माय लेवा गणबोली

Submitted by Asu on 3 December, 2018 - 00:56

दि.१ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या पहिल्या ओबीसी साहित्य संमेलनात मी सादर केलेली कविता -
लेवा गणबोली ही प्रामुख्याने महाराष्ट्रातील जळगांव जिल्ह्यात व विखुरलेल्या लेवा पाटीदार समाजाची गोड बोलीभाषा. समाजबांधव शिकून सवरून मोठे झाले. शहरात, परदेशात गेले पण मायबोलीला गावातच ठेवले. तिची ओळख देणेही त्यांना गावंढळपणाचे वाटू लागले.
आता माय लेवा गणबोली खाटल्यावर मरणासन्न अवस्थेत खितपत पडली आहे. तिचे पुनर्जीवन करून मायच्या दूधाचे ऋण फेडणे तिच्या लेकरांचे कर्तव्य आहे. खाटल्यावरून मायबोली काय सांगते, ते ऐकूया.
*माय लेवा गणबोली*

गुजरात सोडीसन आलू सासरी खानदेशी
आईका लोको सांगते माही करून कहानी

तरणीताठी माय तुही म्हतारी झाली
लेवा गणबोली माय तिले पुसेना कोनी

दुध पाजीसन मीनं पोऱ्हं वाढोयली कशी
पोरं शिकोयासाठी घालवली जीनगानी

शीकिसन पोऱ्हं झाली कमावती भारी
माय आता गावंढळ पोऱ्हं सायबावानी

माय राह्यली गरीब, पोऱ्हं शिरीमंत झाली
मले वयख्याले बी पोऱ्हं करती आनाकानी

आधार मले देशीन म्हनून जगली अजूनबी
शहरामंदी गेला लेका वाट नही केली कानी

अशी कशी लेकरं मले देवानबी देली
लेकरं समदी अशीसन कोख सुनी सुनी

जागा व्हंय रे अजूनबी माय खाटल्यावरी
ल्योक इन उठोयाले आस माह्या मनी

नको लेका राग मानू बोलली मी खरी
मेल्यावर डोया तुह्या ईन का रे पानी

लेवा गणबोली माय तिले पुशेना कोनी
लेवा गणबोली माय तिले पुशेना कोनी

- प्रा. अरुण सु. पाटील (असु)
 © सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults