(अ)प्रिय इंजिनिअरिंग...

Submitted by क्षास on 2 December, 2018 - 00:12

अप्रिय इंजिनिअरिंग,
तुझ्याभोवती आकार घेत गेलं
माझ्या ओबडधोबड अपेक्षांमधलं
वास्तव-अवास्तवच्यामध्ये कुठेतरी
लोंबकळत असलेलं भविष्याचं चित्र....
चारचौघांसारखी माझी स्वप्नं
भव्यदिव्य नाहीत...निदान त्या
'इमॅजीनेशन'मध्ये तरी परिपूर्णतेची
सक्‍ती नको...
प्रत्येक परिक्षेगणिक पुसट होत
चाललेल्या माझ्या अस्तित्वाने
आटापिटा करूनही... इंजिनिअरिंगचा
'इ'सुद्धा कधी
आपलासा नाही वाटला आजवर,
शोधायची आहेत बरीच उत्तरं
मी 'काय' करत आहे आणि
मुळात 'का करत आहे...
पण इथे दुर्दैवाने
मदतीला नाहीये " टेकमॅक्स" सारखा
हलकाफुलका, साधासरळ शॉर्टकट...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लई भारी -
टेकमॅक्स च्या सोलुशन वाचून काठावर पास झालेला इंजिनियर

इंजिनिअरिंगला नावं ठेवून फायदा नाही.
न आवडणाऱ्या विषयात उडी घेतली की असं होणारच.>>>> लेखक स्वतःच सांगतोय की त्याला अजून इंजिनिअरींगचा "ई" सुद्धा आपलासा वाटलेला नाही (किंवा कळलेला नाही).... आणि कविता वाचून हे स्पष्ट होतंच आहे......

इंजिनिअरिंग क्षेत्राला नाव ठेवून काही फायदा नाही हे बरोबर आहे. पण नावडत्या विषयात उडी घेतली की असंच होणार असं म्हणणं चुकीचं ठरू शकतं..कारण सध्याचं इंजिनिअरिंग कॉलेजेसमधलं वातावरण, टिचिंग क्वालिटी वगैरे इंजिनिअरिंगला 'नीरस' करण्यासाठी कितपत कारणीभूत आहेत हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. मी सरसकट सगळ्या कोलेजेसना गृहीत धरत नाही. काही अपवाद आहेत. मी 10,000 भरलेल्या गव्हर्नमेंट कोलेजमध्येही अनुभव घेतले आहेत आणि आता वर्षाला दोन लाख भरून प्रायव्हेट कोलेजमध्येही बरेच निराशादायी अनुभव घेत आहे. आजची ही परिस्थिती खूप गंभीर आणि चिंताजनक आहे.

इंजिनिअरिंग क्षेत्राला नाव ठेवून काही फायदा नाही हे बरोबर आहे. पण नावडत्या विषयात उडी घेतली की असंच होणार असं म्हणणं चुकीचं ठरू शकतं..कारण सध्याचं इंजिनिअरिंग कॉलेजेसमधलं वातावरण, टिचिंग क्वालिटी वगैरे इंजिनिअरिंगला 'नीरस' करण्यासाठी कितपत कारणीभूत आहेत हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. >>

नाही, विषय आवडता असेल तर या सगळ्याची काहीच गरज नाही. सटरफटर कॉलेज फक्त डिग्रीचे चिटोरे मिळवण्यासाठी कामाला येतं, अन बऱ्यापैकी चांगलं असेल तर डिग्रीबरोबर बोनस म्हणून खरोखर रस घेऊन शिकवणारे एखाद दोन शिक्षक मिळतात. पण तुमची विचारक्षमता, विषयाचं नॉलेज वाढवण्यासाठी या सगळ्या पुरवण्या आहेत, त्या नसल्या तरी विशेष काही अडत नाही. एकलव्यासाठी फक्त द्रोणाचार्याची मूर्तीच पुरेशी होती.

आज असे किती एकलव्य मनापासून आपल्या विषयात, प्रोजेक्ट मध्ये रस घेतात ? माझ्या ओळखीतल्या अनेक जणांच्या अशाच तक्रारी आहेत, नीट शिकवत नाहीत, रस घेणारे शिक्षक नाहीत वैगरे. मी म्हणतो, नाही आवडत ना क्लास मधलं, मग स्वतःहून वाचा ना. करा स्वतःची प्रोजेक्ट, स्वतः शिका नवीन टूल्स. आज घरटी ३-४ स्मार्टफोन आहेत, इंटरनेट काँनेक्टिव्हिटी २४ तास आहे, मग बसा गुगल बाबाच्या पायथ्याला, बनवा तूनळीला गुरु. अक्षरश ढिगानं रोज नवनवीन विडिओ पडतात तिथं इंजिनीरिंगचेच , कोण पाहायची तसदी घेतो ?

NPTEL म्हणून आयआयटीवाल्यानी ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम सुरू केलाय, पण वाचून आश्चर्य वाटेल , त्यांच्या बहुतेक व्हिडिओवर अजूनही परदेशातून शेकडो व्ह्यूज येतात, आणि आपल्या देशातून फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतके. असं का ? आपल्या विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट तेव्हा कुठे दडी मारून बसलेला असतो ?

खरोखर रस असेल तर या गोष्टी आपसूक होतील मुलांकडून. आजही जगातले २५% च्या वर उच्च दर्जाचे कोडर्स, डेव्हलपर्स हे कुठल्याही डिग्रीविना शिकून तिथवर पोहोचलेत (stackoverflow survey २०१८) यातच काय ते समजा. बोलावं तितकं कमी आहे, पण कॉलेजेस कडे एक बोट दाखवताना चार विद्यार्थ्याकडे असतात इतकंच मला वाटतं.

१. ज्यांना मुळात विषयात रस आहे त्यांना काहीही अडवू शकत नाही हे तर सर्वमान्य आहे. मुद्दा आहे ज्यांना आवड निर्माण होऊ शकली नाही त्यांचा... याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत असू शकतात आणि त्यातलंच एक टिचिंग क्वालिटी हे आहे( असं माझं मत आहे).
२. कॉलेजकडे बोट दाखवणाऱ्या मुलांची तीन बोटे स्वतःकडे असतात हे ही मान्य आहे. डिग्रीशिवायही करियर घडवता येतं हे बोलणं सोप्प आहे. काही असामान्य माणसं घडवतातही. पण जेव्हा सामान्य विद्यार्थी लाखांमध्ये फी भरून डिग्री मिळवायला, काहीतरी नवीन शिकायला जातात ...हातात १०-२० टक्के ही समाधान पडत नाही तेव्हा कॉलेजकडेच बोट दाखवणं ही natural human tendency आहे.

हे सगळं हळूहळू मुलांच्या सवयीचं होतं...यालाच इंजिनिअरिंग म्हणतात असं समजून काहीजण ४ वर्ष ढकलतात तर ज्यांना आवड असते ते स्वतःच्या लेवल वर try करत राहतात.

३.आजवर माझ्यासारखे विद्यार्थी गुगल, युट्युब, nptel च्या सहाऱ्यावरच पास होत आले आहेत.... या रिसोर्सेसकडे वळण्याआधी माझ्यासारखे कित्येक जण खोलात जाऊन "कन्सेप्ट" माहित करून घेण्यासाठी लायब्ररीतली जाड पुस्तकं वाचत बसली असतील.... नंतर कन्सेप्टच्या शोधात हातून निसटणारे मार्क्स मिळवायला techmax सारखी पुस्तकं घ्यावी लागली..... प्रत्येकजण आधी curious असतो...नंतर स्पर्धेच्या रेट्यात curiosity कमी होत जाते.....तिथेच कॉलेजमधल्या वातावरणाचा इम्पॅक्ट महत्वाचा ठरतो.
४. मी असे कितीही मुद्दे मांडले तरीही... विद्यार्थ्यानुसार, कॉलेजनुसार,शहरानुसार हे बदलत राहील.... प्रत्येक जण त्याच्या त्याच्या परिघानुसार, निरीक्षणानुसार बोलत राहणार..... मी माझ्या शहरातल्या निरीक्षणाबाबत बोलले...आणि माझी मतं मांडली.... ते सर्वत्र लागू होईलच असं नाही.

इंजिनिअरिंगला नावं ठेवून फायदा नाही.
न आवडणाऱ्या विषयात उडी घेतली की असं होणारच.
>>> 12वी मध्ये किती जणांना अक्कल असते इंजिनिअरिंग मधला कोणती साईड आवडीची आहे ते ओळखण्याची.
मित्र कुठे जातायत यावर बरेच decide होते.

12वी मध्ये किती जणांना अक्कल असते इंजिनिअरिंग मधला कोणती साईड आवडीची आहे ते ओळखण्याची. >>
मग आपल्या पोरापोरींना अक्कल यायची कवा ? अजून किती वेळ आपण याला त्याला विचारून स्कोप काढत पुढचं करियर करणार? १२ वी झाल्यावर पण स्वतःची आवड जर अजून ओळखता आली नाही तर काय फायदा एवढ्या शिक्षणाचा?
अगदीच निवड होत नसेल तर एखाद्या वेळी वर्षभराचा ब्रेक घेतलेला बरा (च्यायला परदेशात हे मस्त आहे), इतर काही छोटे इंटरेस्ट चाचपडता येतील. नंतर कोर्सच्या नावाने शिमगा करून आपलाच वेळ वाया जातो.

विलभ यांच्याशी सहमत. Engineering मध्ये scope आहे, career चांगल आहे असा पालक आणि विध्यार्थी दोघांना वाटते. म्हणजे इंजिनीरिंग डिग्री घेतली कि झाला life set. असा समज अजूनही आहे. परंतू तुम्हाला प्रॅक्टिकल knowledge किती, तुम्ही ते कसे implement करता यावर तुमचा job career depend आहे. मी freshers, passout with first class or higher वाले candidate चे developing साठी interview घेतले आहेत. काहीही येत नाही त्यांना. तुम्हाला 10th, 12th ला distinction. Degree ला पण चांगला score मग असे कसे? काहीतरी गडबड नाही का? Career म्हणजे काय? Practical knowledge म्हणजे काय? Why company should hire you? आता इंजिनीरिंग post graduation झालेले खुप candidate आहेत परंतू जर तुम्हाला काही शेकडा लोकांना मधून company ने निवडावे वाटत असेल तर तुम्ही पण तसें स्वतःला prove केले पाहिजे.

१२वी मध्ये किती जणांना अक्कल असते इंजिनिअरिंग मधला कोणती साईड आवडीची आहे ते ओळखण्याची.
मित्र कुठे जातायत यावर बरेच decide होते
>>>>>>>हे माझ्या आणि माझ्या भरपूर मित्रमंडळींच्या बाबतीत खरं आहे .११-१२ वर्षांपूर्वी घरी संगणक होता पण त्याला वेगवान इंटरनेटची जोड नव्हती .. आणि लहान शहरात एवढा अवेअरनेस पण नसायचा ... सिनिअर मित्रमंडळी जे करायचे तेच अनुसरायचा ट्रेंड होता .. त्यामुळं चांगल्या कॉलेज ला शिकूनही शेवटी शेवटी काय करायला पाहिजे होतं हे ध्यानात आलं .

१२वी मध्ये किती जणांना अक्कल असते इंजिनिअरिंग मधला कोणती साईड आवडीची आहे ते ओळखण्याची.
मित्र कुठे जातायत यावर बरेच decide होते
>>>
तरीही इंजिनिअरिंगला नावं ठेऊन काय उपयोग!

पूर्वी (निदान ३० वर्षांपूर्वी) तरी असायची. दहावी पर्यंतच मुला/मुलींचे पाय पाळण्यात दिसत. तरीही हवी ती शाखा / कॉलेज मिळले नाही अशा केसेस बऱ्याच असायच्या.
आता शिक्षण संस्थेतील अफाट बदलामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगले मार्गदर्शन होत असेल असे वाटले. पण इंजिनिअरिंगच्या मागे धावण्याचा निर्णय मुलांचा / पालकयांचा. हवी तेवढी कॉलेजेस, मार्क्स कितीही मिळो पर्वा नाही, पैसा आहेच सगळ्यांकडे. कल, झेपेल की नाही हे न बघता घ्या ऍडमिशन असे केल्याने काय होते याचे उदाहरण आहे हे. विद्यार्थ्यांना निट मार्गदर्शन मिळत नाही, पालकांनाही कळून वळत नाही अशी परिस्थिती आहे.

इंजिनीरिंग ला गेल्यावर आपला कल नाही असे वाटत असेल तर अजूनही वेळ गेली नाही. वयाच्या ५० व्या वर्षी देखी करियर बदलणाऱ्या लोकांची उदाहरणे पाहण्यात आहे. आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे कि आपण असा विचार स्वतःची समजूत काढायला तर करत नाहीये ना?

करिअर बदलणं अंगावरचा एखादा कपडा बदलावा इतकं सोप्प आहे का? मी तरी नाही 3 4 वर्षांची मेहनत , वेळ आणि पैसे वाया घालवणार.... मी जर या शेवटच्या टोकापर्यंत आलेय तर मी डिग्री घेऊनच बाहेर पडणार..असाच विचार सगळे करतात... पुन्हा कलचाचणी करून आवडत्या विषयाचा कोर्स करून पुन्हा काही वर्ष झटणारे असतीलही अपवाद... इथे कितीही बोललं तरी practically जे यातून जात आहेत त्यांनाच माहित नक्की काय घडतंय...

इथे सगळे सोल्युशन ओरिएंटेड बोलत आहेत. Career guidance , कलचाचण्या, इंटरनेट, ऑनलाइन references , webinars, e-books हे सगळं आज पुरेपूर वापरलं जातंय... काहीजण प्रॅक्टिकल अप्रोच वापरून नवीन technology घडवतायत.... काहीजण दुसऱ्यांदा ड्रॉप लागला की इंजिनीअरिंग सोडतायत... काही साईड बाय साईड वेगळे efforts घेतायत.. आजची परिस्थिती वरवर बघितली तर कोणाला निराशाजनक वाटेल ... कोणाला पॉझिटिव्ह वाटेल.... Subjective आहे ते...

मला माझ्या आजूबाजूचं वातावरण जसं दिसलं त्यावरून मी ही कविता लिहिली.... मायबोलीवर वेगळीच चर्चा झाली. इथे almost प्रत्येक धाग्यात काहीतरी negativity असतेच.... मला माझ्या कवितेबाबत वेगवेगळे views,openions वाचायला आवडलं असतं... पण इथे फक्त इंजिनिअरिंगवर चर्चा झाली.... लोक धाग्यावरचा कंटेंट वाचायला धागा उघडतात की खालचे प्रतिसाद वाचायला ? मला नेहमी प्रश्न पडतो.

इंजिनियरिंग किंवा दुसरा कुठलाही अभ्यासक्रम असला तरी त्यात विषयाचे ज्ञान आणि विचार करायची पद्धत असा दोन्ही घडत असते. अल्गोरिथम शिकताना एखादी प्रोसेस क्रम क्रमाने कशी मांडायची याचा तंत्र जास्त महत्वाचे आहे. थोड्या फार प्रमाणामध्ये पहिले तर कुठल्याही क्षेत्रात उपयोगी पडेल असे बराच काही आहे इंजिनियरिंग मध्ये. तसे पाहायला गेलं तर सर्व साधारण पणे कुठलाही कोर्स केला तरी बऱ्यापैकी सारखीच विचार पद्धत तयार होते.

बाकी कवितेबद्दल विचार केला तर रिलेट होईल असा अनुभव नाही. आवडीच्या क्षेत्रात काम करत असल्याने आणि न आवडणाऱ्या गोष्टी ह्या त्या विषयाचे ज्ञान किंवा स्किल किंवा दोन्ही नसल्याने जमत नाही का असा प्रश्न पाचवीला पुजल्यासारखा डोक्यात येत असल्याने म्हणा किंवा पडेल ते काम करायची परिस्थिती असल्याने म्हणा कवितेतली भावना वाट्याला आली नाही.

नकारात्मक विचाराचे म्हणाल तर प्रतिक्रिया शेवटी कवितेच्या वाचनानंतर आलेल्या फील चा आरसा आहे. कविता सकारात्मक दिशेने गेली असती तर वाचणार्यांना बरोबर घेऊन गेली असते. मध्यंतरी न्यू यॉर्क टाइम ला आलेली कॅट पर्सन अशीच नेगेटिव्ह मूड मध्ये घेऊन गेली. तुमची कविता कड्यावरून खाली ढकलते आणि तळाशी आणून ठेवते मग वाचणाऱ्याच्या मनात स्वाभाविक विचार येतो कि आता पुढे काय? त्यातून मग मार्ग काय असे सल्ले येतात. आणि दुसऱ्याचा प्रॉब्लेम सोडवताना त्यात मुळात आपल्याला हा प्रॉब्लेम नाही याचा आनंद हि असतो आणि दुसरा प्रॉब्लेम मध्ये आहे तर त्यावर सल्ला दिलाच पाहिजे असाही माणसाचा डिझाईन आहे. तुमचा हाच हेतू असेल तर अचूक साध्य झालाय.