आहेत सध्या. तर अशी फुले सोडून रोज नुसती फुले खुप फुलतात. एक दिवस साधनाने ग्रुपवर एक सुंदर चायनिज व्हिडिओ टाकला. एक मुलगी परडी घेऊन शेतात जाते ताजी ताजी भोपळ्याची फुले काढुन परडीत टाकते. ती घरी आणते आणि धुवुन त्याची भजी बनवते. तो व्हिडिओ पाहिल्यापासून मला ती मुलगी व्हावेसे वाटू लागले आणि भोपळ्याची फुले मला रोज खुणावू लागली. एका शनीवारी सुट्टीत शेवटी मी ती मुलगी बनण्याचे ठरविले आणि तिच्यासारखी सुंदर परडी तर नव्हती माझ्याकडे पण घरातली एक प्लास्टीकची टोपली घेतली आणि निघाले फुले काढायला. मनात व्हिडिओतली म्युझिक वाजत होती व जणू त्या तालावर मी नाजूकपणे ती फुले खुडली. रेसिपी लिहायचीच होती व त्या फुलांना सोशल मिडीयावर सुप्रसिद्ध करण्याच्या हेतूने फोटो काढले.

१)

घरी जाऊन फुले परडीतच धुतली. फुलाच्या देढाचा भाग पुढे टाकलेल्या फोटोप्रमाणे कापले.
२)

त्यांना दुमडून घेतली.

३)

४)

एका वाडग्यात थोडे बेसनचे पीठ, चिमुटभर हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पूड, अर्धा चमचा धणा पावडर व चवीनुसार मिठ घेऊन पाणी घालून ते जाडसर एकत्र कालवून भिजवून घेतल .
५)

६)

आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम केले व पिठाच्या मिश्रणात फुले बुडवून ती उकळत्या तेलात सोडली.
७)

८)

मध्यम आचेवर पाच मिनीटांनी पलटून परत पाच मिनिटे शिजू दिली आणि तयार झाली भोपळ्याची कुरकुरीत भजी.
९)

१०)

भजी झाली आणि माझी ती चायनिज व्हिडिओतली भुमिका संपून मी जमिनीवर परतले आणि भजीचा आस्वाद घेतला.

अधिक टिपा :
भोपळ्याची फुले मला कधी बाजारात दिसली नाहीत त्यामुळे भोपळ्याचे बी लावण्या पासून तयारी करा. Lol
भोपळा लागलेले फुल काढू नका भोपळ्याला इजा होण्याची शक्यता आहे.
पिठामध्ये धणेपूड नाही टाकली तरी चालेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच दिसतायेत!
पण ही लाल भोपळ्याची फुले ना?
गावी गेल्यावरच करता येतील भजी!

माझी आवडती भजी!
फुलं इथे बाजारात सहज मिळतात
आम्ही निम्मं तांदुळाचे पीठ घालतो, आणि कधीतरी कालवलेल्या पिठात कलौंजी घालतो, तिखट आणि धने जिरे पूड नाही घालत किंवा हिंगही

वा जागु, मस्त केलास रोल.
(त्या व्हिडिओतल्या मुलीच्या परड्यासारख्या परड्या कुठे मिळाल्या तर सांग ग मला)

भजी मस्त दिसताहेत. उचलुन तोंडात टाकायचा मोह आवरत नाहीये.

वा जागू आम्ही करू शकू अशी रेसिपी.

अर्थात भोपळा लावण्या पासून तयारी करावी लागेल तेव्हा मिळतील ही भजी खायला .

कृष्णा धन्यवाद. लाल भोपळ्याचीच फुले आहेत.

अनु नक्की करून पाहीन ग पानांची भाजी आणि भजी.

वरदा तांदुळ पिठामुळे अजून क्रिस्पी होत असतील भजी. पुढच्यावेळी ही टिप नक्की लक्षात ठेवेन.

साधना तशी परडी शोधुया आपण आणि जाउया डोंगरात Lol

ममो तुमच्यासाठी ते कठीण नाही. गावाला असतीलच वेली.

दक्षे नेहमीप्रमाणे जीवलग मैत्रिणीसारख कौतुक. धन्यवाद ग.

खुप छान पाकृ आणि फोटो सुद्धा Happy
तो व्हीडीओ पाहायचा आहे मला Happy
माझ्यासाठी शाकाहारी पाकृ टाकलीत ना जागु ताई ? Proud खुप धन्स

अरे वा, मस्त रेसिपी, फोटो. लांबसडक मिरच्याही छान दिसतायत.
झुकीनीच्या फुलांची ऐकून माहिती होती, हा तर आवाक्यातला प्रकार वाटतोय, आता शेजारच्यांच्या परसातल्या भोपळावेलीवर वॉच ठेवतो.

जागू तुसी ग्रेट हो. साधना ने पाठविलेला विडिओ बघितला नाही पण तुला तसेच इमॅजिन केले. Happy
भजी मस्तच दिसतेय. तू लगेच भजी बनवून फोटो सुद्धा टाकलेस तुझे खरेच कौतुक. भजी यम्मी दिसते आहे.

टेस्टी! फुलं मिळवायला हवीत ही आता. अशीच हेटीच्या फुलांची भजी आणि पीठ पेरून भाजी करतात (ना?)
आता हेटीचं फूल म्हणजे बहुतेक शेवग्याच्या झाडाचं फूल (?)

ही भजी म्हणजे अगदी जिव्हालौल्य खवळक! पण भोपळे लावायला जागा नाही. तेव्हा जागू किंवा वरदाकडे भेट द्यायला लागेल!

जी फुले येतात त्यांना भोपळे येणार नाहीत कारण येणार्‍या भोपळ्यावरच कळी येते >> हे कळलं नाही. नर मादी असते का भोपळ्यामध्ये ?

कलौंजी >> हेही माहित नाही!

बाकी युट्युब वर बऱ्याच बाया आणि बापे भोपळ्यांच्या फुलांवर हल्ले करतायेत Proud

इथे फार्मर्स मार्केट मध्ये फॉल मध्ये (भोपळ्यांचा सिझन) बरेचदा अशी फुलं मिळतात. आम्ही एकदा दोनदा आणून अगदी अशीच भजी केली होती. झुकीनीची पण फुलं मिळतात. मस्त लागतात ही भजी !

जागु मस्त आहे रेसीपी. कित्ती निगुतीने करतेस सगळं. Happy

मी झुकीनीच्या फुलांची भजी खाल्ली आहे. आणि खर सांगते जितकी ती ऐकायला रोमॅटींक वाटली तितकी काही खाताना वाटली नाही. Sad
मे बी फुलांची भजी ही कल्पना जितकी आकर्षक वाटते तितकी आकर्षक ती लागत नसावीत. म्हणजे त्या फुलाची अशी काही अंगभुत चव नव्हतीच त्यात. नेहमीची बेसन भजी लागली चव.
मे बी भोपळ्याला असावी. आता भोपळ्याची फुल मिळणार नाहीत पण मिळतील तेव्हा नक्कीच करून बघेन.
हे असच माझ लव्हेंडर आईसक्रीम खाताना झाल होत. इतकं काही ग्रेट लागलनाही. पण दिसायला सुरेख होत तो सो नो कंप्लेन्स. लव्हेंडर लेमोनेड छान लागत्/दिसत मात्र.
गुलाबाचे मात्र सगळेच पदार्थ आवडतात.

जागुताई, (तुला सहज शक्य आहे म्हणून ) जी फुलं तोडायची नाहीत आणि जी तोडायची अशी वेलीवर असतानाचा फोटो काढून टाक ना

सीमा, मी हादग्याची फुलांची भजी अशीच डोळ्यात बदाम वगैरे घेऊन खाल्लेली, बदाम विरघळले खाताना Sad Sad

फायनली, कांद्याच्या खेकडा भजी समोर बाकी सगळी भजी तुच्छ आहेत. खेकडा भजी नसताना दिलके बहलानेको ये सब फुलके भजीखयाल अच्छे है, अन्यथा खेकडा भजी ती खेकडा भजी हा निष्कर्ष काढून मोकळी झाले.

आपण पीठच एवढे वापरतो त्यामुळे पीठाचीच चव लागते. खरे आहे फुलाची चव न लागता जास्त पीठाचीच लागते.
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

सीमा, मी हादग्याची फुलांची भजी अशीच डोळ्यात बदाम वगैरे घेऊन खाल्लेली, बदाम विरघळले खाताना Sad Sad

फायनली, कांद्याच्या खेकडा भजी समोर बाकी सगळी भजी तुच्छ आहेत. खेकडा भजी नसताना दिलके बहलानेको ये सब फुलके भजीखयाल अच्छे है, अन्यथा खेकडा भजी ती खेकडा भजी हा निष्कर्ष काढून मोकळी झाले.>>>>

साधना अगदी अगदी. तसचं वाटल बघ मला.

फायनली, कांद्याच्या खेकडा भजी समोर बाकी सगळी भजी तुच्छ आहेत>>>>>>> असहमत. माझी आवडीची बटाटाभजी,सिमला मिरची,फ्लॉवर्,घोसाळी,वांगी भजी.कांदाभजी नंतर..पिठात ओवा,तिखट पाहिजेच.