*घोडपदेव थोर, पण बोकाळले चोर*

Submitted by ASHOK BHEKE on 2 December, 2018 - 08:33

विषय कुठलाही असो चवीचवीने चघळणे, आपल्या पुरुषांचा स्वभावधर्म. यात महिलाही मागे नाहीत. ऐन गुलाबी थंडीत चोरांचा खूपच बोलबाला आहे. चोरांचे खुमासदार रंजक किस्से ओघाने आलेच.चोरांना देखील सुकाळ प्यारा तसा दुष्काळ देखील प्यारा. *स.दा. चोरटे* ही व्यक्तिरेखा आपल्या नावाप्रमाणे कर्म करीत असते.तर *हा. त. सफाईकर* चालताचालता कुणालाही गंडा घालण्यात वस्ताद. असाच एक हा. त. सफाईकर, सडपातळ शरीरयष्टी. सफेद शर्ट आणि फिट जीन्स,पेहराव संशय ने येण्याजोगा घोडपदेव नाक्यावरून सावज हेरीत धाकु प्रभुजी वाडीतून चालला होता. २३ जानेवारी २०१७. वेळ दुपारी २.५०. आकांक्षा फोटो स्टुडीओचे अर्धे शटर बंद होते. आकांक्षाचे मालक श्री शैलेश थोरात आपल्या आईला सोडायला स्टेशनला नेहमी प्रमाणे गेले होते. चोरमहाशय चालता चालता तेथेच थबकले.दोन पाऊले माघारी आले. सावज हेरले. दुकानाच्या बाहेरची जाळी प्रयत्न करून खोलली अन दुकानाच्या पायरीवर शटर वर करीत आवाज दिला, *कोण आहे का दुकानात*....? उत्तर आले नाही. त्याने पुन्हा एकदा आवाज दिला पण प्रतिसाद आला नाही सफाईकरचे हात गल्ल्याभोवती फिरू लागले अन कॅमेरा हाती लागला.आपल्या गोणपाटात कॅमेरा टाकला अन आपण दुकांचे मालक या अविर्भावात तो आपला करिश्मा दाखवीत निघून गेला. भरदिवसा चोराने केलेला थरारक प्रयत्न मन अस्वस्थ करणारा होता.त्यावेळी दुकानाच्या अवती भवती माणसांची वर्दळ होती पण कुणालाही संशय आला नाही. जेव्हा शैलेश दुकानात परतला तेव्हा त्याला कळून चुकले की, काही गडबड झाली आहे. तेव्हा कॅमेरा गेल्याचे लक्षात आले अन तो हबकला. चोर परागंदा झाला होता. बिच्चारा शैलेश सुशिक्षित तरुण नोकरी न करता व्यवसाय स्विकारला होता. मुळात फोटोग्राफी हा छंद त्यात आईवडिलांचे पाठबळ त्यामुळे त्याने व्यवसायात बऱ्यापैकी जम बसविला होता.
नोकऱ्या मिळत नाही म्हणून आजकालच्या काही तरुणांनी फोटोग्राफी, व्हिडीओ शुटींग हा एक व्यवसाय निवडला आहे. कसंबसं त्याचं या व्यवसायात जम बसवायचे प्रयत्न सुरु असतात. त्यात मोबाईल आल्यापासून या धंद्याचे तीन तेरा वाजले आहेत. पण काही का असेना आजही शैलेश या धंद्यात रममाण आहे. आपली मुले व्यवसायात काबाडकष्ट करताना पाहिले की बरे वाटते. मला या शैलेश सारख्या गुणी तरुणाचा अभिमान आहे. पण त्यावर चोराने आणलेली आफत न परवडणारी आहे. आता आमचे *चंद्रकांत तांबोळी* यांचं आयुष्यच सायकलवर गेले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुंबई पोर्ट ट्रस्ट सेवेत त्यांना सायकल शिवाय पर्याय नव्हता. विस्तारलेले मुंबई बंदर जेथे ड्युटी मिळेल तेथे हजेरी लावण्यासाठी जाणे ते पायी चालत जाणे कठीणच. म्हणून तांबोळी सायकल वापरीत होते. त्यांच्या तीस पस्तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये आतापर्यंत ७ वेळा आपल्या विभागातून सायकल चोरी झाल्या. नवीन सायकल आली की चोरांचे डोळे ... केवळ तांबोळी यांच्याच सायकली गेल्या नाहीत तर जे सायकल वापरतात त्यांच्याकडे कधी ना कधी चोर धावून आले आहेत. त्यांनाही चोरांनी धक्का दिला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या चोऱ्याविषयी लिहिणे टाळत आहे याला काही करणे आहेत.
शैलेशच्या दुकानात २३ जानेवारीला घडलेली घटना ताजी असताना २४ जानेवारी २०१७ ला त्यांच्याच हेरंब दर्शन सोसायटी समोर समोर गँस सिलिंडरची सायकल घेऊन आलेल्या त्या कर्मचाऱ्याला चोरांनी त्याच्या इंगा दाखविला.दोन सिलिंडर उचलून घेऊन गेले होते.परंतु सीसीटीव्हीच्या मदतीने त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर काही दिवसातच आपल्या राजू कामाठीतील *मोहन पाटील* यांच्या घरात चोरी झाली. संकटे आली की कशी येतात अन किती येतात हे सांगता येत नाही. मुलाचा साखरपुडा म्हणून घरात खरेदी सुरु असताना आजाराने आई निर्वतली. कार्य झाले मुंबईला परतले तितक्यात गावच्या घराची भिंत कोसळली म्हणून गावी गेले. इकडे चोर आले धावून , आणि बरेच काही नेले वाहून. बिचारे मोहन पाटील यांची अवस्था काय झाली असेल, त्यांचं त्यांना ठाऊक. तरीही या चोरांचं समाधान झाले नाही. काही दिवसानंतर त्या चोरांनी पुन्हा टाळा खोलण्याचा प्रयत्न केला. आज पाटील यांच्या घरी घडले ते आपल्या घरी अघटीत घडायला नको म्हणून देवाची करुणा भाकण्यापेक्षा आपणही काळजी घ्यायला हवी.
सोनसाखळी चोरांची आजकाल दहशत पसरली आहे. रस्त्यांनी महिला दबकत दबकत ये जा करतात. *कधी येईल दुचाकीस्वार, अन गळ्यातल्या सोन्यावर हात मारून होईल पसार*. काय हा चोरांचा दबदबा. असं घडतंय तरी आपला समाज गप्प का ...? याला पर्याय का शोधीत नाही. *हेरंब दर्शन* आणि *श्री कापरेश्वर कृपा* सोसायट्यानी सीसीटीव्ही लावून आपल्या रहिवाश्यांना सुरक्षितता प्रदान केली आहे. मग अन्य किती तरी चाळी आहेत, दुकाने आहेत, त्यांनी आपल्या चाळीच्या प्रदर्शनी भागात अशीच व्यवस्था करणे आज तरी गरजेचे आहे. दुकानदार मंडळीनी आपल्या दुकानापुरते चित्रण दिसेल अशी व्यवस्था केली आहे. त्यांना बाहेरच्या दुनियेशी काहीही घेणे देणे नाही. तेव्हा या धावून आलेल्या चोराला किंवा फोफावत चाललेल्या विकृतींना ठेचायाचे असेल तर आताच सीसीटीव्ही पर्याय उभा करा. थोडा खर्चिक मामला जरूर आहे. पण सुरक्षिततेच्या दृष्टीने लाभदायक आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या चोरांच्या संमेलनाप्रमाणे घोडपदेव मध्ये चोरांचे संमेलन भरले तर नाही ना ....!
*अशोक भेके*

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users